मुंबई खास प्रतिनिधी : मुंबई महानगरपालिकेतील आरोग्य संस्थांमधील रेबीज प्रतिबंधक लसीकरण केंद्रे, लसीकरण आणि उपचार, लसीकरण मोहीम, रेबीज प्रतिसाद पथक (RRT), श्वान नियंत्रण युनिट (DCOs), प्री-एक्स्पोजर प्रोफिलॅक्सिस (PrEP) आदींची सद्यस्थिती आणि त्या अनुषंगाने आवश्यक तयारी याबाबत विचारमंथन करण्यासाठी मुंबई महानगरपालिकेच्या रेबीजविषयक कार्यसमितीची (Task Force) बैठक शुक्रवारी ३ ऑक्टोबर २०२५ रोजी पार पडली. तसेच, रेबीज निर्मूलनासंबंधी प्रयत्नाचे बळकटीकरण’ या विषयावर कार्यशाळाही संपन्न झाली. मुंबई महानगरपालिकेच्या पशुवैद्यकीय आरोग्य विभागाच्या वतीने देवनार पशुवधगृह येथे या बैठक आणि कार्यशाळेचे आयोजन करण्यात आले होते.
प्राणी कल्याण करणे व प्राण्यांपासून होणारे संक्रमण टाळण्यासाठी मुंबई महानगरपालिका आयुक्त तथा प्रशासक भूषण गगराणी यांच्या निर्देशांनुसार, अतिरिक्त आयुक्त (शहर) डॉ. अश्विनी जोशी, उप आयुक्त (विशेष) चंदा जाधव यांच्या मार्गदर्शनाखाली विविध उपक्रम राबविले जात आहेत. याचा एक भाग म्हणून या उपक्रमांचे आयोजन करण्यात आले होते.
मुंबई महानगरपालिकेच्या पशुवैद्यकीय आरोग्य विभागाचे प्रमुख डॉ. कलिमपाशा पठाण, हाफकिन संस्थेच्या सहायक संचालक डॉ. उषा पद्मनाभन, वरिष्ठ पशु वैद्यकीय अधिकारी व रेबीज समन्वय अधिकारी डॉ. स्नेहा ताटेलू, वेव होपचे वैद्यकीय संचालक (विशेष उपक्रम) डॉ. शशिकांत जाधव, पेटा संस्थेचे भारतातील कायदेशीर सल्लागार व संचालक मीत अशर, सिटिझन के-९ इंडियाचे श्वान प्रशिक्षक राज मरीवाला, महानगरपालिकेचे सहायक वैद्यकीय अधिकारी मंगेश कुंभारे, सहायक वैद्यकीय अधिकारी सुरेश उचले, गोवा मिशन रेबीजच्या मेलिशा फिग्रेदो, वैद्यकीय अधिकारी डॉ. जुनेद शेख आदी या बैठकीस उपस्थित होते.
'मुंबई रेबीज निर्मूलन मोहीम' हा मुंबई महानगरपालिका व मिशन रेबीज यांच्या सहकार्याने सुरू करण्यात आलेला एक महत्त्वाकांक्षी उपक्रम आहे. वर्ष २०३० पर्यंत मुंबईला रेबीजमुक्त करण्याचा मुंबई महानगरपालिकेचा संकल्प आहे. या निमित्ताने जनजागृती अभियान, आरोग्य शिक्षण सत्रे आणि लसीकरण मोहिमा राबविण्यात येत आहेत.
याच धर्तीवर आयोजित बैठक आणि कार्यशाळेत बृहन्मुंबई महानगरपालिकेतील आरोग्य संस्थांमधील रेबीज प्रतिबंधक लसीकरण केंद्रे, लसीकरण आणि उपचार, लसीकरण मोहीम, रेबीज प्रतिसाद पथक (RRT), श्वान नियंत्रण युनिट (DCOs), प्री-एक्स्पोजर प्रोफिलॅक्सिस आदींची सद्यस्थिती आणि त्या अनुषंगाने आवश्यक तयारी यासोबतच मुंबई रेबीज निर्मूलन मोहीमेसंबंधित कायदेशीर बाबी, प्राण्यांचे वर्तन, नागरिकांशी संवाद आदी विषयांवर चर्चा करण्यात आली.