क्राइम : अॅड. रिया करंजकर
सुरेखा ही दोन भावांची एकुलती एक बहीण. घरामध्ये सर्वांची लाडकी पण लहानपणापासूनच तिला हृदयाचा त्रास होता. त्यामुळे तिचं लहानपणीच एक छोटसं ऑपरेशन झालेलं होतं. दिसायला सर्वसाधारण अशी होती. तिचं शिक्षण पूर्ण झाल्यानंतर घरामध्ये तिच्या लग्नाचा विषय निघाला पण आपल्या मुलीचं लहानपणीच ऑपरेशन झालेलं आहे अशा मुलीचा स्वीकार कोण करणार असा प्रश्न तिच्या आई-वडिलांना होता. तरीही तिचे आई-वडील नातेवाइकांना तिचा बायोडेटा आणि फोटो देत होते आणि कोणी योग्य वर असेल तर सांगा असे सांगत होते. तिच्या आईच्याच ओळखीतल्या एका महिलेने तिच्याही मुलांसाठी योग्य मुलगी असेल तर सांगा असे विचारलेलं होतं. त्यावेळी त्या दोघींनी तुझ्याही मुलीचं लग्न करायचे, माझ्या मुलाचे लग्न करायचे तर आपणच आपली सोयरीक जमवू या असं ठरवलं.
पण सुरेखाच्या आई-वडिलांनी त्या महिलेला आपल्या मुलीची सर्व परिस्थिती सांगितली तरी त्या महिलेनं आपल्या मुलासाठी सुरेखाला पसंत केलं. सर्वांना आनंद झालेला होता की एवढी परिस्थिती सांगूनही सुरेखाचा स्वीकार करत आहे. सुरेखा व तिचा नवरा सचिन यांचा विवाह व्यवस्थित पार पडला. सचिन याला दोन भाऊ होते. आई-वडील असा त्यांचा परिवार होता. सचिन हा घरामध्ये दोन नंबर मुलगा होता. मोठ्या भावाचं लग्न झालेलं होतं. पण त्याला काहीच मूलबाळ नव्हतं. सुरेखा घरात आल्यावर मोठी जाऊ भांडण झाल्यामुळे आपल्या माहेरी गेलेली होती. त्यामुळे सासू सुरेखाशी प्रेमाने वागत होती पण काहीच महिन्यांमध्ये सुरेखाला समजलं की तिच्या नवऱ्याला दारूचे व्यसन आहे आणि या गोष्टीची खबर त्याने आपल्या पत्नीला लागू दिली नव्हती. एवढेच नव्हे तर घरामध्ये सासरे आणि तीन मुलगे एकत्रच प्यायला बसत. सकाळ, संध्याकाळ ते बसत होते. पण त्याही गोष्टीकडे सुरेखाने कानाडोळा केला, का तर कोणाला नाही कोणाला कसलं तरी व्यसन असतं. आपली परिस्थिती बघून लग्न केलं यातच ती समाधानी होती.
लग्न झाल्यानंतर चारच महिन्यांनी तिला दिवस गेले. सातव्या महिन्यामध्ये ओटी भरण झाल्यानंतर ती आपल्या माहेरी आली तोपर्यंत सर्व काही व्यवस्थित चालू होतं. सचिन हा काही काम करत नव्हता. एवढेच नाही तर तिन्ही भाऊ काम करत नव्हते कारण त्यांच्या आजोबांचं दुकान होतं आणि त्याचं भाडं येत होतं. सासूच म्हणणं होतं की, आमच्याकडे मुलं काम करत नाहीत मुली करतात आणि कमवून आणतात. मुलांना कुठेही जाण्याची गरज नाही, अशा विचित्र विचारांची ती लोकं होती तरीही सुरेखा तिथे आनंदी होती. सुरेखाला सुंदर अशी मुलगी झाली. सचिनसारखी ती दिसत होती. सुरेखाच्या घरातील सर्वजण आनंदी होते. बारसंही झालं. सासू जे नाव सांगत होती ते सुरेखाने ठेवलं नाही तर तिला जे आवडतं तेच नाव तिने ठेवलं. तीन महिने झाल्यानंतर सासरची मंडळी आपल्याला न्यायला का नाही येत म्हणून सुरेखाची आई आणि वडील सुरेखाच्या सासरी गेली