Friday, October 24, 2025
Happy Diwali

गोरेगाव–मुलुंड जोड रस्ता प्रकल्प: दिंडोशी न्‍यायालय ते दादासाहेब फाळके चित्रनगरी दरम्यानचे काम प्रगतीपथावर

गोरेगाव–मुलुंड जोड रस्ता प्रकल्प: दिंडोशी न्‍यायालय ते दादासाहेब फाळके चित्रनगरी दरम्यानचे काम प्रगतीपथावर

मुंबई (खास प्रतिनिधी) : गोरेगाव - मुलुंड जोड मार्ग प्रकल्‍प (GMLR) अंतर्गत दिंडोशी न्‍यायालय ते दादासाहेब फाळके चित्रनगरी दरम्‍यान उभारण्‍यात येणा-या उड्डाणपुलाचे बांधकाम प्रगती पथावर असून एकूण ३१ खांबांपैकी २७ खांबांची उभारणी पूर्ण झाली आहे. रत्‍नागिरी जंक्‍शन येथे ४ खांब उभारण्‍याची प्रक्रिया वेगाने सुरू आहे. त्यामुळे नियोजित वेळापत्रकानुसार, खांबांवर तुळई स्‍थापित करणे , डेक स्‍लॅब ओतकाम , उड्डाणपुलाच्या दोन्ही बाजूंचे पोहोच मार्ग व अनुषंगिक कामे करून येत्या १६ मे २०२६ पर्यंत उड्डाणपूल वाहतुकीस खुला करणयात येणार आहे.

अतिरिक्‍त महानगरपालिका आयुक्‍त (प्रकल्‍प) अभिजीत बांगर यांनी महानगरपालिका मुख्यालयात या उड्डाणपुलाच्या प्रगतिचा आढावा घेतला. या बैठकीस प्रमुख अभियंता (पूल) उत्तम श्रोते, कार्यकारी अभियंता नरेश मेघराजानी यांच्यासह संबंधित अधिकारी, अभियंता उपस्थित होते.

गोरेगाव-मुलुंड जोड मार्ग हा मुंबईमधील पूर्व आणि पश्चिम उपनगरांना एकमेकांशी जोडणारा चौथा प्रमुख जोडरस्ता आहे. विशेषत: उत्तर मुंबईतील वाहतुकीस याचा मोठा फायदा होणार आहे. सुमारे १२.२० किलोमीटरच्‍या या प्रकल्पामुळे पूर्व-पश्चिम उपनगरांदरम्यान नवीन जोडरस्ता तयार होईल आणि नागरिकांना वाहतूक कोंडीपासून दिलासा मिळणार आहे. गोरेगाव ते मुलुंडदरम्यान प्रवासाचा कालावधी ७५ मिनिटांवरून सुमारे २५ मिनिटांपर्यंत कमी होईल. इंधन वापरात बचत होण्यासह मुंबईच्या वायू गुणवत्ता निर्देशांकातही (एक्यूआय) सुधारणा होणार आहे.

GMLR

गोरेगाव-मुलुंड जोड मार्ग प्रकल्प एकूण चार टप्प्यांमध्ये प्रस्तावित आहे. टप्पा ३ (अ) मध्ये उड्डाणपूल, एलिव्हेटेड रोटरी बांधकामाचा समावेश आहे. या प्रकल्प अंतर्गत दिंडोशी-गोरेगाव-दादासाहेब फाळके चित्रनगरी दरम्‍यान सहापदरी उड्डाणपुलाचे काम सुरू आहे. याची लांबी १,२६५ मीटर आहे. उड्डाणपुलासाठी बॉक्स गर्डर व काँक्रिटचा वापर केला जात आहे. तसेच, रस्ता ओलांडण्याकरिता पादचारी पूल, स्वयंचलित सरकता जिन्याची सुविधा उपलब्‍ध करून दिली जाणार आहे.

या उड्डाणपुलाची उभारणी दोन टप्प्यांत करण्यात येत असून त्यामध्ये गोरेगाव बाजू आणि मुलुंड बाजू असे दोन भाग आहेत. दिंडोशी न्‍यायालयापासून पुलास सुरूवात होते. रत्‍नागिरी जंक्‍शन हॉटेल येथे ९० अंश कोनात उड्डाणपूल वळतो. तर, दादासाहेब फाळके चित्रनगरी येथे उतरतो. पुलाचे एकूण ३१ खांब असून, त्यांचे उभारणी विभागांचे स्पॅन आहेत. एकूण २६ पैकी १२ स्पॅनचे काम पूर्ण करण्यात आले आहे. उर्वरित १४ स्पॅनचे काम दिनांक १५ फेब्रुवारी २०२६ पर्यंत करण्‍याचे नियोजन आहे. आतापर्यंत २७ खांबांची उभारणी यशस्वीरीत्या पूर्ण झाली आहे. तर, रत्नागिरी जंक्शन हॉटेलच्‍या वळणावरील उर्वरित ४ खांब उभारणी प्रगतिपथावर आहे.

पुलाच्‍या दोन्‍ही बाजूस पोहोच मार्ग आहेत. त्‍यापैकी दिंडोशी न्‍यायालय बाजूकडील पोहोच मार्गाचे बांधकाम दिनांक ३१ जानेवारी २०२६ तसेच, दादासाहेब फाळके चित्रनगरी येथील पोहोच मार्गाचे बांधकाम दिनांक ३० एप्रिल २०२६ पर्यंत पूर्ण केले जाणार आहे. बांधकामानंतरची इतर अनुषंगिक कामे उर्वरित पंधरा दिवसात केली जातील. येत्या १६ मे २०२६ पर्यंत उड्डाणपूल वाहतुकीस खुला करण्‍याचे मुंबई महानगरपालिकेचे उद्दिष्‍ट आहे. उड्डाणपुलाच्‍या दुस-या टप्‍प्‍याअंतर्गत मुलुंड बाजूकडे काही बांधकामे बाधित होत आहेत. बाधित बांधकामांची पुनर्वसन प्रक्रिया पूर्ण करुन ती जागा उपलब्ध करुन घेण्यात येईल. जेणेकरुन, या भागातील पुलाच्या कामास गती मिळेल.

Comments
Add Comment
प्रहार ई-पेपर
हे पण पहा
संबंधित बातम्या आणखी वाचा >