कोकण आयकॉन : सतीश पाटणकर
रामकृष्ण गोपाळ भांडारकर हे संस्कृत पंडित, मराठी शिक्षणतज्ज्ञ, समाजसुधारक व प्रार्थना समाजाचे कार्यकर्ते होते. त्यांचे मूळ आडनाव पत्की तथापि त्यांचे पूर्वज खजिन्यावर अधिकारी होते म्हणून ‘भांडारकर’ हे नाव पडले. आजोबा लाडो विठ्ठल शिरस्तेदार म्हणून अव्वल इंग्रजीत पुढे आले. वडील महसूल खात्यात होते. त्यांच्या मातोश्रींचे नाव रमाबाई. त्यांचे चुलते विनायक भांडारकर हे पुनर्विवाहाचे पुरस्कर्ते व क्रियाशील सुधारक होते. भांडारकर घराणे मूळ वेंगुर्ल्याचे. तेथील त्यांच्या वास्तूत आज रमा-गोपाळ कन्यशाळा आहे.
भांडारकरांचा जन्म मालवणचा. मालवण, राजापूर व रत्नागिरी येथे आरंभीचे काही शिक्षण घेतल्यानंतर मुंबईच्या एलफिन्स्टन इन्स्टिट्यूटमधून हायस्कूलची परीक्षा ते उत्तीर्ण झाले व नंतर त्या इन्स्टिट्यूट कॉलेजचा अभ्यासक्रमही त्यांनी पूर्ण केला. पुढे मुंबई विद्यापीठाचे बी.ए. व एम. ए. या परीक्षा ते उत्तीर्ण झाले. मुंबई व पुणे येथील जुन्या विद्वान शास्त्री पंडितजवळ न्याय, व्याकरण, वेदान्त इत्यादींचा चांगला अभ्यास केला. हैदराबाद (सिंध) व रत्नागिरी येथील हायस्कूलचे मुख्याध्यापक म्हणून त्यांनी उत्कृष्ट कार्य केले. संस्कृतची दोन शालेय पाठ्यपुस्तके (प्रथम इंग्रजी व पुढे मराठी माध्यमातून) तयार केली. यामुळे हजारो विद्यार्थ्यांना संस्कृत शिकता आले. पुणे डेक्कन कॉलेजमध्ये संस्कृतचे प्राध्यापक म्हणून यशस्वी नोकरी केल्यावर १८९३ मध्ये ते सेवानिवृत्त झाले.
त्यानंतरही त्यांनी संस्कृतचा व्यासंग चालूच ठेवला. कित्येक यूरोपीय पंडितांनी संस्कृत व इतर प्राच्य भाषा यांचे त्यांच्या दृष्टिकोणातून संशोधन चालविले होते. भांडरकरांनी संस्कृतच्या ह्या अध्ययनाला नवे चिकित्सक व निःपक्षपाती संशोधनाचे स्वरूप दिले. १८७४ साली लंडन येथे भरलेल्या आंतरराष्ट्रीय प्राच्यविद्या परिषदेत नाशिक शिलालेखासंबंधी त्यांचा निबंध वाचला गेला. १८८५ मध्ये जर्मनीतील गटिंगन विद्यापीठाने त्यांना पीएच्. डी. अर्पण केली. १८८६ साली व्हिएन्ना येथे ‘क्राँग्रेस आॅफ ओरिएंटॅलिस्टस’ भरली, तिला भारतीय प्रतिनिधी म्हणून ते उपस्थित राहिले. मुंबईच्या एलफिन्स्टन कॉलेजमध्ये १८७९ पर्यंत ते संस्कृतचे प्राध्यापक होते. मुंबई विद्यापीठचे अधिछात्र व सिंडिकेटचे सदस्य म्हणून कामगिरी बजाविल्यानंतर ते कुलगुरू झाले. १९०४ मध्ये एल्एल्. डी. ही पदवी त्यांना मिळाली.
