Friday, October 3, 2025

मुंबई महापालिकेत सहायक आयुक्तांची खांदेपालट, कुणाची कुठे बदली, कुणाची कुठे वर्णी...

मुंबई महापालिकेत सहायक आयुक्तांची खांदेपालट, कुणाची कुठे बदली, कुणाची कुठे वर्णी...

मुंबई (खास प्रतिनिधी) : मुंबई महापालिकेत पुन्हा एकदा सहायक आयुक्तांची खांदेपालट करून विद्यमान सहायक आयुक्तांची बदली करण्यात आली आहे. यामध्ये विद्यमान सहायक आयुक्तांची बदली करतानाच नवीन सहायक आयुक्तांची वर्णीही काही रिक्त जागांवर लावण्यात आली आहे. माटुंगा एफ उत्तर विभागातून बी विभागात बदली झालेले आणि के पूर्व विभागाचा प्रभारी भार असणाऱ्या नितीन शुक्ला यांच्याकडून बी विभाग काढून घेण्यात आला आहे, तर एफ दक्षिण विभागाचे सहायक आयुक्त महेश पाटील यांची बदली एस विभागांत करतानाच दोन कार्यकारी अभियंत्यांकडे दिलेल्या प्रभारी भार काढून घेत त्यांना पुन्हा त्यांच्या नगर अभियंता विभागात परत पाठवण्यात आले आहे.

मुंबई महापालिकेत सहा नवीन सहायक आयुक्त पदासाठी पात्र ठरलेल्या उमेदवारांचा प्रशिक्षण कालावधी संपुष्टात आल्यानंतर यापैंकी चार सहायक आयुक्तांची नियुक्ती सी, बी, आर दक्षिण आणि एफ दक्षिण विभागाच्या रिक्तपदी करण्यात आली आहे. कार्यकारी अभियंता तथा उपप्रमुख अभियंता पदी असलेले संजय इंगळे यांच्यावर सी विभागाचा आणि मनिष साळवे यांच्यावर आर दक्षिण विभागाचा प्रभारी पदभार सोपवण्यात आला होता. परंतु या दोन्ही प्रभारी सहायक आयुक्तांना पुन्हा त्यांच्या खात्यात परत पाठवून ज्या रिक्त जागी नवीन नियुक्त झालेल्या सहायक आयुक्तांवर याची जबाबदारी सोपवण्यात आली.

सध्या सहा पैंकी चार नवीन सहायक आयुक्तांवर विभागाची जबाबदारी सोपवण्यात आली आहे, यामध्ये दोन महिला तर दोन पुरुष सहायक आयुक्तांचा समावेश आहे. या दोन्ही महिलांना एफ दक्षिण आणि आर दक्षिण विभागाची जबाबदारी सोपवण्यात आली आहे, तर दोन्ही पुरुषांना बी आणि सी विभागांची जबाबदारी सोपवण्यात आली आहे.

विद्यमान सहायक आयुक्तांच्या बदल्या

नितीन शुक्ला : बदलीचे ठिकाण के पूर्व विभाग

महेश पाटील : बदलीचे ठिकाण एस विभाग

अलका ससाणे : बदलीचे ठिकाण बाजार विभाग

संजय इंगळे : बदलीचे ठिकाण नगर अभियंता विभाग

मनिष साळवे : बदलीचे ठिकाण नगर अभियंता विभाग

नवीन नियुक्त सहायक आयुक्तांची नियुक्ती

योगेश देसाई : बी विभाग

वृषाली इंगोले : एफ दक्षिण

आरती गोळेकर : आर दक्षिण

संतोष साळुंके : सी विभाग

Comments
Add Comment