आपुलीच प्रतिमा होते आपुलीच वैरी...

नॉस्टॅल्जिया : श्रीनिवास बेलसरे


फक्त हिंदी चित्रपटांचे रिमेक इतर भारतीय भाषात होतात असे नाही. आपल्या मराठीतही अशी अनेक उदाहरणे आहेत. ‘पाठलाग’ या १९६४ सालच्या मराठी चित्रपटाचा रिमेक राज खोसला यांनी हिंदीत ‘मेरा साया’ म्हणून केला. त्यावेळी तो चांगलाच गाजला. अगदी अलीकडेच येऊन गेलेल्या रितेश देशमुखांच्या ‘लय भारी’चे यश पाहून त्याचा रिमेक ओडिया भाषेत करण्यात आला. सिनेमाचे ओडिया नाव झाले ‘जग हातारे पघा’. असाच अशोक सराफ आणि लक्ष्मीकांत बेर्डे यांचा ‘अशी ही बनवाबनवी’ हिंदीत जाऊन ‘पेइंग गेस्ट’ झाला होता. ‘फॉलिंग डाऊन’ या १९९३च्या अमेरिकी चित्रपटाचा रिमेक निशिकांत कामत यांनी मराठीत केला होता - ‘डोंबिवली फास्ट’(२००५) या नावाने. पुढे त्यांनीच मराठीचा रिमेक २००७ मध्ये तमिळ भाषेत केला. तमिळ नाव होते ‘एवानो ओरुवन’(‘कुणीतरी’).


कमलाकर तोरणे यांचा १९६८ सालचा ‘आम्ही जातो आमुच्या गावा’ १९७३ ला आला होता. तो चांगलाच लोकप्रिय झाला होता. तोही पुढे हिंदीत गेला आणि त्याचे नाव झाले ‘तीन चोर’. त्याचाच रिमेक तमिळमध्ये ‘मूंद्रू देवंगल’ या नावाने झाला.


या सिनेमासाठी कमलाकर तोरणे यांनी जगद्गुरू तुकाराम महाराजांच्या एका रचनेची जी ओळ सिनेमाचे शीर्षक म्हणून वापरली ती होती कुणासाठी? चक्क तुरुंग फोडून पळालेल्या ३ कैद्यांसाठी! पण एका अतिशय सज्जन माणसाच्या संगतीचा प्रभाव पडून त्या अट्टल गुन्हेगारांचे हृदयपरिवर्तन होते आणि सिनेमा संपतासंपता ते तिघेही स्वत:हून आपली उर्वरित शिक्षा भोगायला तुरुंगात परत जातात अशी ही कथा आहे.


एक देवभोळे, अत्यंत सचोटीने व्यवहार करणारे उद्योजक श्रीधरपंत (जयशंकर दानवे) त्यांच्या भागीदाराकडून फसवले गेलेले असतात. भागीदाराने अनेक खोटी कागदपत्रे दाखवून त्यांच्या सह्या घेतलेल्या असतात. श्रीधरपंतांचे कारस्थानी भागीदार शामराव खापरतोंडे (रामचंद्र वार्डे) मग त्यांना ब्लॅकमेल करताना अशी अट घालतात की त्यांच्या सुंदर मुलीचे, (उमा) लग्न पंतांनी खापरतोंडेच्या मानसिकदृष्ट्या अपंग मुलाशी (मधू आपटे) करून द्यावे तरच घरावर जप्ती येण्याच्या संकटातून ते पंतांची मुक्तता करतील.
याचवेळी तुरुंगातून पळालेले तीन कैदी संताजी (सूर्यकांत), धनाजी (धुमाळ) आणि सयाजी (गणेश सोळंकी) दरोडा टाकण्यासाठी म्हणून श्रीधरपंतांच्या घरी येतात आणि कारागीर असल्याची बतावणी करतात. अतिशय साधेभोळे, देवभक्त असलेले पंत पुन्हा फसतात आणि त्यांना आपल्या घरातच आश्रय देतात. मात्र हळूहळू पंत कोणत्या समस्येत आहेत हे कळल्यावर तिघांनाही पंतांची दया येते आणि ते पंताना मदत करण्याचे ठरवतात. वेगवेगळ्या क्लुप्त्या करून ते पंताना संकटातून सोडवतात अशी ही मधुसूदन कालेलकरांनी लिहिलेली पटकथा.


