हिवाळ्यात खोबरेल तेल का गोठते?

कथा : प्रा. देवबा पाटील


भारतीय विज्ञान संस्थेमधील आनंदराव हे सेवानिवृत्त वैज्ञानिक होते. ते नेमाने दररोज सकाळी त्यांच्या शेतावर फिरायला जायचे. ते हिवाळ्याचे दिवस होते. त्या दिवशी त्यांच्या नातवाचा स्वरूपचा १२ वा वाढदिवस होता. कधीच लवकर न उठणारा स्वरूप या वाढदिवशी लवकर उठला. बघतो तर आजोबा पायात बूट घालीत घराबाहेर पडण्याच्या तयारीत होते. त्यांना बघताच स्वरूप म्हणाला, “आजोबा! एवढ्या सकाळी सकाळी इतक्या मोठ्या थंडीत तुम्ही कोठे निघालात हो?”
“फिरायला जातो बाळा.” आनंदराव म्हणाले.
“आजोबा मी येऊ का तुमच्यासोबत फिरायला?” स्वरूपने विचारले.
ते आनंदाने म्हणाले, “हो हो! चल. पण आधी आईबाबांना विचार. अंगात स्वेटर घाल नि कानाला मफलर बांध. कारण बाहेर खूप थंडी पडली आहे. तसेच हातमोजेही घे आणि पायातही बूट व मोजेही घाल.” आनंदरावांनी स्वरूपला सांगितले. स्वरूपने आईजवळून या सर्व गोष्टी आणून आजोबांच्या सहकार्याने तशी जय्यत तयारी केली.
स्वरूप आपल्या आजोबांसोबत फिरायला निघाला. फिरताना “हिवाळ्यात खोबरेल तेल गोठते पण खाण्याचे तेल का गोठत नाही, आजोबा?”
स्वरूपने विचारले.
“तुला पदार्थाचा गोठणबिंदू म्हणजे काय असतो हे माहीत आहे का?” आजोबांनी नातवाची बुद्धी तपासण्यासाठी मुद्दामहून प्रश्न टाकला.
“हो. ज्या तापमानाला द्रव पदार्थ घनरूपात बदलतो त्याला त्याचा गोठणबिंदू म्हणतात.” स्वरूपने आनंदात उत्तर दिले.
‘बरोबर.’ आजोबा म्हणाले, “तू खरंच अभ्यासू मुलगा आहेस. ज्या तापमानाला घन पदार्थाचे द्रवामध्ये रुपांतरण होऊ लागते त्या तापमानाला विलयबिंदू म्हणतात. अर्थात त्याच तापमानाला द्रवरूप पदार्थाचे घनीभवनसुद्धा होऊ लागते त्यामुळे त्याच तापमानाला गोठणबिंदूसुद्धा म्हणतात.”
“म्हणजे पदार्थाचा वितळनबिंदू व गोठणबिंदू एकच असतो तर?” स्वरूपने शंका विचारली.
“हो. वितळनबिंदू म्हणजे विलयबिंदू व गोठणबिंदू एकच आहेत.” आनंदराव सांगू लागले, “जर पदार्थाचा विलयबिंदू हा सभोवतीच्या तापमानापेक्षा जास्त असेल तर तो पदार्थ घनावस्थेत राहतो. पण हा विलयबिंदू जर सभोवतीच्या तापमानापेक्षा कमी असला तर तो द्रवरुपात राहतो. हिवाळ्याच्या दिवसात सभोवतीच्या वातावरणाचे तापमान १०० से. ते २०० से. असते. आपण डोक्याला लावतो त्या खोबरेल तेलात तृप्त मेदाम्ले असतात. हिवाळ्याच्या दिवसात कमी तापमानामुळे त्या मेदाम्लांतील हायड्रोजनचे अणू हे एकमेकांच्या जास्त जवळ येतात व ते आपसात एक विशिष्ट प्रकारचा सशक्त असा बंध निर्माण करतात. त्यामुळे हिवाळ्यात तापमान कमी झाल्यामुळे ते लवकर गोठते. खोबरेल तेलाचा गोठणबिंदू अर्थात विलयबिंदू हा जास्त म्हणजे २५० से. असतो. म्हणजे त्याचे बंध तोडून ते खोबरेल तेल वितळायला जे २५० से. तापमान पाहिजे तेवढे हिवाळ्यात भेटत नाही. म्हणून ते हिवाळ्यात गोठलेलेच राहते; परंतु खाण्याच्या गोड्या तेलाचा गोठणबिंदू म्हणजे विलयबिंदू हा त्या तुलनेत बराच कमी असतो. त्यामुळे ते लवकर गोठत नाही.”
आज ते दुस­ऱ्या वेगळ्या रस्त्याने परत आले. त्या रस्त्याने परत येत असताना त्यांना एक विहीर दिसली.
“आजोबा विहिरीत पाणी कसे येते?” स्वरूपने प्रश्न केला.
आजोबा म्हणाले, “पावसाचे बरेचसे पाणी वाहून जाते व काही मातीच्या कणांमधून जमिनीतसुद्धा मुरते. झाडांच्या खोल गेलेल्या मुळांमुळे जमिनीत फटी निर्माण होतात. त्यांद्वारेसुद्धा पाणी जमिनीत मुरते. ठिसूळ खडकांमधूनही पाणी जमिनीत जाते. कठीण खडकांच्या व जमिनीच्या मीलनरेषांवरूनसुद्धा जमिनीत पाणी शिरते. या पाण्याचे जमिनीत प्रवाह तयार होतात. काही खडकांमध्ये पोकळ्या असतात त्यामध्ये हे पाणी साठून राहते. याच पाण्याला भूजल म्हणतात. विहीर खोदल्यानंतर हेच पाणी विहिरीत येते,” असे बोलत बोलत ते परत येत येत गावाजवळ पोहोचलेच होते.
अशा रीतीने ज्ञानविज्ञानवर्धक गप्पाटप्पा करीत ते दोघे परत आले.

Comments
Add Comment

तुंबरू

महाभारतातील मोतीकण : भालचंद्र ठोंबरे नारायण! नारायण! करीत त्रिलोकांत भ्रमण करणाऱ्या देवर्षी नारदमुनींची

जीवनदान

प्रासंगिक : डॉ. विजया वाड उदयाचल हायस्कूल, गोदरेज, विक्रोळी-पूर्व ही अशिया खंडातील तिसऱ्या क्रमांकाची शाळा ! इथे

एकजूट

जीवनगंध : पूनम राणे श्रीनिवास नावाची चाळ होती. अनेक वर्षांपासून वेगवेगळ्या जाती जमातीचे लोक तिथे राहत होते.

आत्मविश्वास हाच खरा अलंकार

संस्कृतीचा गोडवा : पूर्णिमा शिंदे व्यक्तिमत्त्व विकासामध्ये आत्मविश्वास सर्वात महत्त्वाचा आहे. आत्मविश्वास

मुलगी झाली हो...

क्राइम : अॅड. रिया करंजकर सुरेखा ही दोन भावांची एकुलती एक बहीण. घरामध्ये सर्वांची लाडकी पण लहानपणापासूनच तिला

कचऱ्यातून कला

प्रतिभारंग : प्रा. प्रतिभा सराफ आमची आई शाळेत शिक्षिका होती. आम्हा मुलींना सांभाळून घर-संसार सांभाळणे म्हणजे