खरे धाडस

कथा : रमेश तांबे


पावसाळ्याचे दिवस होते. भरपूर पाऊस पडत होता. ओढे-नाले-नद्या दुथडी भरून वाहत होत्या. सारे जंगल पाणीमय झाले होते. जंगलातले असंख्य प्राणी भीतीने घाबरून गेले होते. पक्ष्यांनी झाडांचा आश्रय घेतला होता. पण किती दिवस पावसात भिजत राहणार.


मग सगळे प्राणी एका उंच टेकडीवर जमले. जसे गवत खाणारे प्राणी आले, तसे मांस खाणारेदेखील आले. आता कुणाला कुणाची भीती वाटत नव्हती. कारण प्रश्न सगळ्यांच्या जीवनमरणाचा होता. त्यामुळे लांडग्याच्या बाजूला ससा आणि वाघाच्या बाजूला हरिण उभे होते. प्रत्येकाच्या डोळ्यांत भीती दाटली होती. कारण असाच पाऊस चालू राहिला तर ही टेकडीसुद्धा पाण्याखाली जाणार होती. सगळेच प्राणी चिंताक्रांत होते.


अशावेळी एक छोटा हत्ती मोठं धाडस करीत म्हणाला, “आपले सिंह महाराज कुठे आहेत? ते आपले राजे आणि आपण त्यांची प्रजा. मग त्यांनी आपली राहण्याची काहीतरी सोय केली पाहिजे.” छोट्या हत्तीच्या आईने त्याला नजरेनेच ‘गप्प बस’ असा इशारा दिला. तोच सिंह महाराजांची गर्जना ऐकू आली. तशा वातावरणातही सगळे प्राणी अगदी घाबरून गेले. कारण जेव्हा महाराज रागावलेले असतात तेव्हा अशा प्रकारची ते गर्जना करतात. त्यामुळे जो तो छोट्या हत्तीकडे बघू लागला. कारण त्याने महाराजांना त्यांच्या कर्तव्याची जाणीव करून दिली. हा महाराजांचा अपमान आहे आणि म्हणूनच सिंह महाराज चिडले आहेत असं सगळ्यांना वाटत होतं.


आता मात्र छोट्या हत्तीची आई घाबरली. सिंह महाराज आपल्या बाळाचं काही बरं वाईट तर करणार नाही ना? अशी तिला भीती वाटू लागली. तेवढ्यात मोठ्या ऐटीत आपली भलीमोठी आयाळ हलवीत, डौलदार पाय टाकीत सिंह महाराज गर्जना करीतच टेकडीवर आले. ते पावसात भिजू नये म्हणून एका जिराफाने त्यांच्या डोक्यावर पानांची छत्री धरली होती. महाराजांसोबत त्यांचे मंत्रीदेखील हजर होते. सर्वजण टेकडीवर पोहोचले. तशी पावसाने विश्रांती घेतली.


मग प्रधानमंत्री लांडगे दादा पुढे आले आणि त्यांनी बोलायला सुरुवात केली. तसा छोटा हत्ती लपून बसण्याऐवजी पुढे आला आणि सिंह महाराजांच्या नजरेला नजर भिडवू लागला. त्यांच्याकडे बघत राहिला. महाराजांना त्यांच्या कर्तव्याची आठवण करून देणारा कोण होता? कोणी केली ही हिंमत? कोण आहे तो? त्यांनी समोर यावं! तसे सगळे प्राणी घाबरले. आता छोट्या हत्तीचे काही खरे नाही याची जाणीव सगळ्यांनाच झाली. छोट्या हत्तीची आई तर खूपच घाबरली. जो तो छोट्या हत्तीकडे टकामका बघू लागला. मग छोटा हत्तीच म्हणाला,” होय मीच तो!”


छोटा हत्ती सांगू लागला, “खूप पाऊस पडतोय. सगळं जंगल पाण्याखाली गेलंय. कित्येक जण वाहून गेलेत. भीतीचं प्रचंड वातावरण सगळीकडे असताना सिंह महाराजांकडून कोणतीही मदत आम्हाला मिळाली नाही. साधी चौकशीदेखील कोणी केली नाही. शेवटी आम्ही आहोत म्हणून आपल्या राजेपणाला अर्थ आहे. आम्हीच नसलो तर राजेपण काय कामाचं!”


छोट्या हत्तीचे विचार ऐकून महाराजांना खूप आश्चर्य वाटले. ते उभे राहिले. त्यांनी छोट्या हत्तीचे कौतुक केले आणि म्हणाले, “माझ्या प्रजाजनहो, या छोट्याने धाडस केले. राजाला प्रश्न विचारले. त्यांच्या कर्तव्याची जाणीव करून दिली. खरोखरच मीदेखील आता निर्णय घेतलाय. जंगलातल्या सर्व प्राण्या-पक्ष्यांना राहता येईल एवढी मोठी जागा आपल्याकडे आहे. आपण सगळ्यांनी तिथंच राहावं. तिथं आपल्या खाण्यापिण्याची सोय केलेली आहे.” हे ऐकून साऱ्यांना खूप आनंद झाला. सगळ्यांनी महाराजांबरोबरच छोट्या हत्तीचेही आभार मानले. शेवटी राजा म्हणाला, “माझ्या प्राणी मित्रांनो, आपण बोललं पाहिजे. कोणी कितीही मोठा असू द्या; राजा असो, मंत्री असो वा कोणी सरकारी अधिकारी त्याला आपण प्रश्न विचारले पाहिजेत. लोकशाही पद्धतीचा राज्यकारभार हेच तर आपल्या राज्याचे वैशिष्ट्य आहे. आपली नवी पिढी अधिक जागरूक आहे. ती प्रश्न विचारते याचा मला खूप आनंद आहे.” छोट्या हत्तीच्या आईला आपल्या मुलाचा खूप खूप अभिमान वाटला.

Comments
Add Comment

बोलल्याप्रमाणे वागावे

लहानशा गोष्टी, मोठा अर्थ : शिल्पा अष्टमकर “माणसाला त्याच्या बोलण्यावरून नव्हे तर कृतीवरून ओळखले जाते” असे आपण

मनाचा मोठेपणा

कथा : रमेश तांबे शाळेत भाषण स्पर्धेचे आयोजन केले होते. विद्याधरने नेहमीप्रमाणे आपले नाव स्पर्धेसाठी दिले होते.

सहकार्य

कथा : प्रा. देवबा पाटील आदित्यने आधीपासूनच सुभाषला काहीतरी मदत करण्याचा आपल्या मनाशी ठाम निश्चय केलेला होताच.

प्रार्थना

प्रतिभारंग : प्रा. प्रतिभा सराफ शैक्षणिक, सांस्कृतिक, सामाजिक, अध्यात्मिक, कला-क्रीडा अशा संस्थांमध्ये

फुलासंगे मातीस वास लागे

लहानशा गोष्टी, मोठा अर्थ : शिल्पा अष्टमकर माणसाच्या आयुष्यात संगतीचे महत्त्व फार मोठे असते. एखाद्या व्यक्तीचा

फुलांचा राजा

कथा : रमेश तांबे फार फार वर्षांपूर्वीची गोष्ट. इंद्रदेवाने फुलांची एक स्पर्धा भरवली होती. सर्व छोटी-मोठी फुले