‘रॉयल एशियाटिक सोसायटी’, लंडन व मुंबई, ‘जर्मन ओरिएंटल सोसायटी’, ‘अमेरिकन ओरिएंटल सोसायटी’ इटली येथील ‘एशियाटिक सोसायटी’, सेंट पीटर्झबर्ग येथील ‘इंपिरिअल अॅकॅडमी आॅफ सायन्स’ इ. जगप्रसिद्ध संस्थांनी भांडारकरांना सदस्यत्व दिले. अनेक संस्कृत हस्तलिखितांसंबंधी त्यांनी संशोधनात्मक लेख लिहिले. प्राचीन भारतीय ज्ञानभांडाराला जागतिक प्रसिद्धी व प्रतिष्ठा मिळवून दिली. धर्म हा भांडारकरांच्या आस्थेचा व चिंतनाचा खास विषय होता. सामाजिक सुधारणांना धर्माचा व नीतीचा पाया द्यावा म्हणून परमहंस सभेतून १८६७ साली प्रार्थना समाजाची स्थापना झाली. प्रत्यक्षाप्रत्यक्ष परमहंस सभेशी पूर्वसंबंधित असल्यामुळे १८६९ साली रामकृष्णपंत प्रार्थना समाजाचे सभासद झाले. भक्तिपर कविता आणि पदे रचिली. या कामगिरीमुळे भांडारकर हे प्रार्थना समाजाचे वैचारिक संस्थापक मानले जातात.
स्त्रिया, शुद्रातिशुद्र यांचे शिक्षण, बालविवाहप्रतिबंध, विधवाविवाह, संमतीवयाचा पुरस्कार, अस्पृश्यतानिवारण, मद्यपानबंदी, देवदासी पद्धतबंदी इ. सामाजिक सुधारणा व्हाव्यात म्हणून भांडारकरांनी अविरत श्रम केले. सामाजिक परिषदेच्या कार्यात भागही घेतला. हे सर्व कार्य करीत असताना त्यांना विरोध होऊन त्यांचा छळही झाला. त्यांचा स्वभाव निःस्पृह व निर्भीड होता. ते करारी व कडक असले, तरी अंतःकरणातून मऊ होते.
१९०३ मध्ये व्हाॅइसरॉयच्या लेजिस्लेटिव्ह कौन्सिलचे ते सदस्य होते. १९०४-०८ ह्या कालखंडात प्रांतिक लेजिस्लेटिव्ह कौन्सिलमध्येही ते होते. १९११ मध्ये भरलेल्या दिल्ली दरबारप्रसंगी त्यांना ‘सर’ हा किताब देण्यात आला. त्यांची वृत्ती नेमस्त होती. न्या. रानडे हयात असताना त्यांच्या सर्वांगीण कार्याला त्यानी साथ दिली व नंतरही प्रार्थना समाज आदी करून अनेक संस्थांची धुरा वाहिली. उक्ती व कृती ह्यांचा जीवनात प्रत्यक्ष मेळ घालण्याचा अविरत प्रयत्न त्यांनी केला.
अर्ली हिस्टरी ऑफ डेक्कन, वैष्णविझम, शैविझम अँड अदर मायनर रिलिजन्स, ए पीप इनट् द अर्ली हिस्टरी ऑफ इंडिया, कलेक्टेड वर्क्स ऑफ आर. जी. भांडारकर इ. त्यांसची विपुल ग्रंथसंपदा त्यांच्या विद्वत्तेची साक्ष देते. एवढेच नव्हे, तर प्राचीन भारताचा सुसंगत पुराव्यांच्या आधारे इतिहास कसा शोधून काढावा, ऐतिहासिक घटनांचा प्रमाणशुद्ध अर्थ कसा लावावा, याचा उत्कृष्ट नमुना त्यांच्या ऐतिहासिक लेखनात सापडतो. त्यामुळे त्यांचे ग्रंथ हे भारताच्या प्राचीन इतिहासाचे आधारभूत ग्रंथ म्हणून स्वीकारले जातात. प्राचीन भारतातील विविध धार्मिक संप्रदायांचा आणि विविध धार्मिक तत्त्वज्ञानांचा संगतवार इतिहास दाखविण्याचे महत्त्वाचे कार्य भांडारकरांनी लिहिलेल्या संशोधनपर ग्रंथांनी केलेले आहे.
