
सरकारी दूरसंचार कंपनी बीएसएनएलने (भारत संचार निगम लिमिटेड) टाटा कम्युनिकेशन्ससोबत हातमिळवणी केली आहे. या भागीदारीमुळे संपूर्ण देशभरात ई-सिम सेवा सुरू होणार आहे. ई-सिम हे एक डिजिटल सिम कार्ड आहे. यासाठी तुमच्या फोनमध्ये प्रत्यक्ष सिम कार्ड टाकण्याची गरज नसते. तुम्ही दूरस्थपणे मोबाइल कनेक्टिव्हिटी ॲक्टिव्हेट करू शकता. ज्यांच्याकडे ड्यूल-सिम फोन आहेत, ते लोक एकाच वेळी ई-सिम आणि नेहमीचे फिजिकल सिम कार्ड वापरू शकतील. विशेषतः आंतरराष्ट्रीय प्रवासादरम्यान लोकल ऑपरेटरशी कनेक्ट होण्यासाठी ही सेवा खूप फायद्याची ठरणार आहे. टाटा कम्युनिकेशन्सचा 'मुव्ह प्लॅटफॉर्म' या ई-सिम सेवेला तांत्रिक पाठबळ देणार आहे. यामुळे बीएसएनएलला त्यांच्या देशभरातील ग्राहकांसाठी ई-सिमची व्यवस्थापन करणे सोपे होणार आहे.
बीएसएनएलच्या या ई-सिम सेवेमुळे ग्राहकांना टू-जी, थ्री-जी आणि फोर-जी सेवांसाठी क्यूआर कोड स्कॅन करून लगेच कनेक्टिव्हिटी मिळवता येईल. बीएसएनएलचे अध्यक्ष आणि व्यवस्थापकीय संचालक ए रॉबर्ट रवी यांनी सांगितले की, "देशभरात ई-सिम सेवा सुरू करणे हे आमच्या राष्ट्रीय दूरसंचार क्षमतेमधील एक मोठे आणि महत्त्वाचे पाऊल आहे. टाटा कम्युनिकेशन्सच्या मदतीने आम्ही नागरिकांसाठी मोबाइल सेवा अधिक सोयीस्कर, सुरक्षित आणि कार्यक्षम बनवत आहोत." पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी अलीकडेच ओडिशाच्या झारसुगुडा येथून संपूर्णपणे स्वदेशी तंत्रज्ञानावर आधारित बीएसएनएलच्या फोर-जी नेटवर्कचे उद्घाटन केले. यासाठी ९७ हजार ५०० हून अधिक मोबाइल टॉवर्स उभे करण्यात आले आहेत.
पोस्ट ऑफिसमध्ये सेवा: कंपनीने पोस्ट विभागासोबत करार करून देशातील १.६५ लाख पोस्ट ऑफिसमधून सिम कार्ड विक्री आणि मोबाइल रिचार्ज सेवा देण्यास सुरुवात केली आहे. या नवीन ई-सिम सुविधेमुळे बीएसएनएलचे ग्राहक आता अधिक आधुनिक आणि डिजिटल सेवांचा लाभ घेऊ शकतील.