दसरा - दिवाळी अन् रेल्वेचे वेटिंग तिकीट

गणेशोत्सवाची धामधूम संपताच मुंबईकरांचे लक्ष आता दसरा आणि दिवाळीच्या सणांकडे वळले आहे. देशभरात हे दोन्ही सण मोठ्या उत्साहाने साजरे केले जातात. यंदा दिवाळी २२ ऑक्टोबरला आहे. मात्र अजून बराच वेळ असतानाच रेल्वे प्रवासासाठीचे आरक्षण पूर्णपणे भरले आहे. काही मिनिटांतच बहुतांश गाड्यांमध्ये तिकीट बुकिंग संपले असून प्रवाशांना 'वेटिंग' किंवा 'फुल्ल' असा संदेश दिसू लागला आहे.


दक्षिण मध्य रेल्वे अंतर्गत असलेल्या नांदेड डिव्हिजनमध्ये नेहमीच मराठवाड्यावर अन्याय होत आला आहे. नांदेड डिव्हिजनचा कारभार तेलंगणाची राजधानी असलेल्या सिकंदराबाद येथील महाव्यवस्थापकाकडूनच होतो. त्यामुळे मराठवाड्यातील रेल्वेविषयक प्रश्न लवकर सुटत नाही व गरजा वेळेवर पूर्ण होत नाही. दरवर्षी दिवाळीच्या पार्श्वभूमीवर विशेष रेल्वे सुरू करत असताना ज्या ठिकाणी मागणी नाही अशा ठिकाणी म्हणजेच बिहारसाठी व तेलंगणातील अनेक जिल्ह्यांसाठी नांदेड डिव्हिजनवरून रेल्वे सोडण्यात येतात. ज्याचा फायदा मराठवाड्यातील जनतेला होत नाही.


दसरा व दिवाळी सणाच्या पार्श्वभूमीवर मराठवाड्यातील कोणत्याही शहरासाठी रेल्वेचे तिकीट सध्या उपलब्ध नाही. सर्वत्र वेटिंग लिस्ट दाखवत आहे. यामुळे अनेक विद्यार्थी व पालक दसरा व दिवाळीत घरी कधी पोहोचणार व कसे पोहोचणार या विवंचनेत आहेत. त्यामुळे दिवाळीसाठी मराठवाड्यातून पुणे व मुंबईला ये-जा करण्यासाठी काही दिवसांसाठी नियमित विशेष रेल्वे सुरू करणे अत्यंत गरजेचे आहे. मराठवाड्यात पायलीला पन्नास नेते आहेत; परंतु या दरम्यान मराठवाड्यात महत्त्वाच्या शहराला जोडणारी विशेष रेल्वे किमान सणासुदीच्या काळात सुरू व्हावी, यासाठी प्रयत्नशील नाही. मराठवाड्यातील प्रवाशांची होत असलेली गैरसोय लक्षात घेऊन एकाही खासदाराने रेल्वे बोर्डाकडे पुणे व मुंबईसाठी दिवाळी स्पेशल रेल्वे सुरू करण्याबाबत मागणी केलेली नाही. मराठवाड्यात असलेल्या खासदारांची संख्या लक्षात घेता त्यांच्या पाठपुराव्यानंतर दसरा व दिवाळी काळात विशेष रेल्वे सेवा सुरू होणे अत्यंत आवश्यक आहे. यासाठी नेत्यांवर सर्वसामान्यांचा दबाव आवश्यक आहे. किमान भाजपच्या खासदारांनी मराठवाड्यातील जनतेला दिवाळीत आवश्यक असलेल्या ठिकाणी म्हणजेच किमान मुंबई, पुण्यासाठी विशेष रेल्वे नियमित सुरू करून द्यावी, अशी मागणी मराठवाड्यातून जोर धरत आहे.


