
दसऱ्याच्या शुभ मुहूर्तावर ऋषभ शेट्टी दिग्दर्शित बहुचर्चित चित्रपट ‘कांतारा : अ लेजेंड – चॅप्टर १’ अखेर प्रेक्षकांच्या भेटीस आला आहे. जगभरातील थिएटरमध्ये कालपासून या चित्रपटाचे शो सुरू झाले असून, प्रेक्षकांचा अफाट उत्साह पाहायला मिळत आहे. प्रदर्शनाच्या पहिल्याच दिवशी 'कांतारा चॅप्टर १' पाहून प्रेक्षक सकारात्मक प्रतिक्रिया मिळत आहेत.
२०२२मध्ये आलेल्या पहिल्या कांताराने पहिल्याच दिवशी साधारण २ कोटी रुपये कमावले होते. आता ‘कांतारा चॅप्टर १’ने केवळ अॅडव्हान्स बुकिंगमधूनच त्यापेक्षा कितीतरी पटीनं मोठा टप्पा गाठल्याने, पुढील काही दिवसांत बॉक्स ऑफिसवर नवा विक्रम प्रस्थापित होण्याची शक्यता वर्तवली जात आहे.
चित्रपट प्रदर्शित होण्यापूर्वीच याने अॅडव्हान्स बुकिंगमध्ये भन्नाट कामगिरी केली आहे. रिपोर्टनुसार, फक्त एका दिवसात तब्बल १.७ लाखांपेक्षा जास्त तिकिटांची विक्री झाली असून, यामुळे जवळपास ५.७ कोटी रुपयांचा प्रीसेल कलेक्शन मिळाला. विशेष म्हणजे या आकड्याने अनेक मोठ्या चित्रपटांनाही मागे टाकले आहे. सोशल मीडियावर अनेकांनी हा सिनेमा ‘नेत्रदीपक’ असल्याचे मत व्यक्त केले. एका रिव्ह्यूमध्ये ‘हा चित्रपट नक्की पाहावा’ अशी थेट शिफारस करण्यात आली आहे. प्रेक्षकांनी सिनेमातील म्युझिक, बॅकग्राउंड स्कोर आणि सिनेमॅटोग्राफीला ‘उत्कृष्ट’ असे वर्णन केले आहे.
'कांतारा चॅप्टर १' हा मायथोलॉजिकल-ॲक्शन चित्रपट ऋषभ शेट्टीने दिग्दर्शित केला आहे. ऋषभनेच या चित्रपटात प्रमुख भूमिका साकारली आहे. चित्रपटाची भव्यता, कथा आणि ऋषभ शेट्टीच्या अभिनयाचे प्रेक्षक तोंडभरून कौतुक करत आहेत. एकूणच 'कांतारा चॅप्टर १' सिनेमा बॉक्स ऑफिसवर वादळ आणणार, यात शंका नाही.