तुंबरू

महाभारतातील मोतीकण : भालचंद्र ठोंबरे


नारायण! नारायण! करीत त्रिलोकांत भ्रमण करणाऱ्या देवर्षी नारदमुनींची सगळ्यांना माहिती आहे; परंतु नारदाप्रमाणेच वीणावादन करणाऱ्या व गायनात नारदाचेच सहगायक असणाऱ्या तुंबरूबद्दल फार कमी माहिती आहे. तुंबरू हे गंधर्व असून इंद्रसभेत गायन करणाऱ्या गंधर्वाचे ते प्रमुख मानले जातात. अप्सरा, किन्नर व यक्ष यांच्याप्रमाणे गंधर्वांनाही अर्ध देव मानले जाते. गंधर्व हे सुंदर असून त्यांची वेशभूषा ही सुंदर असते. पुराणानुसार तुंबरू हे गंधर्व असून संगीत नृत्य व वादन याचे गुरू मानले जातात. तुंबरू गायनात नारदासोबतचा सहकारी असल्याचा उल्लेख आहे. ‘गणराज रंगी नाचतो’ या गाण्यात ‘नारद तुंबरू करिती गायन’ असा जो उल्लेख आहे त्यातील तुंबरू तो हाच.


तुंबरू गायन आणि वादन क्रियेत निपुण होता. हरिवंशानुसार गंधर्वाची उत्पत्ती ब्रह्मदेवाच्या केसापासून झाली, तर विष्णू व मत्स्य पुराणानुसार महर्षी कश्यप व त्याची पत्नी अरिष्ट यांच्यापासून गंधर्वाची उत्पत्ती झाली. तुंबरूला बाहू, हाहा, हुहु नावाचे तीन बंधू होते. तुंबरूला गायनात ‌गंधर्व श्रेष्ठ मानले जाते. अप्सरांपैकी रंभा ही त्याची पत्नी होती. त्यांना मनोवती व सुकेशा नामक दोन मुली होत्या.


नारदांनी विष्णूची आराधना केली व विष्णूच्या कृपेने नारदातील अहंकार नष्ट होऊन त्यांना देवश्रीची उपाधी प्राप्त झाली. तर तुंबरूनी प्रथम ब्रह्मदेव व नंतर शिवाची उपासना केली. या दोघांच्या कृपेने स्वतःतील अहंकार नष्ट होण्यासाठी तुंबरूने स्वतःसाठी अश्वमुख (घोड्याचे तोंड) मागून घेतले, तर शिवाच्या कृपेने त्यांना त्रिलोक भ्रमंतीच्या वरदानासह महामुनीच्या पदाची प्राप्ती झाली. मुनी म्हणजे अध्यात्मावर भाष्य करणारा तर महामुनी म्हणजे माया मय अध्यात्म व माया विरहित अध्यात्म यावर भाष्य करणारा व्यक्ती होय. तंबोरा व कलावती वीणा हे तुंबरूचे वाद्य आहे. तुंबरूच्या एका हाती वीणा, तर दुसऱ्या हातात चिपळ्या दर्शविलेल्या असतात. नारदाला तुंबरूचे गुरू मानले जाते. नारदाकडून त्यांना स्वर व राग आदीची शिकवण मिळाल्याचे ही मानले जाते. तुंबरू हे इंद्र व कुबेर यांच्या दरबारातील गायक असल्याचे मानले जाते. तुंबरूचा उल्लेख रामायण व महाभारत या दोन्हीही ग्रंथामध्ये आढळतो. वाल्मिकी रामायणातील अरण्य कांडानुसार एकदा रंभेसोबत वार्तालापात मग्न असल्याने तुंबरू कुबेराच्या सभेला वेळेवर पोहोचू शकले नाही . त्यामुळे कुबेर क्रोधित झाले व त्यांनी तुंबरूला राक्षस होण्याचा शाप दिला. तुंबरूनी क्षमायाचना केल्यानंतर प्रसन्न होऊन कुबेराने श्रीरामाच्या हातून तुझा उद्धार होईल असा उश्यापही दिला. त्या शापामुळे तुंबरू जव व शतहृद नामक राक्षस दांपत्याच्या पोटी जन्माला आले व दंडकारण्यात वास्तव्याला राहू लागले. त्यावेळेस त्यांचे नाव विराध असे होते. विराध अतिशय क्रूर व नरभक्षी होता. विराधाचे हात खूप लांब होते.