अट्टल गुन्हेगार असलेल्या कैद्यांवर श्रीधरपंतांच्या साधेपणाचा प्रभाव पडतो तो प्रसंग म्हणजे सिनेमात पंतांच्या तोंडी असलेले एक गाणे होते. ते लिहिले जगदीश खेबुडकर यांनी. संगीतकार आणि गायक होते सुधीर फडके. बाबुजींनी राग नट आणि भूपवर बेतल्याने ते उत्तम भक्तीगीत/भजन म्हणून मराठीत रूढ झाले!


पहाटेच्या वेळी समईच्या सात्विक प्रकाशात उजळून निघालेल्या देव्हाऱ्यासमोर श्रीधरपंत, त्यांच्या पत्नी आणि कन्या देवाची पूजा करून भजन म्हणताहेत असे दृश्य होते. चक्क ठसकेबाज लावण्या, तमाशातील सवाल-जवाब, रोमँटिक प्रेमगीते लिहिणाऱ्या खेबुडकरांचे शब्द होते - “देहाची तिजोरी, भक्तीचाच ठेवा, उघड दार देवा आता, उघड दार देवा.”


जणू पहाटेच्या मंगलसमयी एक साधक स्वत:च्या अंतरात्म्याला आपल्या हृदयाचे दार उघडायला सांगत आहे! जगदीश खेबुडकरांनी पंतांच्या तोंडी टाकलेल्या साध्या निरीक्षणानेही हे दृश्य चोरून पाहणाऱ्या गुन्हेगारांना वाटू लागते की पंताना आपले खरे रूप कळले आहे! गाण्याची शब्दयोजना अशी होती की पंत भजनात गुंगलेले असताना तिजोरी उघडायचा प्रयत्न करणाऱ्या चोरांच्या मनात भीती उत्पन्न होते. कधी नव्हे ते जागृत झालेल्या सदसदविवेकबुद्धीमुळे त्यांचे हात थरथरू लागतात. पंत आपल्याबद्लच


