छत्रपती संभाजीनगर : मराठवाड्यात मागील काही दिवसांपासून झालेल्या अतिवृष्टीमुळे शेतीसह मत्स्यव्यवसायालाही फटका बसला आहे. जलाशय, तलाव, मत्स्यपालन केंद्रे पाण्याखाली गेली असून बोटी, होडी, जाळी, मत्स्यबीज यासह उपकरणांचे आणि मत्स्यपालकांचे मोठे आर्थिक नुकसान झाल्याचे समोर आले आहे. या पार्श्वभूमीवर राज्याचे मत्स्यव्यवसाय व बंदरे विभागाचे मंत्री नितेश राणे यांनी नुकसानीचा आढावा घेतला. प्रत्येक मत्स्यपालकांचे नुकसान व्यवस्थित नोंदविले गेले पाहिजे, शेतकऱ्याप्रमाणेच मत्स्यपालकांनाही शासनाची मदत मिळाली पाहिजे यासाठी नुकसानग्रस्त मत्स्यव्यावसायिकांचे तत्परतेने पंचनामे करून शासनाला अहवाल पाठवा असे निर्देशही त्यांनी दिले. अतिवृष्टीमुळे नुकसान झालेला मत्स्यव्यावसायिक मदतीपासून वंचित राहणार नाही, शासन म्हणून आपण मत्स्यव्यावसायिकांच्या पाठीशी असल्याचे सांगून त्यांनी उपस्थित मत्स्यव्यावसायिकांना धीर दिला.
जिल्हाधिकारी कार्यालयात मत्स्यव्यवसाय व बंदरे विकास मंत्री नितेश राणे यांनी छत्रपती संभाजीनगर आणि लातूर या दोन्ही विभागाच्या नुकसानीबाबत आढावा घेतला. मत्स्यव्यवसाय व बंदरे विकास मंत्री राणे म्हणाले, प्रत्येक मत्स्यपालकाचे अतिवृष्टीमुळे झालेले नुकसान अचूक नोंदविले गेले पाहिजे, शेतकऱ्याप्रमाणेच मत्स्यपालकानांही शासनाची मदत मिळाली पाहिजे. पंचनामे अचूक करून त्याबाबतचा अहवाल तातडीने शासनाकडे पाठवा जेणेकरून त्याआधारे तातडीने मदत देता येईल. मत्स्यपालकांना या संकटातून उभे करण्याची जबाबदारी आपल्या सर्वांची आहे. त्या दृष्टीने प्रत्येकाने आपली जबाबदारी समजून काम करावे. जलसंपदा विभागाने गाळ काढण्याबाबतचा कार्यक्रम तयार करावा. याबाबत राज्यस्तरीय कार्यक्रमाची आखणी मंत्रालय पातळीवरून करण्यात येणार असल्याचे त्यांनी सांगितले.
अतिवृष्टीमुळे नुकसान झालेला मत्स्यव्यावसायिक मदतीपासून वंचित राहणार नाही, शासन म्हणून आपण मत्स्यव्यावसायिकांच्या पाठीशी असल्याचे सांगून राणे म्हणाले, नुकसान भरपाईसोबत मत्स्यव्यावसयिकांना विविध सवलती देण्यासंदर्भात शासन सकारात्मक आहे. मत्स्यव्यवसाय विभागाने ज्या जिल्ह्यातील पंचनामे पूर्ण झाले त्याठिकाणचे मनुष्यबळ ज्याठिकाणी पंचनामे बाकी आहेत तिथे तातडीने उपलब्ध करून द्यावे. मत्स्यबीजाच्या दरामध्ये असलेल्या तफावती बाबत आपण लवकरच निर्णय घेणार असून जिल्हा परिषदेच्या अंतर्गत असलेल्या तलावांचे पंचनामे वेळेत करण्याबाबतही ग्रामविकास मंत्री महोदयांशी चर्चा करणार असल्याचे त्यांनी सांगितले.