
कोलंबो : आयसीसी महिला विश्वचषक क्रिकेट स्पर्धेत भारत पाकिस्तान साखळी सामना सुरू आहे. या सामन्याच्या नाणेफेकीवेळी दोन्ही संघांच्या कर्णधार एकमेकांना हस्तांदोलन करणार की नाही याची उत्सुकता अनेकांना होती. अपेक्षेप्रमाणे दोन्ही संघांच्या कर्णधारांनी यावेळी हस्तांदोलन करणे टाळले. नाणेफेक झाल्यावर प्रतिक्रिया देऊन पाकिस्तानची कर्णधार थेट पॅव्हेलियनमध्ये निघून गेली. तर भारतीय कर्णधार प्रतिक्रियेसाठी कॅमेऱ्यासमोर आली. याआधी आशिया कप २०२५ या टी २० क्रिकेट स्पर्धेत भारत आणि पाकिस्तान तीन वेळा एकमेकांसमोर आले. विशेष म्हणजे भारत आणि पाकिस्तानच्या कर्णधारांनी तीन सामन्यांदरम्यान एकदाही एकमेकांना हस्तांदोलन केले नाही.
पाकिस्तान विरुद्धचा सामना जिंकल्यास भारत गुणतक्त्यात पहिल्या स्थानावर पोहोचणार आहे. विश्वचषकात भारताचा पहिला साखळी सामना श्रीलंकेविरुद्ध झाला. हा सामना डकवर्थ लुईस नियमानुसार भारताने ५९ धावांनी जिंकला. पाकिस्तान विरुद्धचा सामना हा भारताचा दुसरा साखळी सामना आहे. हा सामना जिंकल्यास चार गुणांसह भारत गुणतक्त्यात पहिल्या स्थानावर पोहोचणार आहे. सध्या गुणतक्त्यात ऑस्ट्रेलियाचा महिला क्रिकेट संघ तीन गुणांसह पहिल्या स्थानी आहे. ऑस्ट्रेलियाने पहिला सामना जिंकला आणि श्रीलंकेविरुद्धचा त्यांचा सामना पावसामुळे रद्द झाला. यामुळे तीन गुणांसह ऑस्ट्रेलिया गुणतक्त्यात पहिल्या स्थानी पोहोचली.
भारतीय महिला क्रिकेट संघ : प्रतिका रावल , स्मृती मानधना , हरलीन देओल , हरमनप्रीत कौर (कर्णधार) , जेमिमाह रॉड्रिग्स , रिचा घोष (यष्टीरक्षक) , दीप्ती शर्मा , स्नेह राणा , रेणुका सिंग ठाकूर , क्रांती गौड , श्री चरणी
पाकिस्तानचा महिला क्रिकेट संघ : मुनीबा अली , सदाफ शमास , सिद्रा अमीन , रमीन शमीम , आलिया रियाझ , सिद्रा नवाज (यष्टीरक्षक) , फातिमा सना (कर्णधार) , नतालिया परवेझ , डायना बेग , नशरा संधू , सादिया इक्बाल