
पाटणा : बिहारमधील विधानसभेची निवडणूक अगदी जवळ आली आहे. इच्छुक उमेदवार आणि त्यांचे समर्थक तिकीट पक्के करण्यासाठी मोर्चेबांधणी करत आहेत. राज्यातील प्रमुख विरोधी पक्ष असलेल्या राष्ट्रीय जनता दलाचे प्रमुख लालूप्रसाद यादव यांच्या निवासस्थानी उमेदवारीवरून जोरदार गोंधळ झाला. लालूप्रसाद यादव आणि राबडी देवी यांच्या निवासस्थानी आरजेडीचे आमदार सतीश कुमार यांच्या उमेदवारीला विरोध करत असलेल्या कार्यकर्त्यांनी त्यांना पुन्हा उमेदवारी देण्यात येऊ नये अशी मागणी करत गोंधळ घातला. यावेळी आम्हाला चोरटा आमदार नको, सतीश कुमार यांना हरवायचे आहे, अशी घोषणाबाजी केली.
बिहारमधील मखदुमपूर विधानसभा मतदारसंघातील विद्यमान आमदार सतीश कुमार यांच्या उमेदवारीला विरोध करत अनेक कार्यकर्ते मखदुमपूर विधानसभा मतदारसंधातून पाटणा येथे आले होते. कार्यकर्ते अचानक लालूप्रसाद यादव यांच्या निवासस्थानी घुसले. विद्यमान आमदार सतीश कुमार यांनी कुठलेही काम केलेले नाही. जनतेच्या समस्यांकडे दुर्लक्ष केले आहे, असा आरोप त्यांनी केला. तसेच त्यांना पुन्हा उमेदवारी देऊ नये अशी मागणी केली.
लालूप्रसाद यादव यांच्या निवासस्थानी अचानक झालेल्या या आंदोलनामुळे एकच गोंधळ उडाला. सुरक्षा रक्षकांनी आंदोलकांना बाहेर काढण्याचा प्रयत्व केला. मात्र बराच वेळ हा गोंधळ सुरू होती. या घटनेमुळे निवडणुकीच्या तोंडावर आरजेडीच्या नेतृत्वाची अडचण वाढली आहे. तसेच तिकीट वाटपावरून अंतर्गत विरोधही वाढला आहे. मखदुमपूर येथून उमेदवारी कुणाला द्यायची हा प्रश्न उभा राहिला आहे