मुंबई (खास प्रतिनिधी) : मुंबई महानगरपालिकेच्या उद्यानांमध्ये अधिकाधिक प्रमाणात जैवविविधतेचे संवर्धन व्हावे या उद्देशाने वीरमाता जिजाबाई भोसले वनस्पती उद्यान आणि प्राणिसंग्रहालय येथे बुधवारी ८ ऑक्टोबर २०२५ रोजी कार्यशाळेचे आयोजन करण्यात आले आहे. मुंबईत हरित क्षेत्रे, उद्याने तसेच रस्त्यांवरील वाहतूक बेटांवर स्थानिक प्रजातींच्या संवर्धनावर भर देण्यासाठी कोणकोणत्या उपाययोजना करता येतील, यावर या कार्यशाळेत सविस्तर चर्चा होणार आहे. जागतिक वन्यजीव सप्ताह निमित्ताने आणि वर्ल्ड रिसोर्सेस इन्स्टिट्यूट यांच्या सहकार्याने प्राणिसंग्रहालयातील थ्रीडी ऑडिटोरिअममध्ये सकाळी ९.३० वाजेपासून सायंकाळी ५.३० वाजेपर्यंत ही कार्यशाळा आयोजित करण्यात आली आहे.
महानगरपालिका आयुक्त तथा प्रशासक भूषण गगराणी, अतिरिक्त आयुक्त (पूर्व उपनगरे) डॉ. अमित सैनी यांच्या मार्गदर्शनाखाली तसेच उप आयुक्त (उद्याने) अजितकुमार आंबी यांच्या देखरेखीखाली या कार्यशाळेचे नियोजन करण्यात आले आहे.
हरित क्षेत्रे आणि जैवविविधता संवर्धनाबाबत मुंबईकरांमध्ये जागरूकता वाढावी, यासाठी ही कार्यशाळा होत आहे. या कार्यशाळेत महानगरपालिकेचा उद्यान विभाग, पर्यावरण विभाग आणि मुंबई किनारी रस्ता यांसह मुंबई महानगर प्रदेश विकास प्राधिकरण, महाराष्ट्र गृहनिर्माण व क्षेत्रविकास प्राधिकरण, महाराष्ट्र राज्य रस्ते विकास महामंडळ आणि मुंबई बंदर पोर्ट या प्राधिकरणांचेही पदाधिकारी सहभागी होणार आहेत. तसेच जैवविविधता संवर्धन क्षेत्रातील तज्ज्ञांकडूनही मार्गदर्शन मिळणार आहे, अशी माहिती उद्यान अधीक्षक जितेंद्र परदेशी यांनी दिली आहे.