तर बोलत असतील असा त्यांना संशय येऊ लागतो? खेबुडकरांचे शब्दच तसे होते -
‘पिते दूध डोळे मिटूनी जात मांजराची,
मनी चोरट्यांच्या का रे भीती चांदण्याची?
सरावल्या हातांनाही कंप का सुटावा?
उघड दार देवा आता...’
म्हटले तर या ओळी साधी निरीक्षणे आहेत, म्हटले तर ते एका भक्ताने अंतर्मुख होऊन केलेले चिंतन आहे. पुण्य उजेडात होते पण पाप अंधारच पसंत करते. कारण देवाने माणसाच्या मनात ठेवलेल्या सद्बुद्धीच्या पहारेकऱ्यापासून त्याला नजर चुकवायची असते. त्याला जाणवत असते की आपण चुकत आहोत, कर्तव्यापासून दूर जात आहोत. आता तरी देवाने आपल्या हृदयातील मंदिराचे दार उघडावे आणि आपल्याला या पापापासून वाचवावे.
‘उजेडात होते पुण्य
अंधारात पाप,
ज्याचे त्याचे हाती आहे
कर्तव्याचे माप.
दुष्ट दुर्जनांची कैसी घडे लोकसेवा,
उघड दार
देवा आता...’
जेंव्हा माणूस प्रामाणिकपणे विचार करतो तेंव्हा त्याचे मनच त्याचा आरसा बनते. त्यातली स्वत:ची प्रतिमा माणसाला भयावह वाटू लागते. मग तो देवालाच विनवतो, ‘देवा, आता या अनावर मोहापासून मला वाचव, माझ्या मनाचा तोल सांभाळ. तुझ्या मनातील मंदिराचे दार उघड’
‘स्वार्थ जणू भिंतीवरचा आरसा बिलोरी,
आपुलीच प्रतिमा होते आपुलीच वैरी.
घडोघडी अपराधांचा तोल सावरावा,
उघड दार देवा आता, उघड दार देवा.’
रेडीओवर नेहमी ही तीनच कडवी ऐकायला मिळत. पण कवीने अजून दोन कडवी लिहिली होती. त्यात ते पुन्हा देवाला विनवतात, पांडुरंगा, माझ्या मनात भक्तीचे धन जमा होऊ दे, ती तिजोरी तूच फोड. मला तुझ्या मंदिराचा मार्ग दाखव.
तुझ्या हाती पांडूरंगा तिजोरी फुटावी,
‘मुक्तपणे भक्ती माझी तुझी तू लुटावी,
मार्ग तुझ्या राउळाचा मला आकळावा,
उघड दार देवा आता...’
सिनेमा संपताना तिन्ही गुन्हेगारांची सदसदविवेकबुद्धी पूर्णपणे जागी होते आणि तेच पंतांवरचे संकट दूर करण्यासाठी ‘शेरास सव्वाशेर’ असे वागून ते खापरतोंडेंना सरळ करतात असा कथेचा अंत सूचित करणारे शेवटचे कडवे कवीने त्या कैद्यांच्या समर्थनार्थ लिहिले असावे -
‘भलेपणासाठी कुणी बुरेपणा केला,
बंधनात असुनी वेडा जगी मुक्त झाला,
आपुल्याच सौख्यालागी
करील तो हेवा,
उघड दार देवा आता..’
सिनेसृष्टीतही अनेकदा अनेकांवर अन्याय झाला आहे. कित्येक असामान्य कलाकारांना त्यांच्या गुणवत्तेच्या मानाने योग्य तो सन्मान मिळाला नाही. खेबुडकरांची गाणी शांतपणे ऐकली की असे अनकेदा वाटून जाते.

Comments
Add Comment

पोटपूजेचाही उत्सव!

खास बात : विष्णू मनोहर प्रसिद्ध बल्लवाचार्य दिवाळी हा प्रकाशाचा सण आहे तसेच शरीर ऊर्जावान ठेवणाऱ्या

भारतासाठी नवी चिंता

विश्वभ्रमण : प्रा. जयसिंग यादव ‌‘ऑपरेशन सिंदूर‌’नंतर भारत आणि पाकिस्तानच्या दिशा बदलल्या. पाकिस्तानने

अभिनय सम्राट डॉ. काशिनाथ घाणेकर

कोकण आयकॉन : सतीश पाटणकर अभिनय सुरू करण्याआधी घाणेकर व्यवसायाने दंतवैद्य होते. काशीनाथ घाणेकर यांचा जन्म १४

अतिलाडाने तुम्ही मुलांना बिघडवत, तर नाही ना?

आनंदी पालकत्व : डाॅ. स्वाती गानू पालक या नात्याने आपल्या मुलाने मागितलेली प्रत्येक वस्तू घेऊन द्यावी असं

‘अब ये सुहाना साथ ना छुटे...’

नॉस्टॅल्जिया : श्रीनिवास बेलसरे सिनेमासाठी ‘गुमराह’ हे शीर्षक बी. आर. चोपडा, महेश भट आणि वर्धन केतकर या तीन

देवाची मदत...

संवाद : गुरुनाथ तेंडुलकर माझ्या लहानपणी मी वडिलांच्या तोंडून ऐकलेली एक गोष्ट सांगतो. पावसाळ्याचे दिवस होते.