सांगली (वार्ताहर) : मराठी रंगभूमीवरील मानाचा समजला जाणारा नाट्य क्षेत्रातील यंदाचा विष्णुदास भावे गौरव पदक पुरस्कार ज्येष्ठ अभिनेत्री नीना कुळकर्णी यांना जाहीर झाला आहे. या पुरस्काराची घोषणा अखिल महाराष्ट्र नाट्य विद्यामंदिर समितीचे अध्यक्ष डॉ. शरद कराळे यांनी शुक्रवारी सांगलीत केली. मराठी चित्रपट, दूरदर्शन, नाट्य क्षेत्रातील ज्येष्ठ अभिनेत्री, नाट्य प्रशिक्षिका अशा अनेक क्षेत्रात नीना कुळकर्णी यांचे उल्लेखनीय कार्य आहे. यंदा दिले जाणारे हे ५८ वे विष्णुदास भावे गौरव पदक आहे.

५ नोव्हेंबर रोजी रंगभूमीदिनाच्या औचित्याने हा पुरस्कार वितरण सोहळा होणार आहे. गौरवपदक, रोख रक्कम रु. २५ हजार, स्मृतीचिन्ह, शाल आणि श्रीफळ असे गौरवपदकाचे स्वरूप आहे. नीना कुळकर्णी या एक नावाजलेल्या भारतीय अभिनेत्री, लेखिका, निर्माती आणि दिग्दर्शिका आहेत. मराठी, हिंदी आणि इंग्रजी रंगभूमी, चित्रपट, दूरदर्शन तसेच आंतरराष्ट्रीय चित्रपट सृष्टीत त्यांनी आपले बहुपरिमित आणि समृद्ध योगदान दिले आहे. त्यांचा कलात्मक प्रवास १९७० च्या दशकाच्या सुरुवातीला मॉडेलिंगपासून सुरु झाला. त्या भारतीय प्रिंट मीडियातील पहिल्या ‘क्लिअरासिल गर्ल’ म्हणून ओळखल्या जातात.
आपल्या बहुआयामी आणि प्रदीर्घ कारकिर्दीत नीना कुळकर्णी यांना राष्ट्रीय चित्रपट पुरस्कार, महाराष्ट्र राज्य चित्रपट पुरस्कार, फिल्मफेअर मराठी पुरस्कार, नाट्यदर्पण, आणि नाट्य परिषद यांसारखे अनेक सन्मान प्राप्त झाले आहेत. २०२५ मध्ये त्यांना अखिल भारतीय नाट्य परिषद कडून सर्वोत्कृष्ट अभिनेत्री पुरस्कार आणि जीवनगौरव पुरस्कार प्राप्त झाला आहे.