नवी दिल्ली : सर्वोच्च न्यायालयात धक्कादायक घटना घडली. एका वकिलाने सरन्यायाधीशांवर वस्तू फेकून हल्ला केला. या हल्ल्यातून सरन्यायाधीश बचावले. ते सुखरुप आहेत. हल्लेखोर वकिलाला पोलिसांनी ताब्यात घेतले आहे. सरन्यायाधीशांवर हल्ला केल्याप्रकरणी पोलीस वकिलाची कसून चौकशी करत आहेत. या प्रकरणाचा तपास सुरू आहे.
आठवड्याच्या पहिल्याच दिवशी ६ ऑक्टोबर रोजी सोमवारी सकाळी सरन्यायाधीश बी. आर. गवई यांच्यावर एका वकिलाने हल्ला करण्याचा प्रयत्न केला. हल्ला करणाऱ्या वकिलाचे नाव राकेश किशोर असून त्यांनी चालू सुनावणी दरम्यान सरन्यायाधीशांच्या दिशेने बूट फेकला. सुरक्षा कर्मचाऱ्यांनी तात्काळ हल्ला करणारे वकील राकेश यांना ताब्यात घेतले. खजुराहोतील भगवान विष्णूंच्या नवीन मूर्तीच्या जीर्णोद्धार प्रकरणात सरन्यायाधीशांनी केलेल्या वक्तव्यामुळे हा हल्ला केल्याचे सांगितले जात आहे. न्यायालयातून बाहेर पडताना 'सनातन धर्माचा अपमान सहन करणार नाही' असे राकेश किशोर यांनी ओरडून सांगितले.
मध्य प्रदेशातील खजुराहो येथे भगवान विष्णूच्या सात फूट उंच शिरच्छेदित पुतळ्याच्या जीर्णोद्धाराबाबत याचिका करण्यात आली होती. मात्र सरन्यायाधीशांनी ही याचिका फेटाळून लावली. तसेच "जा आणि देवाला स्वतःहून ते करायला सांगा. तुम्ही भगवान विष्णूचे कट्टर भक्त असल्याचा दावा करता, म्हणून जा आणि त्यांची प्रार्थना करा", या शब्दात निर्णय दिला. या निर्णयावर याचिकाकर्त्यांमध्ये नाराजी दिसुन आली. तसेच हिंदूंच्या धार्मिक भावना दुखावल्याचेही याचिकाकर्त्यांचे मत होते. याच नाराजीतून वकील राकेश किशोर यांनी हे कृत्य केल्याचे सांगितले जात आहे. या घटनेनंतर,सरन्यायाधीशांनी न्यायालयात उपस्थित असलेल्या वकिलांना त्यांचे युक्तिवाद सुरू ठेवण्यास सांगितले. "या सर्व गोष्टींची काळजी करू नका. या गोष्टींचा माझ्यावर परिणाम होत नाही," असे गवई यांनी सांगितले. तर खजुराहो येथील विष्णू मंदिराबाबत केलेल्या टिप्पणीला समाज माध्यमांनी ज्या पद्धतीने सादर केले त्यामुळे या प्रकाराला वेगळे वळण मिळाले, असेही सरन्यायाधीशांनी सांगितले.