दसरा व दिवाळी हे हिंदू संस्कृतीमधील सर्वात मोठे सण आहेत. या सणासाठी प्रत्येकजण घरात उपस्थित राहून सण साजरा करण्याचा प्रयत्न करतात. देश-विदेशात, परराज्यात, परगावी असणारे प्रत्येकजण आपापल्या घरी, आपापल्या गावी येण्यासाठी धडपड करत असतात; परंतु दळणवळणाचे प्रमुख साधन असलेले रेल्वे, बससेवा दसरा-दिवाळी काळात गर्दीने खचाखच भरलेले असतात. या काळात रेल्वे व बसमध्ये जागा मिळविणे अशक्य असते. या दरम्यान रेल्वे व बसमध्ये प्रवास करण्यासाठी जागाच शिल्लक नसतात. सर्व तिकिटे अगोदरच बुक झालेली असल्याने अनेकजण तिकिटासाठीच चिंतेत असतात. मराठवाड्यातील अनेक विद्यार्थी, पालक शिक्षण व नौकरीनिमित्त पुणे, मुंबई, दिल्ली, बंगळूरु यांसारख्या मोठ्या शहरात वास्तव्याला आहेत. याबरोबरच अनेक विद्यार्थी राज्याच्या बाहेर दिल्ली, आग्रा, मथुरा, सोनीपत, पानीपतपर्यंत शिक्षणासाठी बाहेरगावी असतात. त्यांना मराठवाड्यात आपल्या गावी दिवाळी व दसरा या सणासाठी परत येण्याची खूप इच्छा आहे. पण तिकिटाअभावी त्यांना आपल्या घरी येण्याची सोयच राहिलेली नाही.


रेल्वेचे सर्व तिकीट अगोदरच बुक झालेले असल्याने अशा हजारो प्रवाशांसाठी अतिरिक्त रेल्वे सोडणे अत्यंत गरजेचे आहे. यासाठी मराठवाड्यातील खासदारांनी केंद्रावर दबाव आणून किमान दसरा व दिवाळी काळात पुणे, मुंबई, दिल्ली, बंगरुळू, हैदराबाद या मार्गावर अतिरिक्त रेल्वे सुरू कराव्यात. या सर्व रेल्वे दिवाळी काळात दररोज सुरू राहणे आवश्यक आहे. दक्षिण मध्य रेल्वेकडे जास्त कोचेस नसले तरी कमी कोचेस लावून दिवाळी काळात नियमित विशेष रेल्वे सुरू करता यावी यादृष्टीने रेल्वे बोर्डावर दबाव टाकणारे नेते आवश्यक आहेत. बाहेर गावात अनेकजण मराठी भाषिक आहेत. त्यांना दसरा व दिवाळीनिमित्त आपापल्या गावी, घरी यायचे आहे. त्यांच्यासाठी रेल्वे बोर्डाने अतिरिक्त व विशेष रेल्वे सुरू करणे आवश्यक आहे, ही बाब सर्वसामान्य प्रवाशाला कळू शकते तर मग रेल्वे प्रशासन याबाबत झोपेचे सोंग का घेते? असाही प्रश्न अनेक प्रवाशांना पडतो. आजघडीला कोणत्याही रेल्वेत दसरा व दिवाळीचे तिकीट मिळू शकत नाही. ही अडचण लक्षात घेऊन अशा सर्वांसाठी अतिरिक्त रेल्वेची नितांत गरज आहे.


रेल्वे बोर्ड अनेकदा दसरा व दिवाळीची गरज लक्षात घेऊन विशेष रेल्वे सोडत असते; परंतु ज्या ठिकाणी खरी गरज आहे, त्याठिकाणी रेल्वेसेवा दिली जात नाही. यापूर्वी अनेकदा बिहार राज्यात तसेच तेलंगणातील नको असलेल्या जिल्ह्यात दिवाळी काळात विशेष रेल्वे सोडण्यात आलेल्या आहेत, असा नांदेड डिव्हिजनचा अनुभव आहे. त्यामुळे नादेड डिव्हिजन अंतर्गत आवश्यक असलेल्या पुणे, मुंबई, बंगरुळू-दिल्ली या गावांसाठी तरी विशेष रेल्वे देणे आवश्यक आहे. या काळात खासगी वाहने, ट्रॅव्हल्स चालक चारपट, पाचपट भाडे आकारून जनतेची लूट करतात. या प्रकारात शासनाचे जवळपास संबंधित सर्व विभागाचे अधिकारी हात ओले करून घेतात, असा आरोप नेहमीच होतो. सध्याला मराठवाड्यात ट्रॅव्हल्स चालकांकडून दसऱ्याचीच बेसुमार लूट सुरू आहे. आजघडीला दसऱ्याचे सर्व तिकीट ट्रॅव्हल्सवाल्यांनी वाढवून ठेवले आहे. त्यांच्यावर आरटीओ विभागाचा अंकुश राहिलेला नाही. दिवाळी काळात तर ट्रॅव्हल्सच्या तिकिटांना सोन्याचा भाव येतो.


