वॉशिंग्टन (वृत्तसंस्था) : घरात बाळाचे आगमन झाल्यानंतर संपूर्ण कुटुंबात आनंदाचे आणि उत्साहाचे वातावरण असते. बाळ जन्माला आले की चर्चा असते ती म्हणजे काय नाव ठेवायचे? भारतात, बाळाचे नाव ठेवणे ही नेहमीच कुटुंबातील एक पारंपरिक बाब मानली गेली आहे. आजी-आजोबा किंवा पालक बहुतेकदा एकत्रितपणे मुलाचे नाव ठरवतात. ज्यामध्ये धर्म, ज्योतिष आणि चालीरीती देखील मोठी भूमिका बजावतात; परंतु अमेरिकेतील एका महिलेने हे काम तिच्या उत्पन्नाचे साधन बनवले आहे. सॅन फ्रान्सिस्को येथील टेलर हम्फ्री नावाच्या महिलेने व्यावसायिक नामकरण सल्लागार म्हणून काम सुरू केले आहे. ती अनोखी, वेगळी आणि लक्षात राहणारी नावे सुचवते आणि म्हणूनच आपल्या मुलाचे नाव इतरांपे्रा वेगळे असावे, असे वाटणारे श्रीमंत कुटुंबातील आई-वडील बाळाला खास नाव देण्यासाठी मोठ्या प्रमाणावर तिच्याकडे येतात.
न्यूयॉर्क पोस्टमधील एका वृत्तानुसार, टेलरने हे काम २०१८ मध्ये सुरू केले. त्यावेळी ती फक्त १०० डॉलर्स (८,००० रुपये) मध्ये नाव सुचवत असे. त्यानंतर एका पार्टीतील उद्योजकांसोबत तिचे बोलणे झाले, तेव्हा उद्योजकांनी महिलेला तिचे दर वाढवण्यास सांगितले. प्रसिद्ध न्यूयॉर्कर मासिकात टेलरची कथा प्रकाशित झाल्यानंतर तिच्याकडे कामाचा पूर आला. काही वेळातच तिचा छोटासा उपक्रम मोठ्या व्यवसायात रूपांतरित झाला. आता नवजात बालकांना नाव सुचवण्यासाठी टेलर १७ हजार रुपयांपासून २७ लाख रुपयांपर्यंत मानधन घेते.
मानधनानुसार महिला नाव सुचवते, जर कोणी लहान पॅकेज घेत असेल तर टेलर ई-मेलद्वारे काही नावे सुचवते. पण मोठा पॅकेज घेणाऱ्या ग्राहकांसाठी ती खूप सखोल संशोधन करते. त्या कुटुंबाचा देश, परंपरा, पालकांच्या अपेक्षा आणि नावाने मुलाची भविष्यात कशी ओळख निर्माण होईल, या सगळ्याचा अभ्यास करते. आतापर्यंत टेलर हिने ५०० पेक्षा अधिक मुलांसाठी नावे सुचवली आहे. सोशल मीडियावरदेखील तिला लाखो लोक फॉलो करतात. टेलर म्हणते, “एक नाव फक्त उच्चारण्यासाठी नसते, ते नावच पुढे जाऊन मुलाची ओळख बनते. त्यामुळे विचार करून खास नावाची निवड केली पाहिजे.”