
नवी दिल्ली: पाकिस्तानच्या महिला क्रिकेट संघाची माजी कर्णधार आणि सध्या समालोचक (Commentator) म्हणून काम पाहणाऱ्या सना मीर हिने वादग्रस्त वक्तव्य केल्याने मोठा गदारोळ झाला आहे. दरम्यान, तिने यावर स्पष्टीकरणही दिले आहे. विश्वचषक सामन्यादरम्यान केलेल्या या विधानामुळे सोशल मीडियावर मात्र तिच्याविरोधात जोरदार गदारोळ झाला आहे.
नेमका काय आहे वाद?
महिला एकदिवसीय विश्वचषक २०२५ मधील पाकिस्तान आणि बांगलादेश यांच्यातील सामन्यादरम्यान सना मीर समालोचन करत होती. यावेळी, पाकिस्तानची खेळाडू नतालिया परवेझ हिच्याबद्दल बोलताना सना मीरने तिला "आझाद काश्मीर" मधून आलेली खेळाडू म्हणून संबोधले.
पाकव्याप्त काश्मीर (PoK) चा उल्लेख "आझाद काश्मीर" असा करणे, हा राजकीयदृष्ट्या संवेदनशील मुद्दा आहे. आंतरराष्ट्रीय क्रिकेट परिषदेच्या (ICC) नियमांनुसार, खेळाच्या मैदानावर किंवा समालोचनादरम्यान राजकीय टिप्पणी करण्यास सक्त मनाई आहे.
भारतीयांकडून संताप
सना मीरच्या या वक्तव्यामुळे भारतीय क्रिकेट चाहते प्रचंड संतापले आहेत. त्यांनी सोशल मीडियावर मीरवर जोरदार टीका करत तिला समालोचन पॅनलमधून काढून टाकण्याची मागणी केली आहे. 'क्रिकेटमध्ये राजकारण आणू नका,' अशा प्रतिक्रिया भारतीय चाहत्यांनी दिल्या आहेत.
सना मीरने दिले स्पष्टीकरण
या वादावर स्पष्टीकरण देताना सना मीर म्हणाली की, "माझ्या टिप्पणीचा विपर्यास केला जात आहे. मी एका खेळाडूच्या प्रवासातील आव्हानं आणि तिच्या संघर्षमय वाटचालीवर प्रकाश टाकण्यासाठी केवळ तिच्या मूळ गावाबद्दल (Home Town) बोलले होते. दूरच्या भागातून येणाऱ्या खेळाडूंना संधी मिळवण्यासाठी कोणत्या अडचणींचा सामना करावा लागतो, हे सांगण्याचा माझा हेतू होता."
It's unfortunate how things are being blown out of proportion and people in sports are being subjected to unnecessary pressure. It is sad that this requires an explanation at public level.
My comment about a Pakistan player's hometown was only meant to highlight the challenges… pic.twitter.com/G722fLj17C — Sana Mir ثناء میر (@mir_sana05) October 2, 2025
सना मीरने जरी स्पष्टीकरण दिले असले तरी, हा मुद्दा आता क्रिकेटच्या नियमांनुसार राजकीय टिप्पणीच्या चौकटीत येतो की नाही, यावर आयसीसी काय निर्णय घेते हे पाहणे महत्त्वाचे ठरणार आहे.