
मुंबई.कॉम
मुंबईतील पदपथ तर आधीच गायब झाले आहेत. रस्त्याच्या कडेला पार्किंग आणि जागोजागी थांबणाऱ्या दुचाकी वाहनांची भर पडल्याने शहरात चालणे आणखी धोकादायक बनू शकणार आहे. या बाईक टॅक्सींमुळे तरुणांना नोकरीची नवी संधी तर मिळेलच पण एक शेवटच्या गल्लीपर्यंत चांगली सेवा मिळू शकेल. कमी अंतराच्या प्रवासासाठीही टॅक्सी बाईकचा उपयोग ठरू शकेल त्याचवेळी रात्रीच्या वेळेस सुरक्षिततेचे काय? दुचाकीच्या अपघाताचे प्रमाण जास्त वाढल्याने वेगाने पोहोचण्यासाठी वाहतुकीच्या नियमांचे सर्रास उल्लंघन करण्यात येईल. याला जबाबदार कोण? हे प्रश्न शेवटी निरुत्तरच राहतात.
गेल्याच आठवड्यातील गोष्ट. मुंबईतील छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस समोरील बस थांब्यावर बसची वाट बघत असताना रात्री साडेदहाच्या दरम्यान बस थांब्यावर एक साधारण तिशीतील तरुणी येऊन उभी राहिली, पाच-दहा मिनिटे ती त्या बस थांब्यावर उभी होती. थोड्याच वेळात एक बाईकस्वार तिच्या पुढ्यात उभा राहिला. तिने खिशातून मोबाइल काढला व त्याला काही मोबाइलमध्ये दाखवले. दोघांमध्ये संवाद झाल्यावर ती तरुणी अचानक त्या बाईकस्वाराच्या मागे बसली व निघून गेली. माझ्या मनात धस झाले. हा काय प्रकार होता? ते दोघे लग्न ठरलेले कपल किंवा प्रेमवीर तरी वाटत नव्हते. दोघात संवाद झाला व ती तरुणी त्याच्या खांद्यावर हात टाकून त्या उंच बाईकवर अशी बसली कशी? या विचारात असतानाच दुसऱ्या दिवशी या साऱ्याचा उलगडा करण्याचे ठरवले, मात्र तेव्हाच लक्षात आले, की मुंबईत बाईक टॅक्सी सुरू झाली आहे.
बाईक टॅक्सीबाबत परिवहन विभागाने एक मोठा निर्णय घेतला. ओला, उबेरप्रमाणेच मुंबईत आता मुंबईत बाईक टॅक्सीला परवानगी देण्यात आली. आज रॅपिडो व ओला उबेरसारख्या बाईक सर्व्हिस सुरू झाल्या आहेत. पुढे-मागे या स्पर्धेत आणखीही बलाढ्य कंपन्याही उतरतील यात शंका नाही. त्यामुळे वाहतूक कोंडीत तासनतास अडकून पडण्यावर आता पर्याय निर्माण झाला आहे. त्यामुळे मुंबईकरांचा प्रवासही अधिक जलद आणि स्वस्त झाला आहे. मुंबई शहरात रॅपिडोसारख्या कंपन्यांनी या आधी बाईक टॅक्सी सुरू केल्या होत्या. त्याला प्रवाशांचा प्रतिसादही चांगला होता. पण स्थानिक स्तरावर त्याला रिक्षा आणि टॅक्सीवाल्यांच्या रोषाला सामोरं जावं लागण्याचा अनुभव आला. तसेच त्याबाबत सरकारचे धोरणही स्पष्ट नव्हतं. त्यामुळे या कंपन्यांनी त्यांच्या सेवा बंद केल्या. बाईक टॅक्सीमुळे मुंबईकरांचा वेळ आणि पैसा वाचणार आहे. मुंबईच्या रस्त्यांवर दिसणाऱ्या ट्रॅफिकमुळे गर्दीच्या वेळी कामावर किंवा घरी पोहोचण्यासाठी मोठ्या अडचणी निर्माण होतात. त्यांच्यासाठी आता बाईक टॅक्सीचा पर्याय चांगला असेल. त्यामुळे वाहतूक कोंडीच्या समस्येमधून सुटका होण्याची शक्यता आहे. मात्र या बाबतीत प्रवाशांच्या सुरक्षिततेच काय? खरेच वाहतूक क्षेत्रात या बाईक टॅक्सी सेवा क्रांती करतील का? बाईक टॅक्सी सुरू करताना महिला सुरक्षेची विशेष काळजी घेतली जाणार आहे की नाही आणि खरच याबाबतीत सुरक्षिततेच काय? वाहतूक विभागाने तर या बाईक टॅक्सीना परवानगी दिली, मात्र अजूनही ओला उबेर रॅपिडोसारख्या कंपन्या या अनधिकृतपणेच शहरात बाईक, टॅक्सी चालवत आहेत. अजूनही त्यांनी अधिकृतपणे परवाने घेतलेले नाही. जर अधिकृतपणे हे परवाने घेतले तर बऱ्याच गोष्टींच्या नियमांचे त्यांना काटेकोरपणे पालन करावे लागणार आहे. उदाहरणार्थ त्यांना परवानगी देताना फक्त विद्युत दुचाकीच वापरता येणार आहे, मात्र आजही मुंबई शहरात खासगी दुचाकी घेऊन त्याच्यावर अनधिकृतपणे प्रवासी बसूवून प्रवासी वाहतूक केली जात आहे. ई बाईक घेतल्यास तीही खासगी ई बाईक घेता येणार नसून त्याचा व्यवसाय करावा लागत असल्याने त्या सार्वजनिक वाहतूक सेवेतील घ्याव्या लागणार आहेत. म्हणजे त्यांना परमिट गाडी घ्यावी लागणार आहे व ते दरवर्षी नूतनीकरण करावे लागणार आहे.
