
मुंबई: पती-पत्नी और पंगा या शोमध्ये अभिनेत्री रुबिना दिलैक पती अभिनव शुक्ला सोबत मस्ती करताना दिसत आहे. या शोमध्ये ती आपल्या आयुष्यातील अनेक भावनात्मक क्षण शेअर करत असते, जे तिच्या चाहत्यांसाठी खूप प्रेरणादायी ठरतात. सध्या प्रचंड आत्मविश्वासाने भरलेली दिसणारी रुबिना, गर्भधारणेनंतर (Pregnancy) मात्र आपला आत्मविश्वास गमावून बसली होती.
याबद्दल बोलताना रुबिनाने सांगितले की, गरोदरपणानंतर एका मोठ्या डिझायनरसाठी फॅशन शोमध्ये तिला शोस्टॉपर म्हणून रॅम्प वॉक करण्याची संधी मिळाली होती. स्वतःला सिद्ध करण्याची ही संधी तिने लगेच घेतली. तिचा गमावलेला आत्मविश्वास परत मिळवण्यासाठी तिला प्रत्यक्ष प्रेक्षकांचा (Live Audience) सामना करायचा होता. मात्र, रॅम्पवर पहिले पाऊल टाकतानाच ती डगमगली आणि तिचे संतुलन बिघडले.
या क्षणी, 'येथे येण्याऐवजी घरीच थांबले असते तर बरे झाले असते,' असा विचार तिच्या मनात एकदातरी आला. पण, लगेच दुसऱ्याच क्षणी तिने स्वतःला सावरले आणि हिंमत करून आत्मविश्वासाने पुढे चालणे सुरू केले. त्यानंतर तिला कोणतीही अडचण आली नाही, असे रुबिनाने स्पष्ट केले.