Thursday, October 2, 2025

'जातीपातीचे राक्षस' संपवा! दसरा मेळाव्यात पंकजा मुंडेंचं आक्रमक आणि भावनिक आवाहन

'जातीपातीचे राक्षस' संपवा! दसरा मेळाव्यात पंकजा मुंडेंचं आक्रमक आणि भावनिक आवाहन

'मी गोपीनाथ मुंडेंची बेटी आहे,' म्हणत पंकजा मुंडेंनी जागवल्या आठवणी

जातीय राजकारणावर केला प्रहार

बीड: गेल्या ११ वर्षांपासून आयोजित होणाऱ्या पंकजा मुंडेंच्या दसरा मेळाव्याकडे संपूर्ण महाराष्ट्राचे लक्ष लागलेले असते. यंदा बीड जिल्ह्यातील सावरगाव येथे पंकजा मुंडेंनी आपल्या समर्थकांना उद्देशून एक आक्रमक पण भावनिक भाषण दिले. विशेष म्हणजे, यंदाच्या दसरा मेळाव्याच्या व्यासपीठावर त्यांचे बंधू आणि माजी मंत्री धनंजय मुंडे यांनीही हजेरी लावत, शायरीच्या माध्यमातून टोलेबाजी केली.

वडिलांची आठवण आणि शायरी

भाषणाची सुरुवात करताना पंकजा मुंडे यांनी दिवंगत गोपीनाथ मुंडेंच्या आठवणींना उजाळा दिला. त्या म्हणाल्या, "मी लहानपणापासून वडिलांसोबत दसरा मेळाव्यासाठी भगवान गडावर येत होते." त्यानंतर त्यांनी पूरग्रस्त शेतकऱ्यांना उद्देशून एक भावनिक शायरी सादर केली:

"जब देखती हूँ भुके बच्चे,

फटे हुए कपडों मे माँ,

गरिबी मे तडपता परिवार

मै खून के आँसू रोती हूँ,

मै गोपीनाथ मुंडे की बेटी हूँ..."

जातीयवादाच्या 'रक्तबीज राक्षसा'वर हल्लाबोल

पंकजा मुंडे यांनी यावेळी जातीय राजकारणावर थेट प्रहार केला. "आपण नवरात्रीत नऊ दिवस देवीची पूजा केली. त्या देवीने महिषासुर आणि रक्तबिजासारखे राक्षस संपवले. आजच्या कलियुगात रक्तबिजासारखा एक नवा राक्षस जन्माला आला आहे, आणि तो तुमच्या बुद्धीत जन्माला आला आहे."

त्या पुढे म्हणाल्या, "आता तुमच्या बुद्धीतून, तोंडातून आणि विचारातून अनेक जातीवादाचे राक्षस आणि धर्मावादाचे राक्षस उभे राहत आहेत. त्यामुळे, दुर्गेची पूजा करताना, आम्हाला रक्तबिजासारखे हे राक्षस संपविण्याची शक्ती दे, हीच माझी मागणी आहे." भविष्यात जातींना एकत्र गुंफण्याचे काम आपल्या हातून झाले पाहिजे, अशी इच्छा त्यांनी व्यक्त केली.

भगवान बाबांचे भव्य स्मारक

पंकजा यांनी सावरगाव येथे केलेल्या विकासकामांची आठवण करून दिली. "जे सावरगाव लोकांच्या ओळखीतही नव्हते, तिथे भगवान बाबांची भव्य मूर्ती मी उभी केली. मी एकटीने हे केलेले नाही, तर माझ्या कार्यकर्त्यांनी हे केले आहे. या कामासाठी कुणाचा रुपया घेतला नाही, कुणाची टक्केवारी घेतली नाही. हे स्मारक सरकारी कामातून नव्हे, तर ऊस तोडणाऱ्यांच्या घामातून उभे राहिले आहे."

याचदरम्यान, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी श्री क्षेत्र भगवानगड ट्रस्टच्या मागणीनुसार वनविभागाची ४ हेक्टर जागा भक्तगणाच्या सुविधांसाठी, रुग्णालय आणि प्रशिक्षण केंद्रासाठी देण्याची अधिसूचना काढल्याबद्दल पंकजा मुंडे यांनी त्यांचे आभार मानले. "देवेंद्र फडणवीस यांचे भगवान बाबांवर आणि मुंडे साहेबांवर असलेले प्रेम पाहून मन सद्गदित झाले आहे. तुम्ही केलेले काम सदैव स्मरणात राहील," असे ट्विट त्यांनी केले.

Comments
Add Comment