Saturday, October 4, 2025

कचऱ्यातून कला

कचऱ्यातून कला

प्रतिभारंग : प्रा. प्रतिभा सराफ

आमची आई शाळेत शिक्षिका होती. आम्हा मुलींना सांभाळून घर-संसार सांभाळणे म्हणजे तिची तारेवरची कसरत असायची. तसे त्याकाळच्या मराठी शाळांमध्ये पालकांना फार त्रास दिला जायचा नाही. होय, पण वर्षातून एकदा एका प्रकल्पासाठी आम्हाला एक वस्तू बनवून न्यावी लागायची आणि त्या प्रकल्पाचे नाव होते ‘कचऱ्यातून कला.’ आम्हाला ही कला अवगत नव्हती. खरंतर आईलाही फारशी अवगत नव्हती. आता सगळेच खूप ‘स्मार्ट’ झाले आहेत. निव्वळ youtube वर आपल्याला हवा तो शब्द टाकला की हवे ते मिळते. आजच्या काळात इतके सुंदर व्हिडिओ उपलब्ध आहेत की अत्यंत सोप्या पद्धतीने आपल्याला अनेक गोष्टी शिकवल्या जातात. खरंतर मला हे व्हिडिओ बनवणाऱ्यांचे कौतुकच वाटते की त्यांनी इतका मोठा वेळ आपल्यासाठी खर्च केला आणि त्यामुळे आपले जगणे किती सोपे झाले आहे.

तर आपण मूळ विषयाकडे वळू या. माझी आई वर्षानुवर्षे आम्हाला एकच वस्तू बनवून द्यायची. ती वस्तू मी तुम्हाला सांगते. त्याचे नाव-चटई. रंगीत वर्तमानपत्राची दोन पाने किंवा मासिकाची दोन पाने घेऊन ती त्याला व्यवस्थित चौकोनी कापायची. त्यांना एकत्र धरून कात्रीने त्यावर एक ठरावीक अंतर ठेवून सात-आठ वेळा उभे कापायची. फक्त शेवटचे टोक कापले जाणार नाही याची काळजी घ्यायची. एक पान आडवे आणि एक पान उभे ठेवून एकमेकात गुंतवायची की झाली चटई! आजही आईने बनवलेली चटई डोळ्यांसमोर येते आणि माझ्या मुलीला शाळेत जेव्हा पहिल्यांदा Wealth from Waste हा विषय प्रोजेक्ट म्हणून दिला तेव्हा मी ‘चटई’च बनवल्याचे आठवते. त्यानंतर मात्र खूप वेगळ्यावेगळ्या वस्तू बनवण्याची कला मी अवगत केली. हे सगळे आठवण्याचे कारण म्हणजे अलीकडेच एक बातमी वाचली त्याचा मथितार्थ देते.

बंगळूरु या शहरातील सुखवस्तू कुटुंबातील सुहास आणि सुनीता रामेगौडा यांनी २०१७ मध्ये अचानक वेगळ्या प्रवासाला सुरुवात केली. त्यांना भौतिक सुखसुविधांपेक्षा साधे जीवन, निसर्गाशी जवळीक साधणारे जीवन जगण्याची इच्छा निर्माण झाली. त्यामुळे त्यांनी ‘निलगिरी’ या पर्वतरांगात स्थलांतर केले. तिथे दगडमातीने बांधलेल्या छोट्याशा घरात ते महिन्याला दहा हजार रुपयांपेक्षाही कमी खर्चात राहत होते. तिथे राहून त्यांना जाणवले की आजूबाजूच्या ग्रामीण व आदिवासी महिलांकडे काम नाही, स्थिर उत्पन्न नाही आणि त्यामुळे जीवन संघर्षमय आहे. या महिलांना सक्षम करण्यासाठी दोघांनी समाजासाठी काहीतरी करण्याचे ठरवले.

