
नागपूर : राष्ट्रीय स्वयंसेवक संघाला १०० वर्षे पूर्ण झाली. या निमित्ताने यंदा नागपूरमध्ये भव्य विजयादशमी उत्सवाचे आयोजन करण्यात आले आहे. नागपूरच्या ऐतिहासिक रेशीमबाग मैदानावर राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचा विजयादशमी उत्सव आहे. या उत्सवाला यंदा विशेष अतिथी म्हणून माजी राष्ट्रपती रामनाथ कोविंद उपस्थित आहे. मंचावर माजी राष्ट्रपती कोविंद, सरसंघचालक डॉ. मोहन भागवत, केंद्रीय मंत्री नितीन गडकरी, राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि संघातील इतर मान्यवर आहेत. विशेष म्हणजे गडकरी आणि मुख्यमंत्री फडणवीस हे दोघे मूळचे संघाचे स्वयंसेवक असल्यामुळे विजयादशमी उत्सवासाठी संघाच्या गणवेशात मंचावर उपस्थित आहेत.
धर्माचे रक्षण आणि वाईटावर चांगल्याचा विजय याचे प्रतिक म्हणून दरवर्षी विजयादशमीला सरसंघचालकांनी शस्त्रपूजा करण्याची परंपरा संघात आहे. या परंपरेनुसार विजयादशमी उत्सवाची सुरुवात शस्त्रपूजा आणि संघाच्या शिस्तबद्ध संचलनाने झाली. सकाळी ७:३० वाजता कार्यक्रम सुरू झाला. सरसंघचालकांनी शस्त्रपूजा केली. योग प्रात्यक्षिके, नियुध्द, घोष आणि प्रदक्षिणा असे सांस्कृतिक कार्यक्रम झाले. यंदाच्या विजयादशमी उत्सवासाठी २१ हजारांपेक्षा जास्त संघ स्वयंसेवक संचलनात सहभागी झाले. यानंतर मान्यवरांची भाषणं झाली. माजी राष्ट्रपती रामनाथ कोविंद यांच्यानंतर सरसंघचालकांनी उपस्थितांना मार्गदर्शन केले.
माजी राष्ट्रपतींनी त्यांच्या आयुष्यावर दोन डॉक्टरांचा मोठा प्रभाव असल्याचे सांगितले. भारतीय घटनेचे शिल्पकार भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर आणि पहिले सरसंघचालक डॉ. केशव बळीराम हेडगेवार हे ते दोन डॉक्टर आहेत, असे माजी राष्ट्रपती रामनाथ कोविंद म्हणाले. त्यांनी संघाच्या शिस्तबद्ध कार्याचे कौतुक केले. राष्ट्रीय स्वयंसेवक संघाने देशसेवेत मोठे योगदान दिल्याचे माजी राष्ट्रपती रामनाथ कोविंद म्हणाले. राष्ट्र उभारणीत संघाने मोलाची भूमिका बजावली असल्याचे माजी राष्ट्रपती रामनाथ कोविंद यांनी सांगितले.
संघाचे शताब्दी वर्ष
संघाची स्थापना १९२५ मध्ये केशव बळीराम हेडगेवार यांनी केली. या राष्ट्रीय स्वयंसेवक संघाने शताब्दी वर्षाचे औचित्य साधून देशभरात एक लाखांपेक्षा जास्त हिंदू संमेलनांचे आयोजन केले आहे.