लहानशा गोष्टी, मोठा अर्थ : शिल्पा अष्टमकर
“माणसाला त्याच्या बोलण्यावरून नव्हे तर कृतीवरून ओळखले जाते” असे आपण नेहमी ऐकतो. खरं तर बोलणे सोपे आहे, पण त्या बोलण्याला कृतीत आणणे फार कठीण असते. म्हणूनच समाजात एखाद्या व्यक्तीची खरी ओळख त्याच्या कृतीवरूनच ठरते.
आपण दैनंदिन जीवनात अनेक गोष्टी बोलतो-वेळेचे महत्त्व, शिस्त, प्रामाणिकपणा, मदतीची भावना, निसर्गसंवर्धन…पण जर आपण स्वतःच हे आचरणात आणले नाही, तर आपले बोलणे इतरांवर प्रभाव टाकणार नाही. शब्द फक्त कानावर येतात, पण कृती हृदयावर ठसते.
उदाहरणार्थ, शिक्षक वेळेवर येण्याचे महत्त्व शिकवतो, पण तोच वेळेवर शाळेत आला नाही तर विद्यार्थ्यांना शिस्तीचे खरे मूल्य कधी समजणार? तसेच पालक जर मुलांना प्रामाणिक राहण्याचे शिकवत असतील, तर त्यांनी स्वतःही आयुष्यात प्रामाणिकपणा दाखवला पाहिजे. यामुळे मुलांमध्ये आदर्श संस्कार होतात.
आपल्या समाजात आज मोठमोठ्या घोषणा, भाषणे आणि आश्वासने दिली जातात; पण प्रत्यक्ष कृती कमी दिसते. यामुळे लोकांमध्ये अविश्वास आणि नाराजी निर्माण होते. जर प्रत्येकाने बोलले त्याप्रमाणे वागले, तर समाज अधिक पारदर्शक, विश्वासू आणि प्रगतिशील बनेल.
शब्द आणि कृती यातील सुसंगती हीच खरी माणुसकी आहे. जसे एखादे झाड फक्त फुलांनी नव्हे तर फळांनी ओळखले जाते, तसेच माणूस फक्त बोलण्यावर नव्हे तर त्याच्या आचरणावर ओळखला जातो.
थोडक्यात, “बोलल्याप्रमाणे वागणे” हेच सत्य, प्रामाणिकपणा आणि आदर्श जीवनाचे मूळ तत्त्व आहे. आपण जे बोलतो तेच पाळले, तर आपण स्वतःच नव्हे तर संपूर्ण समाजासाठी प्रेरणादायी ठरू.
विवेक क्रिया आपुली पालटावी | अती आदरे शुद्ध क्रिया धरावी |
जनी बोलण्यासारिखे चाल बापा । मना कल्पना सोडी संसारतापा ||
(मनाचे श्लोक)
समर्थांचा विवेकावर विलक्षण भर होता. विवेक म्हणजे विचार करणे. विवेक म्हणजे तारतम्य. विवेक म्हणजे योग्य-अयोग्य याची कल्पना. विवेक म्हणजे निरुपयोगी गोष्टी सोडून हितावह गोष्टी स्वीकारणे. विवेक म्हणजे सत्यास सत्य, असत्याला असत्य म्हणणे. विवेकामुळे आपले जीवन योग्य मार्गाने जाते. विवेकामुळे आपण चुकीच्या मार्गावर न जाता सत्कर्माचा मार्ग धरतो. विवेकाच्या सहाय्याने आत्मोद्धार होतो.
संत गाडगे महाराजांचे जीवन हेच होते. त्यांनी गुरुबाजी, बुवाबाजी, अंधश्रद्धा यावर सतत प्रहार केला. त्यांना कुणी नमस्कार केलेला आवडत नसे. नमस्कार करण्याऐवजी त्यांनी घंटा वाजवली की लोकांचे लक्ष त्या बाजूला वळे. मग ते दूरदूरच्या गावांत जाऊन लोकांना स्वच्छतेचा धडा देत. ते जे बोलत आणि तेच त्यांच्या वागण्यात असे. “बोलणे एक चालणे एक या नाव हीन विवेक” असे समर्थ रामदास म्हणतात. गाडगे महाराजांनी जीवनात बोलल्याप्रमाणे प्रचार केला तो म्हणजेच विवेक.
गाडगे महाराजांनी गरिबांना जेवण मिळावे म्हणून धर्मशाळा काढली. या धर्मशाळेत गरीब, कष्टकरी यांना मोफत जेवण मिले. एकदा गाडगे महाराज प्रवासात होते. त्यांच्या घरात खायला काही नव्हते.त्यांची मुलगी धर्मशाळेत गेली. तिने तेथील व्यवस्थापकाकडून काही धान्य मागितले.धर्मशाळा स्वत: गाडगे महाराजांनीच सुरू केली होती.
त्यांची मुलगीच धान्य मागायला आल्याने व्यवस्थापकाने तिला चार दिवसांचे धान्य दिले. प्रवासातून परतल्यावर गाडगे महाराजांना ही गोष्ट समजली. ते पत्नीला व मुलीला रागावले. घरात काही नसेल तर तिथे जाऊन जेवण करा. पण धान्य घरी आणू नका. आपणच नियम पाळले नाहीत तर बाकीच्या लोकांना आपण काय शिकवणार?
एव्हढ्यावर ते थांबले नाहीत तर त्यांनी व्यवस्थापकांना सक्त ताकीद दिली की माझी पत्नी व मुलगी आली तरी तिला घरी नेण्यासाठी धान्य देऊ नये. महाराजांनी विवेकाची शिकवण दिली. लोकांमध्ये अंधश्रद्धा, गैरसमज दूर केले. त्यांच्या जीवनाचा मुख्य उद्देश जनजागृती होता. महाराजांनी गावोगावी जाऊन समाजाची सेवा केली. ते गावात गेले की लोकांना सांगत, “तुम्ही मला एक दिवस अन्न द्या, मी तुम्हाला स्वच्छतेचा धडा देईन.” त्यांची वाणी प्रभावी होती. त्यांनी कुठलाही अंधश्रद्धेचा आधार घेतला नाही. त्यांचे वागणे, बोलणे, कृती हे सारं समाजासाठी प्रेरणादायी ठरले. गाडगे महाराजांनी केलेला समाजप्रबोधनाचा कीर्तीसुमन आजही समाजासाठी दिशादर्शक आहे.