Wednesday, October 29, 2025
Happy Diwali

ऐरोली ते काटई नाका प्रकल्पाच्या कामाला आणखी सहा महिने लागणार

ऐरोली ते काटई नाका प्रकल्पाच्या कामाला आणखी सहा महिने लागणार

मुंबई (प्रतिनिधी) : कल्याण-डोंबिवली-नवी मुंबई भागातील प्रवास जलद होण्यासाठी आणखी सहा महिने जाणार आहेत. हे अंतर वाहतूक कोंडीशिवाय सुसाट पार करण्यासाठी महत्त्वपूर्ण असलेल्या ऐरोली काटई नाका प्रकल्पाचे काम पूर्ण होण्यासाठी मार्च २०२६ उजाडणार आहे. तोपर्यंत वाहन चालकांना कोंडीतून प्रवास करण्याशिवाय पर्याय नाही. आता एप्रिल २०२६ मध्ये हा मार्ग वाहतुकीसाठी खुला करण्याचे नियोजन मुंबई महानगर प्रदेश विकास प्राधिकरणाने (एमएमआरडीए) केले आहे.

ऐरोली काटई नाका या प्रकल्पाचे काम एमएमआरडीएने तीन टप्प्यात हाती घेतले आहे. या प्रकल्पाची एकूण लांबी १२.३ किमी इतकी आहे. या मार्गामुळे कल्याण-डोंबिवली आणि नवी मुंबईमधील अंतर ७ किमीने कमी होईल. त्यातून या भागातील प्रवासाच्या वेळेत १५ मिनिटांनी बचत होणार आहे. या पहिल्या दोन टप्प्याचे काम यापूर्वी डिसेंबर २०२४ मध्ये पूर्ण होणार होते. मात्र याला आता मोठा विलंब झाला आहे. सध्या ठाणे- बेलापूर रस्ता ते राष्ट्रीय महामार्ग क्रमांक ४ या मार्गाचे सुमारे ८७ टक्के काम पूर्ण झाले आहे. यामध्ये दोन स्वतंत्र बोगद्यांचा समावेश आहे. हे दोन्ही बोगदे खणून पूर्ण झाले आहेत.

पहिल्या टप्प्यात ३.४३ किमी लांबीचा मार्ग ठाणे बेलापूर रस्ता ते राष्ट्रीय महामार्ग क्रमांक ४ या दरम्यान उभारला जात आहे. यात १.६९ किमी लांबीच्या बोगद्याचा समावेश आहे. दुसऱ्या टप्प्यात २.५७ किमी लांबीचा मार्ग ऐरोली पूल ते ठाणे बेलापूर रस्ता असा उभारला जात आहे. तिसऱ्या टप्प्यात राष्ट्रीय महामार्ग क्र. ४ येथून दिवा - पनवेल रेल्वे ओलांडून कल्याण शिळ रस्त्यावरील कटाई नाका कटाई नाका जंक्शनला जोडला जाणार आहे. हा मार्ग ६.७१ किमी लांबीचा असेल.

Comments
Add Comment