राम-लक्ष्मण व सीता वनवासात असताना दंडकारण्यातून जात असताना विराधाने त्यांना पाहिले तेव्हा त्याने राम व लक्ष्मणाला आपल्या लांब हातात पकडून घेऊन दूर जाऊ लागला. राम व लक्ष्मणाने आपल्या बाणाद्वारे त्याचे हात तोडले; परंतु तो मरण पावला नाही. तेव्हा रामाने लक्ष्मणाला एक खड्डा करावयास सांगून त्या खड्ड्यात विराधाला गाडले. त्यामुळे त्याचा मृत्यू झाला. मृत्यू होताच शाप मुक्त झालेला तुंबर प्रगटला व रामाला नमस्कार करून आपली पूर्ण कथा कथन केली व आपणास राक्षस योनीतून मुक्त केल्याबद्दल रामाचे आभार मानले.


तुंबरूकडे मधू (वैशाख) व माधव (माघ) महिन्यांचे अधिपत्य असल्याचे मानले जाते. मनोवतीने माता रंभेकडून नृत्याचे धडे घेतले व ती स्वर्गलोकात अप्सरा झाली, तर सुकेशा ही अध्यात्मिक वृत्तीची असल्याने तिने शिवाची आराधना केली व शिवाने प्रसन्न होऊन तिला शिवलोकात राहण्याचे वरदान दिले. तुंबरू ब्रह्मलोकी ब्रह्मदेव सरस्वती, वैकुंठात विष्णू लक्ष्मी व कैलासावर शिवपार्वती यांची स्तुती करीत असतात. वैशाख कृष्ण पक्षातील अष्टमीला तुंबरू जयंती साजरी करतात.

Comments
Add Comment

चिंपांझींची मैत्रीण

विशेष : उमेश कुलकर्णी चिंपाझींवर संशोधन करणारी लोकविलक्षण संशोधक जेन गुडॉल यांनी नव्वदीत जगाचा निरोप घेतला.

ऋषितुल्य रामकृष्ण भांडारकर

कोकण आयकॉन : सतीश पाटणकर रामकृष्ण गोपाळ भांडारकर हे संस्कृत पंडित, मराठी शिक्षणतज्ज्ञ, समाजसुधारक व प्रार्थना

अल्बेनियातला रोबो मंत्री

डॉ. दीपक शिकारपूर अलीकडेच अल्बेनियाने जगातील पहिले एआय मंत्री डिएला यांची नियुक्ती केली. याबाबत जगभर चर्चा सुरू

कैलास गुंफा मंदिर शिल्पकलेचा अद्वितीय नमुना

विशेष : लता गुठे महाराष्ट्रामध्ये पुरातन काळापासून देव, धर्म, संस्कृती आणि परंपरेला विशेष स्थान आहे हे आपल्या

आपुलीच प्रतिमा होते आपुलीच वैरी...

नॉस्टॅल्जिया : श्रीनिवास बेलसरे फक्त हिंदी चित्रपटांचे रिमेक इतर भारतीय भाषात होतात असे नाही. आपल्या मराठीतही

जीवनदान

प्रासंगिक : डॉ. विजया वाड उदयाचल हायस्कूल, गोदरेज, विक्रोळी-पूर्व ही अशिया खंडातील तिसऱ्या क्रमांकाची शाळा ! इथे