प्रार्थना समाज महाराष्ट्रातील सुशिक्षित समाजात विशेष प्रभावी झाला नाही. बंगालमध्ये मात्र त्याचा प्रभाव फार खोल पडला आहे. याचे कारण बंगालमध्ये ब्राह्यो समाजाला वाहून घेतलेले सुशिक्षित त्यागी कार्यकर्ते लाभले, तसे महाराष्ट्रात घडले नाही. फक्त म. शिंदे हे एकमेव कर्ते मिशनरी म्हणून प्रार्थना समाजास मिळाले. भांडारकरांनी त्यांना विलायतेस धर्मशिक्षणार्थ पाठविण्याच्या कामात पुढाकर घेतला होता. ‘तुकाराम सोसायटी’ (पुणे)मार्फत अभंगांचा अर्थ शोधण्याचा प्रयत्न झाला. ह्या चर्चेत भांडारकरांचे महत्त्वाचे मार्गदर्शन लाभले. भांडारकर कीर्तनेही करीत. त्यांचा पुराणांचा अभ्यास गाढा होता. पाली, अर्धमागधी वगैरे भाषांचा त्यांचा उत्तम अभ्यास असल्याने त्यांनी बौद्ध धर्मावर स्वतंत्र व चिकित्सक प्रकाश टाकलेला आहे.
त्यांना एकूण तीन मुलगे व दोन कन्या अशी अपत्ये होती. द्वितीय पुत्र डॉ. देवदत्त हेही थोर विद्वान आणि संशोधक म्हणून मान्यता पावले. १८८३ साली व्हिएन्नामध्ये भरलेल्या प्राच्यविद्या विद्वानांच्या परिषदेत हजर राहिलेल्या भांडारकरांच्या अभ्यासाचा आवाका पाहून तेथले सरकार तसेच जागतिक विद्वान अचंबित झाले आणि त्यांनी भांडारकरांना सीआईई (Companion of the Order of the Indian Empire) ही पदवी देऊन सन्मानित केले. त्या भांडारकरांच्या ८०व्या वाढदिवसानिमित्त त्यांच्या विद्यार्थ्यांनी त्यांच्या नावाने पुण्यात इ.स. १९१७ मध्ये भांडारकर प्राच्यविद्या संशोधन संस्था स्थापन करून तिची सुरुवात केली. रामकृष्णपंतांनी पुणे येथील ‘प्राच्यविद्या संशोधन मंदिरा’स आपल्या ग्रथांचा व संशोधन पत्रिकांचा अनमोल संग्रह देणगी म्हणून दिल्यामुळे, ही महत्त्वाची संस्था उमी राहिली. डे. ए. सोसायटी, शिक्षणप्रसारक मंडळी, फीमेल एज्युकेशन सोसायटी, सेवासदन इ. पुण्या-मुंबईच्या अनेक शैक्षणिक संस्थांना त्यांच्या ज्ञानाचा व दातृत्वाचा लाभ झाला. निवृत्तीतील बत्तीस वर्षे विद्याव्यासंग व समाजसेवा केल्यानंतर वयाच्या ८८व्या वर्षी पुणे येथे त्यांचे ऋषी पंचमीस वार्धक्याने निधन झाले. या ऋषितुल्य महापंडिताच्या अस्थी पुणे प्रार्थना समाजाच्या प्रांगणात एका स्तुपाखाली ठेवण्यात आल्या आहेत.
(लेखक मुख्यमंत्र्यांचे माजी माहिती अधिकारी आहेत )