त्यावर प्रचंड विचार करून, एक दिशा ठरवून २०१९ मध्ये त्यांनी Indian Yards Foundation या संस्थेची स्थापना केली. सुरुवातीला जुन्या कापडांपासून ‘गोधडी’ तयार करून विक्रीला सुरुवात झाली. कोविड काळात त्यांनी मोठ्या प्रमाणात मास्क तयार केले, ज्यामुळे महिलांना उत्पन्नाचे उत्तम साधन मिळाले आणि त्यांचे जीवन सुरळीत चालू राहिले. त्यानंतर त्यांनी छोट्या छोट्या आणि विकल्या जातील अशा अनेक घरगुती वस्तू या महिलांकडून तयार करवून घेऊन विकल्या. पण त्या सर्व कामगार महिलांसोबत यांनाही खरी ओळख मिळाली ती म्हणजे त्यांनी २०२३ मध्ये सुरु झालेल्या ‘The Good Doll’ या ब्रँडमुळेच!

या ब्रँडअंतर्गत जुन्या वाया गेलेल्या कापडांपासून त्यांनी अशा बाहुल्या बनवल्या. या बाहुल्यांचे सहज कपडे बदलता येतात. विविध आकाराच्या रंगाच्या या बाहुल्या खूपच आकर्षक आहेत आणि सर्वात महत्त्वाची गोष्ट म्हणजे आतापर्यंत जे १२,००० किलो कापड वाया जात होते त्यापासूनच या बाहुल्या बनवल्या गेल्या. ही पर्यावरणपूरक जीवनशैली आहे, हे समजावून दिल्यावर त्याची विक्री सहज वाढली. ही केवळ खेळणी नसून यातून मोठ्या प्रमाणात सकारात्मकताही पसरवली जात आहे.

या उपक्रमामुळे निलगिरी भागातील जवळपास शंभरहून अधिक महिलांना रोजगार मिळाला आहे. आज या महिला जवळजवळ आठ हजारांपासून ते सतरा-अठरा हजारांपर्यंत कमवतात. या गोष्टीमुळे त्यांचा आत्मविश्वास प्रचंड वाढला आहे. त्यांचे राहणीमान सुधारले आहे. एका जोडप्याने त्यांना एक वेगळे आणि सुंदर आयुष्य दिलेले आहे. हे अगदी थोडक्यात मी दिले आहे बाकी याची विक्री कशाप्रकारे होते वगैरे गोष्टी आपण समाज माध्यमातून सहज शोधून काढू शकता!

कचऱ्यातून संपत्ती (Wealth from Waste) ही संकल्पनाच मला प्रचंड आवडते. कागद, प्लास्टिक, धातू यांसारख्या वस्तू पुन्हा आपण दिलेल्या कचऱ्यातून वेगळ्या काढून त्याच्या नवीन वस्तू करून मोठ्या प्रमाणात विकल्या जातात. त्याची पुनर्निर्मिती होते हे आपल्या सगळ्यांना माहीत आहेच! त्यामुळे अलीकडे ओला कचरा आणि कोरडा कचरा हा वेगवेगळा गोळा केला जातो. बऱ्याच सोसायट्यांमध्ये ओल्या कचऱ्यापासून कंपोस्ट खत तयार केले जाते. त्याला वापरण्यायोग्य बनवले जाते असा प्रकल्प आमच्याही सोसायटीत आहे. अशा तऱ्हेने कचरा व्यवस्थित वापरला गेला तर कचऱ्याचे प्रमाण कमी होतेच; परंतु प्रदूषणही कमी होते.

त्यामुळे आजपासून आपण कचऱ्याकडे एक मोठी समस्या आहे अशा दृष्टीतून न पाहता या कचऱ्यातून नेमके काय करता येईल, कोणती संधी साधता येईल, कोणती नवनिर्मिती करता येईल याकडे पाहूया!

तुमच्याकडे या संबंधात काही नवीन कल्पना असतील तर त्या नक्कीच शेअर करा कदाचित यातून कोणाला जीवनात प्रगती करण्यासाठी नवीन संधी मिळू शकेल!

Comments
Add Comment