या बाबी झाल्या गाडी संदर्भात. मात्र प्रवाशांच्या सुरक्षिततेचे काय? सरकारी दिलेल्या नियमाप्रमाणे पुढील व मागील दुचाकी स्वारालाही हेल्मेट सक्तीचे असणार आहे. मात्र आजही खासगी दुचाकीवरून प्रवास केलेल्या वाहतुकीमध्ये प्रवाशाला हेल्मेट घालावे लागत नाही. आजही अनधिकृतपणे सर्वांच्या समोरूनच सर्वांच्या डोळ्यांदेखत ही वाहतूक सुरू आहे. मागील अधिवेशनाच्या काळात विधानसभेत हा मुद्दा उपस्थित झाला होता. मात्र त्याचवेळी पर्यावरण मंत्री यांनी शहरात कुठेही अनधिकृतप्रमाणे बाईक सेवा सुरू नसल्याचा दावा केला होता. मात्र परिवहन मंत्र्यांनी एका नंबरवर कॉल केल्यानंतर थोड्याच वेळात विधानसभेच्या दारातच दुचाकी स्वार येऊन उभा राहिला. त्यावेळी परिवहन मंत्र्यांनी त्याला समज देऊन सोडून दिले होते. मात्र मुंबई शहरातही अनधिकृतपणे दुचाकी टॅक्सी सेवा किती बोकाळली आहे हे लक्षात येत होते. महिला प्रवाशांच्या सुरक्षिततेसाठी तसेच बाईक चालकाला मागे प्रवासी बसवताना बाईकच्या मधोमध पार्टिशन लावणे बंधनकारक असणार आहे. बाईक टॅक्सीसंबंधी धोरण आखताना महिला सुरक्षेला महत्त्व दिल्याचं दिसून येत आहे. मात्र किती गाड्यांना बाईक ड्रायव्हर आणि प्रवासी यांच्यामध्ये एक पार्टिशन आहे. सर्व नियम धाब्यावर बसवून ही वाहतूक बिनदिक्कतपणे सुरू आहे.
या बाईक टॅक्सीना तात्पुरती परवानगी दिल्याने शहरातील बाईक टॅक्सी सेवांना प्रभावीपणे हिरवा कंदील मिळाला आहे. या निर्णयामुळे शेवटच्या मैलापर्यंत कनेक्टिव्हिटी देत मुंबईकरांना एक परवडणारा वाहतूक पर्याय मात्र मिळणार आहे. आजही वाहतूक आणि नगररचना तज्ज्ञांनी शहरातील आधीच गर्दीच्या रस्त्यांवर बाईक टॅक्सी धावू लागल्याने सुरक्षा आणि वाहनांच्या वाढत्या गर्दीची गंभीर चिंता व्यक्त केली आहे. या वर्षात एकट्या मुंबई शहरात ३२ लाख दुचाकी आहे.
बाईक टॅक्सी सुरू झाल्याने या संख्येत दुपटीने वाढ होणार आहे. त्यातच आता जीएसटी कमी झाल्याने दुचाकींच्या किमतीही कमी झाल्या व लोकांनीही त्याचा कसा लाभ घेतला ते यंदाच्या दसऱ्याला दिसून आले आहे. त्यामुळे वाहतूक नियोजनात दीर्घकालीन दृष्टिकोनाचा आजही अभाव आहे हेच दिसते. मुंबईत सध्या बेस्ट बसची संख्या खूपच कमी झाली आहे. त्यामुळे प्रवाशांना बराच वेळ बसकरता वाट पाहावी लागत आहे. बेस्ट बसने एकट्याने प्रवास करणाऱ्या प्रवाशाला बाईक टॅक्सी थोडाफार दिलासा देऊ शकेल मात्र या बाईक टॅक्सी गर्दीत आणखी भर घालतील तसेच जास्त भाडे मिळवण्याच्या किंवा स्पर्धेच्या युगात दुचाकी स्वारांना वळण लावणार तरी कोण यामुळे पादचाऱ्यांबरोबरच दुचाकीवरून मागे बसून प्रवास करणाऱ्यांची सुरक्षितता धोक्यात येणार असून पादचाऱ्यांचीही सुरक्षा धोक्यात येणार आहे. याचे विचार होणे गरजेचे आहे. अतिक्रमणामुळे योग्य पदपथ असलेले मुंबईतील रस्ते आधीच पादचाऱ्यांसाठी आव्हानात्मक बनले आहेत. त्यात पुरेशा सुविधांविषयी बाईक टॅक्सी सुरू केल्याने पादचाऱ्यांची सुरक्षितता आणखी धोक्यात येणार आहे.