
मुंबई(प्रतिनिधी): मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेच्या सर्व लाभार्थी महिलांना आता 'ई-केवायसी' बंधनकारक केली आहे. पण सध्या लाभार्थी महिलांना या ई-केवायसी पोर्टलवर ओटीपी मिळण्यात तांत्रिक अडचणी येत असल्याचे समोर आले. महिला व बालविकास मंत्री आदिती तटकरे यांनी एक्सवर पोस्ट करून या अडचणींची नोंद घेतली असून ई-केवायसी प्रक्रियेत येणाऱ्या ओटीपीसंबंधीच्या या तांत्रिक अडचणी लवकरच दूर केल्या जातील, असे आश्वासन त्यांनी दिले.
तटकरे म्हणाल्या, ई-केवायसी करताना येणाऱ्या तांत्रिक अडचणीवर तज्ज्ञांच्या माध्यमातून उपाययोजना करण्याचे काम प्रगतीपथावर आहे. लवकरच ही अडचण दूर होऊन ई-केवायसी प्रक्रिया अधिक सुलभ होणार याबाबत मी सर्व लाडक्या बहिणींना आश्वस्त करते.
ई-केवायसी प्रक्रियेत केवळ लाभार्थी महिलेचीच नव्हे, तर तिच्यासोबत पती किंवा वडिलांची ई-केवायसी करणेही अनिवार्य आहे. याचा उद्देश हा आहे की, लाभार्थी महिलेचे वार्षिक उत्पन्न तसेच तिच्या पतीचे किंवा वडिलांचे वार्षिक उत्पन्न शोधले जाईल. जर महिलेचे लग्न झाले असेल तर तिच्या पतीचे आणि लग्न झाले नसेल तर वडिलांचे उत्पन्न तपासले जाणार आहे.
अपात्रतेचे नियम
लाभार्थी महिलेचे स्वतःचे उत्पन्न आणि त्यासोबतच तिच्या पतीचे किंवा वडिलांचे उत्पन्न मिळून ते अडीच लाखांपेक्षा जास्त आढळल्यास ती महिला अपात्र ठरवली जाईल. याशिवाय महिलेच्या पती किंवा वडिलांच्या नावे चारचाकी वाहन असल्यास त्या महिलेला अपात्र ठरवण्यात येत आहे. शिवाय एकाच कुटुंबातील दोनपेक्षा अधिक महिला या योजनेचा लाभ घेत असतील तर त्यापैकी एका महिलेला अपात्र ठरवण्यात येत आहे. या योजनेसाठी महिलेचे वय २१ ते ६५ च्या दरम्यान असणे बंधनकारक आहे. या गटात न मोडणाऱ्या महिलांनाही ई-केवायसीच्या माध्यमातून अपात्र करण्यात येत आहे.