
उत्तराखंड : दार्जिलिंगमध्ये झालेल्या अतिमुसळधार पावसामुळे मोठ्या प्रमाणावर भूस्खलन झाले असून, आतापर्यंत १७ जणांचे प्राण गेले आहेत. या नैसर्गिक आपत्तीमुळे दार्जिलिंगचा सिक्कीमशी संपर्क पूर्णपणे तुटला आहे, तर अनेक महत्त्वाचे रस्तेही बंद झाले आहेत.
गोरखालँड प्रादेशिक प्रशासनाने (GTA) खबरदारीचा उपाय म्हणून टायगर हिल, रॉक गार्डनसह प्रमुख पर्यटनस्थळे तात्पुरती बंद केली आहेत. याशिवाय टॉय ट्रेन सेवा देखील स्थगित करण्यात आली आहे.
दार्जिलिंग, मिरिक आणि सुखियापोखरी परिसरात मोठ्या प्रमाणावर भूस्खलन झाल्यामुळे बचाव कार्य सुरु असून, स्थानिक पोलिस आणि आपत्ती व्यवस्थापन पथके युद्धपातळीवर काम करत आहेत.
दरम्यान, पंतप्रधान नरेंद्र मोदींनी या दुर्घटनेबद्दल दुःख व्यक्त केले असून, केंद्र सरकारकडून सर्वतोपरी मदतीचे आश्वासन दिले आहे.
दुर्गापूजेनंतर दार्जिलिंगमध्ये पर्यटकांची मोठी गर्दी असते. त्यामुळे अनेक पर्यटक अडकले असल्याची शक्यता आहे. बंगाल पोलिसांनी ९१४७८८९०७८ हा हेल्पलाईन क्रमांक जाहीर केला आहे, ज्यावर अडकलेल्या पर्यटकांना मदतीसाठी संपर्क करता येईल.
दरम्यान, उत्तर बंगालमधील जलपाईगुडी, सिलिगुडी, कूचबिहार या भागातही पावसाचा जोर कायम आहे. काही ठिकाणी पाणी साचल्याने जनजीवन विस्कळीत झाले आहे.
हवामान खात्याने ७ ऑक्टोबरपर्यंत जोरदार पावसाचा अंदाज वर्तवला असून, सिक्कीमसाठी रेड अलर्ट जारी केला आहे. यामध्ये विजांच्या कडकडाटासह मुसळधार पाऊस आणि सोसाट्याचा वारा येण्याची शक्यता आहे. स्थानिक नागरिक व पर्यटकांनी हवामान विभागाच्या सूचनांचे पालन करावे आणि अनावश्यक प्रवास टाळावा, असे आवाहन प्रशासनाने केले आहे.