Friday, October 3, 2025

'बाळासाहेबांचा मृतदेह २ दिवस ‘मातोश्री’त का ठेवला ?' नार्को टेस्ट कराच!

'बाळासाहेबांचा मृतदेह २ दिवस ‘मातोश्री’त का ठेवला ?' नार्को टेस्ट कराच!

बाळासाहेबांच्या मृत्यूपत्रावरुन नवा वाद, रामदास कदमांनी दिली धक्कादायक माहिती

मुंबई : गोरेगावच्या नेस्को एक्झिबिशन सेंटरमध्ये शिवसेनेचा दसरा मेळावा झाला. राज्याचे उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी शिवसैनिकांना मार्गदर्शन केले. या मेळाव्यात शिवसेना नेते रामदास कदम यांनी उद्धव ठाकरे आणि त्यांच्या नेतृत्वावर जोरदार टीका केली. कदमांनी बाळासाहेब ठाकरे यांच्या निधनानंतर मातोश्रीवर काय घडलं याबाबत गंभीर आरोप करत संपूर्ण घटना उघडकीस आणण्याची मागणी केलीय. दसरा मेळाव्यात रामदास कदम म्हणाले, “शिंदे साहेब, एक विनंती आहे. बाळासाहेबांचं निधन कधी झालं? त्यांची बॉडी मातोश्रीवर दोन दिवस का ठेवली गेली ? त्या वेळी मी स्वतः आठ दिवस मातोश्रीच्या बाकड्यावर झोपलो होतो, सगळं माझ्या नजरेसमोर घडलं. कोणीतरी सांगितलं होतं की बाळासाहेबांचे ठसे घेतले गेले. मृत्यूपत्र कोणाकडून तयार करण्यात आलं, त्यावर सही कोणी केली ?... हे सारे प्रश्न आजही अनुत्तरित आहेत. याची चौकशी व्हायला हवी.”

इतकंच नव्हे तर कदमांनी उद्धव ठाकरेंवर जुने शिवसैनिक संपवल्याचा आरोप केला. “आम्ही शिवसेना मोठी केली, जेल भोगली, लढलो. पण उद्धव ठाकरेंनी मनोहर जोशी, दिवाकर रावते, गजानन कीर्तीकर, अगदी माझ्यासारखे नेतेही संपवले. एकनाथ शिंदे यांच्यामागेही उद्धव लागले होते. बाळासाहेब गेल्यानंतर ज्यांनी त्यांना पन्नास वर्षे साथ दिली, त्या सर्व नेत्यांना दूर सारण्याचं काम उद्धव यांनी केलं.” कदमांनी मराठी माणूस आणि मुंबईतील बदलांबद्दलही भाष्य केले. ते म्हणाले, “मराठी माणसाला खरा सन्मान बाळासाहेबांनी दिला. पण गेली तीस वर्ष उद्धव ठाकरेंच्या हातात महानगरपालिका असूनही फक्त टक्क्याचं राजकारण झालं. गिरण्यांच्या जागी उंचच उंच इमारती झाल्या, पण त्यात एकही मराठी माणूस राहिला नाही. उद्धव ठाकरेंनी मराठी माणसासाठी काय केलं ?” रामदास कदमांनी उद्धव ठाकरेंवर थेट हल्ला चढवत म्हटलं की, “राज ठाकरेंच्या मागे तुम्ही भीकेचा कटोरा घेऊन फिरता. दोन भाऊ नाही, दहा जणही सोबत आले तरी मुंबईकर तुम्हाला कायमचा गाडल्याशिवाय राहणार नाहीत, हा माझा विश्वास आहे.” एकूणच, या दसरा मेळाव्यातील रामदास कदमांच्या भाषणाने उद्धव ठाकरेंविरोधात वातावरण तापवलं. बाळासाहेबांच्या निधनाशी संबंधित जुन्या घटनांचा उल्लेख करून त्यांनी गंभीर प्रश्न उपस्थित केले आणि शिवसेनेच्या राजकारणावर कडाडून प्रहार केला. इतकंच काय तर त्यांनी माझी व उद्धव ठाकरेंची नार्को टेस्ट करा, अशी मागणी देखिल केलीय.
Comments
Add Comment