
पर्यावरणपूरक नवरात्र उत्सवाला प्रतिसाद
विरार (प्रतिनिधी) : वसई-विरार शहर पालिका कार्यक्षेत्रात दुर्गा देवीच्या मूर्तींचे विसर्जन मोठ्या जल्लोषात व सुरळीत पार पडले. मूर्ती विसर्जनासाठी पालिकेतर्फे २३ कृत्रिम तलाव तयार करण्यात आले होते, तसेच ०४ जेट्टींच्या ठिकाणी व ०२ बंद दगड खाणींच्या ठिकाणीही विसर्जनाची व्यवस्था करण्यात आली होती. गुरुवारी रात्री उशिरापर्यंत चाललेल्या या विसर्जनात १,६६७ घरगुती व ९५७ सार्वजनिक अशा एकूण २,६२४ मूर्तींचे विसर्जन झाले. यापैकी १,०७६ घरगुती व ४७७ सार्वजनिक असे एकूण १,५५३ मूर्तींचे विसर्जन पालिकेच्या कृत्रिम तलावांमध्ये झाले. तसेच ५९१ घरगुती व ४८० सार्वजनिक असे एकूण १,०७१ मूर्तींचे विसर्जन हे जेट्टीच्या व बंद दगड खाणींच्या ठिकाणी झाले.
पालिकेने विसर्जन स्थळी निर्माल्य जमा करणे साठी ठेवलेले निर्माल्य कलश, घट ठेवण्यासाठी केलेली व्यवस्था, विद्युत व्यवस्था व इतर सर्व आवश्यक सोई सुविधा तसेच जेटीच्या व बंद दगड खाणींच्या ठिकाणी विसर्जनासाठी केलेली बोटीची, तराफ्यांची व्यवस्था, विसर्जन स्थळी केलेली सुरक्षा व्यवस्था यामुळे विसर्जन सुरळीत पार पडले. विसर्जन प्रक्रिया सुरळीत पार पाडण्यासाठी आयुक्त मनोजकुमार सूर्यवंशी यांच्या नेतृत्वाखाली महानगरपालिकेचे दोन्ही अतिरिक्त आयुक्त, सर्व उप आयुक्त, सर्व सहाय्यक आयुक्त, विभाग प्रमुख, अग्निशमन कर्मचारी, वैद्यकीय कर्मचारी व इतर सर्व कर्मचारी यांनी विसर्जन स्थळी हजर राहून विसर्जन प्रक्रिया व्यवस्थितरीत्या पार पाडण्यासाठी प्रयत्न केले. त्याचप्रमाणे पोलीस प्रशासनानेही विसर्जनाच्या मार्गांवर ट्रॅफिकचे उत्तम नियोजन केल्यामुळे व मिरवणुकीवेळी कोणताही अनुचित प्रकार घडणार नाही याबाबत दक्षता घेतल्यामुळे विसर्जन योग्यरीत्या पार पडण्यास सहकार्य मिळाले.