Sunday, October 5, 2025

IND vs PAK: वेल डन टीम इंडिया, वर्ल्डकपमध्ये भारताने पाकिस्तानला केले नेस्तनाबूत

IND vs PAK: वेल डन टीम इंडिया, वर्ल्डकपमध्ये भारताने पाकिस्तानला केले नेस्तनाबूत

कोलंबो: आयसीसी महिला क्रिकेट वर्ल्डकपमध्ये हा रविवार पुन्हा एकदा भारताच्या नावावर राहिला. आजच्या या सामन्यात भारताने पाकिस्तानला चारीमुंड्या चीत करत सलग दुसरा विजय मिळवला आहे. या आधी आशिया कपमध्ये गेल्या रविवारी भारताच्या पुरूष संघाने पाकिस्तानला हरवले होते. त्यानंतर लगेचच आठ दिवसांनी महिलांच्या संघाने पाकिस्तानला हरवले. भारताने पाकिस्तानला ८८ धावांनी नेस्तनाबूत केले आहे.

भारताने पाकिस्तानला विजयासाठी २४८ धावांचे आव्हान दिले होते. मात्र पाकिस्तानला हे आव्हान गाठता आले नाही. पाकिस्तानचा संपूर्ण ४३ षटकांत १५९ धावांवर आटोपला. भारताकडून क्रांती गौडने तीन विकेट मिळवत प्लेयर ऑफ दी मॅचचा खिताब मिळवला.

पाकिस्तानवर भारतीय संघाने महिला वनडेत सलग १२वा विजय मिळवला आहे. त्यांनी आतापर्यंत एकही वनडे सामना पाकिस्तानविरुद्ध गमावलेला नाही. सध्याच्या वर्ल्डकपमध्ये भारतीय महिला संघाचा हा सलग दुसरा विजय आहे. भारतीय संघाने या वर्ल्डकपमध्ये आपल्या अभियाानाची शानदार सुरूवात करत श्रीलंकेला डीएलएस नियमानुसार ५९ धावांनी हरवले होते. त्यानंतर आता पाकिस्तानला हरवले.

भारताकडून हरलीन देओलने सर्वाधिक ४६ धावा केल्या. यष्टीरक्षक रिचा घोष ३५ धावा करुन नाबाद राहिली. जेमिमा रॉड्रिग्जने ३२ आणि प्रतिका रावलने ३१ धावा केल्या. दीप्ती शर्माने २५, स्मृती मंधानाने २३, स्नेह राणाने २० धावा केल्या. कर्णधार असलेल्या हरमनप्रीत कौरने १९, क्रांती गौडने ८, श्री चरणीने १, रेणुका सिंग ठाकूरने शून्य धावा केल्या. पाकिस्तानकडून डायना बेगने चार, कर्णधार असलेल्या फातिमा सना आणि सादिया इक्बालने प्रत्येकी दोन तर रमीन शमीम आणि नशरा संधूने प्रत्येकी एक बळी घेतला.

Comments
Add Comment