शांघाय (वृत्तसंस्था): वयाच्या ३८ व्या वर्षीही जागतिक टेनिसमध्ये नोवाक जोकोविचचा दबदबा कायम आहे. आपल्या कारकिर्दीत एकूण २४ ग्रँड स्लॅम जेतेपदे जिंकण्याचा विश्वविक्रम नावावर असलेल्या जोकोविचने आता एटीपी मास्टर्स १००० स्पर्धांमध्ये एक नवीन ऐतिहासिक टप्पा गाठला आहे. शांघाय मास्टर्समध्ये मारिन क्लिक विरुद्धचा सामना जिंकून जोकोविच सहा वेगवेगळ्या एटीपी मास्टर्स १००० स्पर्धांमध्ये ४० किंवा त्याहून अधिक सामने जिंकणारा पहिला पुरुष टेनिसपटू ठरला आहे.
शांघाय मास्टर्समध्ये राउंड ऑफ ६४ मध्ये झालेल्या या सामन्यात जोकोविचने क्लिकचा सरळ दोन सेटमध्ये पराभव केला. त्याने पहिला सेट टायब्रेकरमध्ये ७-६ (७-२) ने जिंकला आणि दुसऱ्या सेटमध्ये ६-४ ने विजय मिळवत राउंड ऑफ ३२ मध्ये प्रवेश निश्चित केला. या कामगिरीह तो सहा वेगवेगळ्या एटीपी मास्टर्स १००० स्पर्धांमध्ये ४० किंवा त्यापेक्षा जास्त सामने जिंकणारा पहिलाच टेनिसपटू ठरला आहे. नोवाक जोकोविचने रोम मास्टर्समध्ये ६८ विजय, इंडियन वेल्स मास्टर्समध्ये ५१ विजय, पॅरिस मास्टर्समध्ये ५१ विजय, मियामी मास्टर्समध्ये ४९ विजय, सिनसिनाटी मास्टर्समध्ये ४५ विजय मिळवले आहेत.
सामना जिंकल्यानंतर जोकोविचने सांगितले की, यूएस ओपननंतर हा त्याचा पहिला सामना असल्याने त्याला आपली लय शोधण्यासाठी संघर्ष करावा लागला. "मी काही सामन्यांमध्ये चांगली कामगिरी करू शकलो नाही आणि मारिनविरुद्धचा हा माझा पहिला सामना खूप कठीण होता. त्याने मला श्वास घेण्याची संधी दिली नाही, त्यामुळे मला वाटतं की चांगल्या सर्व्हिसमुळे मी हा सामना जिंकू शकलो," असे नोवाक जोकोविच म्हणाला.