
नवी दिल्ली : केंद्रीय मंत्रिमंडळाच्या बैठकीतील निर्णयानुसार यंदा दिवाळी आणि छट यांसारख्या सणांच्या पार्श्वभूमीवर प्रवाशांच्या सुविधेसाठी 12 हजार विशेष गाड्या चालवण्याचा मोठा निर्णय घेण्यात आला आहे. त्याचबरोबर, 4 नवीन रेल्वे प्रकल्पांनाही मान्यता देण्यात आली असून यामधून देशातील रेल्वे सेवा विस्तारित आणि आधुनिकीकरणाच्या दिशेने आणखी एक पाऊल टाकले जाणार आहे. केंद्रीय मंत्री अश्विनी वैष्णव यांनी यासंदर्भात माहिती देताना सांगितले की, दिवाळी आणि छटसारख्या सणांच्या काळात देशभरात 1200 विशेष गाड्यांद्वारे एकूण 12 हजार गाड्या चालवल्या जाणार आहेत, जेणेकरून प्रवाशांना गर्दीचा त्रास होणार नाही व प्रवास सुलभ होईल. याशिवाय, आजच्या कॅबिनेट बैठकीत चार नवीन रेल्वे प्रकल्पांनाही मान्यता देण्यात आली असून हे प्रकल्प 3 ते 5 वर्षांत पूर्ण होणे अपेक्षित आहे. केंद्रीय मंत्री अश्विनी वैष्णव यांनी कॅबिनेटच्या निर्णयांची माहिती देताना सांगितले की, भारत आता अमेरिकेला मागे टाकून जगातील दुसऱ्या क्रमांकाचा सर्वात मोठा मालवाहतूक करणारा देश ठरला आहे. गेल्या १० वर्षांत रेल्वे क्षेत्रात भारताने मोठी प्रगती केली आहे. कॅबिनेटच्या बैठकीत आज मंजुरी देण्यात आलेले 4 नवीन रेल्वे प्रकल्प देशातील महत्त्वाच्या सात रेल्वे कॉरिडॉरवर आधारित आहेत. हे कॉरिडॉर सध्या एकूण रेल्वे वाहतुकीच्या सुमारे 41 टक्के भाराचे वहन करतात.
या कॉरिडॉरमध्ये रेल्वेचे जाळे अधिक मजबूत करण्यासाठी आणि नवीन मार्ग जोडण्यासाठी विविध प्रकल्प हाती घेण्यात आले आहेत. आता या कॉरिडॉरमध्ये किमान 4 ट्रॅक, आणि शक्य असल्यास 6 ट्रॅक तयार करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. तसेच त्यांनी सांगितले की, देशात विविध रेल्वे प्रकल्प राबवले जात असताना, लॉजिस्टिक खर्चातही घट होत आहे. आपल्यासारख्या लोकसंख्या व अर्थव्यवस्थेच्या दृष्टीने मोठ्या देशांमध्ये रेल्वे प्रणालीवर भर दिला जातो कारण ती पर्यावरणपूरक, ऊर्जासक्षम आणि खर्चबचतीस मदत करणारी आहे.