
शिर्डी : केंद्रीय गृहमंत्री अमित शाह महाराष्ट्रातील अहिल्यानगर जिल्ह्याच्या दौऱ्यावर आहेत. या दौऱ्यासाठी अमित शाहांचे शनिवारी ४ ऑक्टोबर रोजी रात्री उशिरा आगमन झाले. अहिल्यानगर जिल्ह्यात आगमन झाल्यानंतर रात्री उशिरा अमित शाह यांनी बंद दाराआड मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्याशी सुमारे पाऊण तास चर्चा केली.
अमित शाहांनी मुख्यमंत्री आणि दोन्ही उपमुख्यमंत्र्यांकडून राज्यातील पावसाची सध्याची स्थिती, पावसामुळे झालेले नुकसान याची माहिती घेतली. याव्यतिरिक्त, पुढील आठवड्यात नियोजित असलेल्या नवी मुंबई विमानतळ लोकार्पण कार्यक्रम आणि मेट्रो तीनच्या उद्घाटनाच्या कार्यक्रमांचाही आढावा घेतला. काही राजकीय मुद्यांवरही चर्चा झाली. पण चर्चेचे तपशील अधिकृतरित्या जाहीर झालेले नाही. यामुळे चर्चेबाबत तर्कवितर्क सुरू आहेत. सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार सुजय विखे पाटील यांच्या राजकीय पुनर्वसनाबाबतही बंद दाराआड चर्चा झाली आहे.