Saturday, October 25, 2025
Happy Diwali

रायगड जिल्हा परिषदेत २ हजार ६०९ पदे रिक्त

रायगड जिल्हा परिषदेत २ हजार ६०९ पदे रिक्त

अलिबाग (प्रतिनिधी) : ग्रामीण भागातील विकासाला गती देण्याचे काम रायगड जिल्हा परिषदेचे असले, तरी जिल्हा परिषदेत विविध विभागांतील दोन हजार ६०९ पदे रिक्त असल्याने सध्या कार्यरत असणाऱ्या अधिकारी व कर्मचाऱ्यांवर कामाचा अतिरिक्त ताण येत असल्याचे चित्र आहे.

रायगड जिल्हा परिषदेत एकूण ११ हजार ५५५ पदे मंजूर असून, २ हजार ६०९ पदे रिक्त आहेत. त्यामुळे ही पदे लवकरात लवकर भरण्याची मागणी जिल्हा परिषदेकडून होत आहे. रायगड जिल्हा परिषदेचा कारभार गेल्या तीन वर्षांपासून प्रशासक चालवत आहेत. जोपर्यंत जिल्हा परिषदेच्या निवडणुका होत नाहीत, तोपर्यंत प्रशासकांच्या खांद्यावर जिल्हा परिषदेच्या कारभाराची जबाबदारी असणार आहे. त्यातच जिल्हा परिषदेत गट ब, क व ड संवर्गातील एकूण २ हजार ६०९ पदे रिक्त आहेत. यामध्ये वर्ग ‘ब’ मधील विभागातील सामान्य लघुलेखक ३; वित्त विभागातील सहाय्यक लेखाअधिकारी ७; बांधकाम विभाग कनिष्ठ अभियंता ३४; ग्रामीण पाणीपुरवठा कनिष्ठ अभियंता ५४; शिक्षण विभाग विस्तार अधिकारी ४६, केंद्रप्रमुख १३२, मुख्याध्यापक, प्राथमिक ९५ असे एकूण ३७१, तसेच गट `क’मध्ये सामान्य प्रशासन विभागातील १६४ पदे, वित्त विभाग १९, ग्रामपंचायत विभाग ८६, आरोग्य विभाग ६४०, बांधकाम विभाग ८७, ग्रामीण पाणीपुरवठा १, पशुसंवर्धन विभाग २५, शिक्षण विभाग प्राथमिक ९८१, महिला व बालकल्याण विभाग ३६ अशी एकूण २,०५० पदे रिक्त आहेत.

त्याचप्रमाणे गट ‘क’ मधील सामान्य प्रशासन विभागातील १३८, पशुसंवर्धन विभाग ४, आरोग्य विभाग २०, बांधकाम विभाग ३० अशी एकूण १९२ पदे आहेत. अशी रायगड जिल्हा परिषदेत एकूण ११ हजार ५५५ पदे मंजूर असून, गट ‘ब’, ‘क’ व ‘ड’ संवर्गातील एकूण २ हजार ६०९ पदे रिक्त आहेत.

दरम्यान, रायगड जिल्हा परिषदेचा कारभार गेल्या तीन वर्षांपासून सद्यस्थितीत मुख्य कार्यकारी अधिकारी नेहा भोसले व अतिरिक्त मुख्य कार्यकारी अधिकारी सत्यजित बडे जिल्हा परिषदेचा कारभार सांभाळत आहेत. रायगड जिल्हा परिषदेत सध्या विविध विभागांमध्ये रिक्त पदे आहेत, जी भरण्यासाठी भरती प्रक्रिया सुरु आहे.

Comments
Add Comment
प्रहार ई-पेपर
हे पण पहा