तिघांचे मृतदेह हाती लागले असून, अन्य एकाचा शोध सुरू आहे
शिरोडा : सिंधुदुर्ग जिल्ह्यामधील सिंधुदुर्ग -शिरोडा वेळागर समुद्रात नऊ पर्यटक बुडाले. यापैकी तिघांचे मृतदेह हाती लागले असून, पाच जणांना वाचवण्यात यश आले आहे. अन्य एकाचा शोध सुरू आहे.
शिरोडा - वेळागर येथील समुद्रकिनारी शुक्रवारी दुपारी ४:४५ दरम्यान बेळगाव व कुडाळ येथील दोन कुटुंबातील ९ जण फिरण्यासाठी आले होते. निळ्याशार समुद्राच्या लाटावर पाण्यात खेळण्याची त्यांना इच्छा झाली. त्यामुळे सगळेजण समुद्राच्या पाण्यात उतरले. मात्र समुद्राला तुफान असल्याने एका मोठ्या लाटेबरोबर हे सर्वजण पाण्यात खेचले जाऊन बुडाल्याची घटना घडली.
स्थानिकांमुळे सदर पर्यटकातील ५ जणांना समुद्रातून बाहेर काढण्यात यश आले आहे. मात्र यातील ३ पर्यटकांचा मृत्यू झाला. अत्यवस्थ महिलेवर शिरोडा उपजिल्हा रुग्णालय उपचार सुरू आहेत. रात्र झाल्याने आणि समुद्र खवळलेला असल्याने पोलिसांनी बचाव कार्य थांबवले आहे. शनिवारी सकाळी पुन्हा बचावकार्य सुरू करून शोध घेतला जाणार आहे अशी माहिती पोलीस निरीक्षक निसर्ग ओतारी यांनी दिली.
बेळगाव येथील कित्तूर कुटुंब गुरुवारी बेळगाव येथून कुडाळ गुडीपूर येथील आपले नातेवाईक मणियार कुटुंबीयांकडे आले होते. शुक्रवारी त्यांनी फिरत फिरत शिरोडा समुद्रकिनारी दुपारी भेट दिली. मौज मजा करण्यासाठी समुद्राच्या पाण्यात उतरलेल्या या दोन्ही कुटुंबावर काळाने घाला घातला. बघता बघता होत्याचे नव्हते झाले. पाण्यात उतरलेले ९ जण समुद्राच्या पाण्यात बुडाले.
किनाऱ्यावर असलेल्या स्थानिकांनी त्यांना वाचवण्याचे शर्तीचे प्रयत्न केले. आजू अमरे, सूरज अमरे, समीर भगत तसेच राज स्पोर्ट्सचे राजेश नाईक आणि त्यांच्या सहकाऱ्यांनी बुडत असलेल्या या पर्यटकांना पाण्याबाहेर काढण्यासाठी खूप प्रयत्न करून ९ जणांपैकी ५ जणांना बाहेर काढण्यात यश आले. घटनास्थळी पोलीस, महसूल व ग्रामीण विकास विभागाची यंत्रणा उपस्थित असून सदर प्रशासकीय यंत्रणा व स्थानिक शोध व बचाव पथकामार्फत बेपत्ता पर्यटकांचा शोध सुरू आहे. तरी कृपया नागरिकांनी कोणत्याही अफवावर विश्वास ठेवू नये असे आवाहनही प्रशासनातर्फे करण्यात आले आहे.






