
अहमदाबाद: भारत आणि वेस्ट इंडिज यांच्यातील पहिल्या कसोटी सामन्यात टीम इंडियाचा युवा यष्टिरक्षक-फलंदाज ध्रुव जुरेल याने आपल्या कसोटी कारकिर्दीतील पहिले शानदार शतक झळकावले. अहमदाबाद येथील नरेंद्र मोदी स्टेडियमवर सुरू असलेल्या या सामन्याच्या दुसऱ्या दिवशी (३ ऑक्टोबर २०२५), जुरेलने अत्यंत संयमी आणि महत्त्वपूर्ण खेळी करत १९० चेंडूंमध्ये आपला पहिला कसोटी शतक पूर्ण केला. त्याच्या या खेळीत १२ चौकार आणि २ षटकारांचा समावेश होता.
त्याने शतक पूर्ण केल्यानंतर केलेले खास 'गन सॅल्यूट' सेलिब्रेशन सध्या चर्चेत आहे. जुरेलने हे सेलिब्रेशन भारतीय सैन्यामध्ये हवालदार म्हणून कारगिल युद्धात सहभागी झालेल्या आपल्या वडिलांना समर्पित केले आहे.
The moment of Dhruv Jurel’s century, when he dedicated it to his father.🫡🇮🇳 #INDvWI Well played bro @dhruvjurel21 ⭐️ pic.twitter.com/wg6jHi4QeL
— 𝐑𝐮𝐬𝐡𝐢𝐢𝐢⁴⁵ (@rushiii_12) October 3, 2025
महत्त्वाच्या भागीदारी आणि विक्रमी कामगिरी
जुरेलने कठीण परिस्थितीत रवींद्र जडेजासोबत पाचव्या विकेटसाठी २०६ धावांची द्विशतकी भागीदारी करून टीम इंडियाचा डाव सावरला. या सामन्यात केएल राहुल आणि रवींद्र जडेजाने देखील शतकी खेळी केली. एकाच कसोटीच्या पहिल्या डावात भारताच्या तीन फलंदाजांनी शतके झळकावण्याची ही दुसरीच वेळ आहे. जुरेल कसोटी क्रिकेटमध्ये शतक झळकावणारा भारताचा १२ वा यष्टिरक्षक-फलंदाज ठरला आहे. त्याने वेस्ट इंडिजविरुद्ध आपले पहिले कसोटी शतक झळकावणारा पाचवा भारतीय यष्टिरक्षक-फलंदाज होण्याचा विक्रमही केला. ध्रुव जुरेल २१० चेंडूत १५ चौकार आणि ३ षटकारांसह १२५ धावा करून बाद झाला.
केएल राहुल, ध्रुव जुरेल आणि रवींद्र जडेजा यांच्या शतकांच्या बळावर भारताने दुसऱ्या दिवसाखेर ५ बाद ४४८ धावा करत वेस्ट इंडिजवर २८६ धावांची मजबूत आघाडी घेतली आहे. पहिल्या डावात वेस्ट इंडिजचा संघ १६२ धावांत गारद झाला होता.