असता, आजपर्यंत आमच्या खानदानात कोणालाही मुलगी झाली नाही आणि तुमच्या मुलीला मुलगी झाली हे असं होऊ शकत नाही. त्याच्यामुळे आम्ही तुमच्या मुलीला सासरी नांदायला आणू शकत नाही असं कारण सासूने दिलं आणि जर तुमची मुलगी इथे नांदायची असेल तर तिच्या मुलीला आम्ही स्वीकारणार नाही. ती तुमच्याकडे ठेवा आणि फक्त तुमच्या मुलीला नांदायला पाठवा पण त्यासाठी दहा लाख रुपये तुम्हाला द्यावे लागतील तरच तुमची मुलगी आम्ही नांदायला आणू पण तिची मुलगी इथे आणणार नाही असं त्यांनी सांगितलं. या गोष्टीला सुरेखाने विरोध केला. आता यांना पैसे दिले तर पुढे असेच मागत राहतील कारण नवरा कामाला नव्हता आणि त्या घरात मुलं काम करण्याची पद्धतच नव्हती. मुख्य म्हणजे सून पाहिजे आणि त्या घरातली मुलगी त्या घरात नको हा कुठला न्याय म्हणून सुरेखाने आपल्या सासरच्या मंडळींच्या विरुद्ध न्यायालयात कौटुंबिक हिंसाचाराच्या विरुद्ध दावा दाखल केला. त्या दाव्यालाही सचिन आणि त्याचे कुटुंब हजर होत नव्हते. शेवटी तिला पोटगी मिळाली. पोटगी द्यावी लागते म्हणून सचिनने कौटुंबिक न्यायालयामध्ये घटस्फोटासाठी अर्ज दाखल केला. स्वतःच अर्ज दाखल केला आणि स्वतःच त्यांनी मागे घेतला कारण तिथेही त्याला कळलं की मुलगी असल्यामुळे पोटगी द्यावी लागेल. दोन दोन पोटगी कुठे देणार म्हणून स्वतःच मागे आला. काही वर्षांनंतर पुन्हा घटस्फोटासाठी त्यानेच अर्ज दाखल केला. काही अंतरावर सुरेखा आणि तिची सासरची मंडळी राहतात पण अजूनपर्यंत त्या छोट्या मुलीला त्यांनी जवळ घेतलेलं नाही, का बघितलेलं नाहीये. रस्त्याने जाताना सचिन त्यांना दिसतो पण स्वतःची मुलगी जात आहे आणि तिला आपण जवळ घ्यावं असंही त्याला वाटलं नाही. आज ती मुलगी आठ वर्षांची झालीये पण त्या मुलीला आपले वडील कोण आहेत याचीही माहिती नाही. कारण जन्माला आल्यापासून वडील म्हणजे काय हे तिला माहीत नाहीये आणि सुरेखाची सासू स्त्री असूनही घरामध्ये मुलगी जन्माला आली म्हणून मुलीसकट सुनेचा स्वीकार न करणे हा घेतलेला निर्णय भयानक आहे कारण याच्या मागचा इतिहास या घरामध्ये दोन पिढ्या मुलींचा जन्म झालेला नाही आणि हिला मुलगी कशी होऊ शकते अशी शंका व्यक्त केल्यामुळे आज सुरेखासोबत तिच्या मुलीलाही अनेक प्रसंगांना तोंड द्यावे लागत आहे आणि त्याचबरोबर सुरेखाला न्यायालयाच्या चकरा माराव्या लागत आहेत. आज स्वतःच्या पायावर उभे राहून तिला मुलीच्या सर्व गरजा भागवाव्या लागत आहेत. सचिन एक वडील असूनही वडील असल्याच्या जबाबदाऱ्या त्याने झिडकारून दिलेल्या आहेत. मुलगी झाली म्हणून ती आपली मुलगी नाहीये कारण आपल्याला मुलगी होऊ शकत नाही. मुलगा झाला असता या एका गोष्टीमुळे आज दोन जीवांचे आयुष्य बरबाद झालेलं आहे.
याला जबाबदार बुरसटलेली मानसिकता एवढीच आहे आणि एक स्त्री दुसऱ्या स्त्रीला समजून घेऊ शकत नाही हे भयानक सत्य आहे.
(सत्यघटनेवर आधारित)