ट्रॅव्हल्सचालक ऐन दिवाळीत प्रवाशांकडून मनमानी पद्धतीने तिकिटाचे दर वसूल करतात. या दरम्यान प्रवासी वर्गाकडून जादा दराने वसुली करू नये, असे शासनाचे आदेश असतात. ते आदेश केवळ कागदावरच असतात. त्या आदेशाला एक जबाबदारी म्हणून पालन केल्यास लाखो प्रवाशांचे कल्याण होईल; परंतु अधिकारी अशा संधीची वाटच पाहत असतात. ते स्वतःचेच सोने करून घेतात, असा सर्वसामान्यांचा आरोप असतो. दक्षिण मध्य रेल्वेच्या नांदेड डिव्हिजनने मराठवाड्यातील प्रवाशांची मागणी लक्षात घेऊन गरज असलेल्या ठिकाणी दसरा व दिवाळी काळात अतिरिक्त रेल्वेसेवा पुरवावी. मराठवाड्यातील नागरिकांना आनंदाने सण साजरे करू द्यावेत. यासाठी मराठवाड्यातील खासदारांनी विशेष लक्ष देणे गरजेचे आहे.


आपल्या मराठवाड्यातील नागरिकांची गरज लक्षात घेऊन दक्षिण मध्य रेल्वेच्या अधिकाऱ्यांनी देखील यासाठी सहकार्य करणे गरजेचे आहे. मराठवाड्यातील सर्व नागरिकांनी आपापल्या भागातील खासदारांकडे दसरा व दिवाळी काळात अतिरिक्त रेल्वे सोडण्यासाठी आग्रह धरावा, यासाठी हीच वेळ योग्य असून आतापासून यासाठी पाठपुरावा करणे गरजेचे आहे. नागरिकांनी देखील याबाबत मागणी व पत्रव्यवहार यासाठी खासदारांकडे पाठपुरावा करण्याची गरज आहे. केंद्रात असलेले रेल्वे बोर्ड मराठवाड्याकडे लक्ष देण्याच्या दृष्टीने खासदारांनी लक्ष केंद्रित करणे आवश्यक आहे. दसरा व दिवाळीची गरज लक्षात घेऊन किमान ४-५ अतिरिक्त रेल्वे दररोज प्रमुख शहरांसाठी सोडणे आवश्यक आहे. मुंबई, पुणे, दिल्ली, बंगरुळू या शहरासांठी तरी सोयीच्या वेळेत अतिरिक्त रेल्वे आवश्यक आहे. किमान या मागण्यांसाठी तरी मराठवाड्यातील नागरिकांवर आंदोलनाची वेळ येऊ नये, अशी सोय रेल्वे बोर्डाने करावी, अशी अपेक्षा मराठवाड्यातून व्यक्त केली जात आहे.


- डॉ. अभयकुमार दांडगे

Comments
Add Comment

"ऑक्सफर्ड ऑफ द इस्ट"ला खड्ड्यांचे ग्रहण

पुणे महाराष्ट्राची सांस्कृतिक आणि शैक्षणिक राजधानी हब म्हणून ओळखली जाते. यामध्ये ‘ऑक्सफर्ड ऑफ द इस्ट' समजल्या

अवकाळीने मोडले दक्षिण महाराष्ट्राचे कंबरडे

महाराष्ट्रातील दक्षिण भाग, विशेषतः सांगली, सातारा आणि कोल्हापूर या जिल्ह्यांत सप्टेंबरच्या शेवटच्या आठवड्यात

कोकणातील शेतकऱ्यांची नवी उभारी

राज्यात शेतकऱ्यांची जी शेतीची विदारक चित्र माध्यमांवर येतात तशी स्थिती कोकणातही अनेकवेळा आली आहे. येत आहे. अगदी

अजित पवारांची विदर्भात पक्षबांधणी?

शरद पवारांची खरी ताकद ही पश्चिम महाराष्ट्रातील काही जिल्ह्यांमध्येच राहिलेली आहे. उर्वरित महाराष्ट्रात कुठे

विदर्भ-मराठवाडा जोडणारा रेल्वे प्रकल्प संथ गतीने

मराठवाडा-कर्नाटक जोडणारा नांदेड-देगलूर-बिदर रेल्वे प्रकल्प यापूर्वीच मंजूर झाला आहे. या रेल्वे मार्गासाठी

'व्होट बँक'साठी इच्छुकांचे फंडे

महापालिका निवडणुकीसाठी प्रारूप प्रभाग रचना जाहीर होऊन त्यावर हरकती-सूचनांची सुनावणी झाली आहे. त्यामुळे सर्व