
मुंबई : दाक्षिणात्य अभिनेता आणि दिग्दर्शक रिषभ शेट्टी दिग्दर्शित कांतारा चॅप्टर १ हा चित्रपट २ ऑक्टोबर रोजी देशभर प्रदर्शित करण्यात आला. याआधी २०२२ मध्ये प्रदर्शित झालेल्या कांतारा या चित्रपटाचा हा पुढील भाग आहे. कांतारा चॅप्टर १ चित्रपटातील दर्जेदार व्हीएफएक्स, कथानक, संगीत, पार्श्वसंगीत आणि रिषभ शेट्टीच्या अभिनयामुळे अवघ्या तीन दिवसात या चित्रपटाने २०० कोटींपर्यंतचा टप्पा गाठला आहे. असा अहवाल इंडस्ट्री ट्रॅकर सॅकनिल्कने दिला आहे. त्यामुळे कांतारा चॅप्टर १ ने चित्रपटसृष्टीमध्ये दिमाखात एन्ट्री केली असून कमाईच्या बाबतीत यापूर्वी प्रदर्शित झालेल्या चित्रपटांना मागे टाकले आहे.
कांतारा चॅप्टर १ ने प्रदर्शनाच्या पहिल्याच दिवशी ८८ कोटींचा गल्ला भरला. आठवड्याच्या सरतेला म्हणजे शनिवारी सुमारे ५५ कोटी रुपये कमाई केली. हा आकडा शुक्रवारच्या कमाईपेक्षा जवळजवळ २० टक्क्यांनी जास्त आहे. तर रविवारी प्रेक्षकांनी भरघोस प्रतिसाद दिल्यामुळे चित्रपटाने ६१.०० कोटी रुपयांची कमाई केली. ज्यामुळे भारतात या चित्रपटाची एकूण कमाई १६२.८५ कोटी रुपयांपर्यंत पोहोचली आहे. तर जागतिक स्तरावर या चित्रपटाने २५० कोटींचा मोठा टप्पा पार केला आहे. त्यामुळे चित्रपटाचा निर्मिती खर्च भरुन निघाल्याची चर्चा मनोरंजनसृष्टीत आहे. चित्रपटाच्या या दिमाखदार कमाईमुळे बॉलिवुडमधील छावा, सैयारा या चित्रपटांचा बॉक्स ऑफिस रेकॉर्ड मागे पडला आहे.
चित्रपटात रिषभ शेट्टी सोबतच रुक्मिणी वसंत, जयराम, गुलशन देवैया आणि प्रमोद शेट्टी यांच्या मुख्य भूमिका आहेत. महत्त्वाचे म्हणजे हा चित्रपट जगभरातील चित्रपटगृहांमध्ये इंग्रजी आणि हिंदी या भाषांसह कन्नड, तेलुगू, मल्याळम, तमिळ आणि बंगाली सारख्या अनेक प्रादेशिक भाषांमध्ये प्रदर्शित केल्याने सर्व भाषिकांना आपल्या सोयीनुसार चित्रपट पाहण्याचा आनंद घेता येत आहे.