
कौन बनेगा करोडपती’ हा शो छोट्या पडद्यावरील सगळ्यात लोकप्रिय शो आहे. आजवर लाखो स्पर्धकांनी या शोमध्ये सहभागी होत आपल्या करोडपती बनण्याच्या स्वप्नाचा प्रवास केला आहे. अशातच नुकत्याच झालेल्या भागात नांदेडच्या एका शेतकऱ्याने ‘कौन बनेगा करोडपती’मध्ये सहभाग घेतला होता. नांदेड जिल्ह्यातील कैलास रामभाऊ कुंटेवाद ‘कौन बनेगा करोडपती’मध्ये सहभागी झाले होते आणि यावेळी त्यांनी हॉट सीटवर बसून सर्वांची मनं जिंकली. यावेळी त्यांनी सलग १४ प्रश्नांची अचूक उत्तरं देत ५० लाख रुपये जिंकले. त्यामधून अमिताभ बच्चन यांनी कैलास यांचं कौतुक केलं.
पुढे ५० लाखांनंतरच्या म्हणजेच एक कोटी रुपयांचा प्रश्न आला तेव्हा कैलास यांनी उत्तर देण्यासाठी ‘लाइफलाइन’ वापरली. पण, तरीसुद्धा त्यांना योग्य उत्तराची शंका होतीच. त्यामुळे त्यांनी धोका न पत्करता, शोमधून बाहेर पडण्याचा निर्णय घेतला आणि ५० लाख रुपये इतकी रक्कम जिंकली. एक कोटीच्या प्रश्नाचं योग्य उत्तर कैलास यांना देता आलं नसलं तरी त्यांनी ५० लाखांपर्यंत कोणतीही मदत न घेता, प्रश्नोत्तरांचा हा खेळ अगदी यशस्वीरीत्या खेळला.

त्यामुळे त्यांचं कौतुक होताना दिसत आहे. या भागात अमिताभ बच्चन यांनी कैलास यांच्या वैयक्तिक आयुष्याबद्दलही माहिती दिली. कैलास हे शेती करून महिन्याला साधारण ३,००० रुपये कमावतात. ते क्रिकेटचे खूप मोठे चाहते असून, आपल्या दोन मुलांना क्रिकेटपटू बनवण्याचं त्यांचं स्वप्न आहे. या शोमध्ये मिळालेल्या पैशातून ते आता मुलांना क्रिकेट अॅकॅडमीत घालणार आहेत.