
माणगाव : रायगड जिल्ह्याला 'शक्ती' वादळाचा इशारा देण्यात आलेला असतानाही संपूर्ण जिल्ह्यात दिवसभर कडक ऊन जाणवत होते. मात्र माणगाव तालुक्यातील लोणेरे विभागातील पन्हळघर झोरेवाडी परिसरात सायंकाळी सुमारे ४ वाजण्याच्या सुमारास अचानक जोरदार पाऊस कोसळला. या पावसामुळे ढगफुटी सदृश्य परिस्थिती निर्माण झाली.
झोरेवाडी परिसरात अतिवृष्टीमुळे नदी-नाले दुथडी भरून वाहताना दिसले. या घटनेचे व्हिडिओज स्थानिकांनी सोशल मीडियावर शेअर केले असून, ते सध्या मोठ्या प्रमाणात व्हायरल होत आहेत. अचानक आलेल्या या पावसामुळे स्थानिक नागरिकांना काही काळ भिती जाणवली, मात्र पावसाचा जोर ओसरताच परिस्थिती लवकरच पूर्ववत झाली, अशी माहिती ग्रामस्थांनी दिली आहे.
दरम्यान, रायगड जिल्ह्यात हवामान खात्याने दिलेल्या वादळाच्या इशाऱ्यामुळे प्रशासन सज्ज असून, नागरिकांनी सतर्क राहण्याचे आवाहन करण्यात आले आहे.