Monday, October 6, 2025

केरळच्या सुप्रसिद्ध मंदिरात सोन्याची चोरी, SIT चौकशीचा न्यायालयाचा आदेश

केरळच्या सुप्रसिद्ध मंदिरात सोन्याची चोरी, SIT चौकशीचा न्यायालयाचा आदेश

तिरुवनंतपुरम : सबरीमाला मंदिर पर्यटनाच्या दृष्टीने केरळसाठी फार महत्त्वाचे आहे. सोन्याचा गाभारा आणि इतर स्थापत्याला दिलेला सोन्याचा मुलामा हे या मंदिराचे वैशिष्ट्य असल्याने अनेक पर्यटकांसाठी ते आकर्षणाचे केंद्रबिंदू आहे. मात्र या मंदिरातील सोने गायब झाल्याचा धक्कादायक प्रकार समोर आला आहे. सबरीमाला मंदिरातील तांब्याच्या धातूने घडवलेल्या द्वारपालाच्या मूर्तींना सोन्याचा मुलामा देण्यात आला होता. मात्र यावरील सोने काही प्रमाणात गायब झाल्याचे समजले आहे. याबाबत केरळ उच्च न्यायालयात याचिका दाखल करण्यात आली होती. उच्च न्यायालयाने याचिकेची दखल घेऊन एसआयटी स्थापन करण्याचे आणि चौकशी करण्याचे निर्देश दिले. आता या प्रकरणाची सखोल चौकशी अपेक्षित आहे.

सबरीमाला मंदिर प्रकरणाच्या तपासणीसाठी उच्च न्यायालयाने पथकाचे नेतृत्व करण्यासाठी पोलिस अधीक्षक एस. ससिधरन यांची नियुक्ती केली आहे. तर पथकाच्या कामकाजाचे पर्यवेक्षण अतिरिक्त पोलिस महासंचालक एच.वेंकटेश करणार आहेत. या तपासाला त्रावणकोर देवस्वोम बोर्डाने पूर्ण सहकार्य करावे, असेही निर्देश न्यायालयाने दिले आहेत.

सोन्याचा मुलामा दिलेल्या तांब्याच्या पत्र्यांच्या नोंदींनुसार, २०१९ मध्ये त्यांना नव्याने सोन्याचा मुलामा देण्यासाठी चैन्नईला पाठवण्यात आले होते. तेव्हा त्यांचे वजन ४२.८ किलोग्रॅम होते. तथापि, न्यायालयाने असे निरीक्षण नोंदवले की,जेव्हा त्यांना नवीन सोन्याचा मुलामा देण्यात आला तेव्हा त्याचे वजन ३८.२५८ किलोग्रॅम होते. त्यामुळे उर्वरीत ४.४५ किलोग्रॅम सोने कुठे गायब झाले याबाबत तपासणी करण्यात येणार आहे.

Comments
Add Comment