
डॉ. सर्वेश : सुहास सोमण
शेअर बाजार हे गुंतवणुकीचे असे क्षेत्र आहे जिथे कित्येक गुंतवणूकदारांनी अत्यंत उत्तम नियोजन करून अतिशय चांगला फायदा मिळविलेला आहे. आपण शेअर बाजारात एखादा शेअर खरेदी केल्यावर त्यात वाढ झाली आणि त्यानंतर वाढलेल्या किंमतीला जर आपण तो शेअर विकला तर आपणाला फायदा होत असतो. उलट जर खरेदी केलेल्या किंमतीपेक्षा जर कमी किंमतीला शेअर विकला तर आपणास तोटा होत असतो. शेअर बाजारात या खरेदी आणि विक्रीत अत्यंत महत्वाची भूमिका असते तो म्हणजे ‘स्टॉपलॉस’.
‘स्टॉपलॉस’ या शब्दातच त्याचा अर्थ दडलेला आहे. सरळ भाषेत बोलायचे झाल्यास नुकसान थांबविणे किंवा टेक्निकल भाषेत लॉस बुक करणे असा याचा अर्थ होतो. ‘स्टॉपलॉस’ हा टेक्निकल अॅनालिसिस करून ठरवला जातो. “स्टॉपलॉस” म्हणजे एखाद्या शेअर्सची अशी पातळी की, जर त्या पातळीच्या किंवा किंमतीच्या खाली जर तो शेअर आला तर त्या शेअरमध्ये आणखी मोठी घसरण होऊ शकते. आणि जर त्या पातळीच्या खाली आल्यावर आपण “लॉस बुक” केला नाही तर परिणामी आपण केलेल्या त्या गुंतवणुकीत आपले नुकसान आणखी वाढू शकते.
बऱ्याचदा अनेक नावे आणि जुने गुंतवणूकदार स्टॉपलॉसचा वापर करताना दिसत नाहीत आणि त्यामुळे त्यांना होत असलेल्या नुकसानीपेक्षा अधिक नुकसान सहन करावे लागते. कित्येकदा अनेक गुंतवणूकदार टेक्निकल दृष्ट्या स्टॉपलॉस काय येतोय हे न पाहता आपल्या मनानेच स्टॉपलॉस ठेवतात आणि नुकसान करून घेतात. या उलट चतुर गुंतवणूकदार परिपूर्ण अभ्यास, संयम, योग्य नियोजन आणि स्टॉपलॉसचा योग्य वापर करून शून्यातून आपले विश्व उभे करतात. त्यामुळे माझ्या मते स्टॉपलॉस हा शेअर बाजारात खरेदी विक्री करीत असताना खऱ्या अर्थाने किंग मेकरची भूमिका बजावतो.
निर्देशांकाची दिशा ही तेजीची असून अल्पमुदतीच्या चार्टनुसार निर्देशांक निफ्टीची २४,५८० ही अत्यंत महत्वाची खरेदीची पातळी आहे. अत्यंत महत्वाच्या असणाऱ्या या पातळीवर आहे तोपर्यंत निर्देशांक मधील तेजी टिकून राहील.
पुढील काळाचा विचार करता कॅनरा बँक, मुथूट फायनान्स, बँक ऑफ बडोदा, हिंदाल्को, टाटा इन्व्हेस्ट यासह अनेक शेअर्सची दिशा टेक्निकल अँनालीसीसनुसार तेजीची आहे. पुढील २ आठवड्यांचा विचार करता कमीत कमी जोखीम घेऊन व्यवहार करणे हेच योग्य ठरेल. व्यवहार करत असताना योग्य तो स्टॉपलॉस लावूनच व्यवहार करा.
सर्वात जास्त जोखीम ही इक्वीटी मार्केटच्या तुलनेत डेरीव्हेटीव मार्केट अर्थात फ्युचर आणि ऑप्शन प्रकारात जास्त असते त्यामुळे त्या ठिकाणी अत्यंत काळजीपूर्वक व्यवहार करणे आवश्यक आहे.
मी माझ्या लेखमालेतील १७ जुलै २०२३ च्या लेखात ‘झोमॅटो’ या शेअरने ८० ही अत्यंत महत्वाची पातळी तोडत तेजीचे संकेत दिलेले आहेत हे सांगितलेले होते. त्यामुळे मध्यम मुदतीच्या चार्टनुसार तेजी सांगणारी विशेष रचना तयार झालेली असून ८२.५० रुपये किंमतीला असणाऱ्या या शेअरमध्ये अल्प तसेच मध्यम मुदतीसाठी तेजीचा व्यवहार केल्यास हा चांगली वाढ दाखविणे अपेक्षित आहे हे सांगितलेले होते.
मी सांगितल्यापासून या शेअरने या महिन्यात ३४३ हा उच्चांक नोंदविलेला आहे. टक्केवारीत पाहायचे झाल्यास या शेअरमध्ये ३०० पेक्षा जास्त टक्क्यांची महावाढ झालेली आहे. (सूचना : लेखकाची तसेच त्यांच्या जवळच्या नातेवाइकांची लेखात सूचवित असलेल्या शेअर्समध्ये कोणतीही गुंतवणूक नाही.)