Saturday, October 25, 2025
Happy Diwali

अशोक हांडे यांनी महापालिका शाळेतील ती व्यक्त केली खंत...म्हणाले ,तर मोठा कलाकार झालो असतो!

अशोक हांडे यांनी महापालिका शाळेतील ती व्यक्त केली खंत...म्हणाले ,तर मोठा कलाकार झालो असतो!

मुंबई (खास प्रतिनिधी) : मुंबई महानगरपालिकेच्या संगीत व कला अकादमीचे शिक्षक हे खूप प्रतिभावान आहेत. शैक्षणिक जबाबदारी सांभाळत शिक्षकांनी सादर केलेला कलाविष्कार कौतुकास्पद आहे. मी स्वत: बृहन्मुंबई महानगरपालिकेच्या शाळेचा विद्यार्थी आहे. माझे शिक्षण पूर्ण झाल्यानंतर महानगरपालिकेत संगीत व कला अकादमी स्थापन झाली. अन्यथा, मी सुद्धा या अकादमीच्या छत्रछायेखाली घडलो असतो आणि नक्कीच मोठा कलाकार झालो असतो, असे भावपूर्ण उद्गार चौरंग संस्थेचे संचालक तथा जेष्ठ रंगकर्मी अशोक हांडे यांनी काढले.

मुंबई महानगरपालिकेच्या शिक्षण विभाग अंतर्गत, संगीत व कला अकादमीच्या संगीत विभागातर्फे दरवर्षीप्रमाणे यावर्षीही जागतिक संगीत दिनाच्या निमित्ताने ‘संगीत सप्ताह’चे आयोजन करण्यात आले. या सप्ताहाचा समारोप शुक्रवारी ३ ऑक्टोबर २०२५ रोजी झाला. यावेळी हांडे यांनी हे उद्गार काढले.

समारोपप्रसंगी, उपशिक्षणाधिकारी ममता राव, कला विभागाच्या अधीक्षक छाया साळवे, कला विभागाचे प्राचार्य दिनकर पवार, कार्यानुभव निदेशक तृप्ती पेडणेकर, संगीत विभागाच्या प्राचार्य शिवांगी दामले आदी मान्यवरांसह शिक्षक आणि कलारसिक उपस्थित होते. संगीत शिक्षकांच्यावतीने शुभदा दादरकर यांचे मार्गदर्शन लाभलेला ‘प्रेमरंग’ हा नाट्यसंगीतावर आधारित सुमधूर यावेळी कार्यक्रम सादर करण्यात आला.

ज्येष्ठ रंगकर्मी अशोक हांडे म्हणाले, घर संसार सांभाळून विद्यार्थ्यांना शिक्षण देणे ही तारेवरची कसरत असते. मात्र संगीत कला महाविद्यालयाच्या शिक्षकांनी दोन गोष्टींमध्ये प्रावीण्य मिळवले आहे. संगीत शिक्षक ज्याप्रकारे आपली कला जोपासत आहेत, ते खरंच कौतुकास्पद आहे, असेही हांडे म्हणाले.

Comments
Add Comment