Thursday, October 2, 2025

पाकिस्तानला संरक्षणमंत्र्यांचा निर्वाणीचा इशारा, कराचीचा रस्ता इथूनच जातो म्हणाले राजनाथ सिंह

पाकिस्तानला संरक्षणमंत्र्यांचा निर्वाणीचा इशारा, कराचीचा रस्ता इथूनच जातो म्हणाले राजनाथ सिंह

भुज : भारताच्या हद्दीत सर क्रीक खाडीचा प्रदेश येतो. या खाडीजवळ बांधकाम करत असलेल्या पाकिस्तानला संरक्षणमंत्री राजनाथ सिंह यांनी निर्वाणीचा इशारा दिला. पाकिस्तानने कोणतेही धाडस करण्याचा विचार करू नये. सर क्रीक खाडी परिसरात भारताच्या हद्दीत घुसखोरीचा प्रयत्न केला तर भारत भूगोल बदलून टाकेल. कराचीचा रस्ता सर क्रीकमधूनच जातो एवढे लक्षात ठेवा, या शब्दात संरक्षणमंत्री राजनाथ सिंह यांनी पाकिस्तानला ठणकावले.

गुजरातमधील भुज येथील लष्करी तळावर सैनिकांना संबोधित करताना राजनाथ सिंह यांनी पाकिस्तानला सुनावले. याआधी राजनाथ सिंह यांच्या हस्ते भुज येथील लष्करी तळावर शस्त्रपूजा करण्यात आली. यानंतर संरक्षणमंत्री राजनाथ सिंह यांनी उपस्थितांना संबोधित केले. स्वातंत्र्याच्या ७८ वर्षांनंतरही भारताने सर क्रीक क्षेत्रातील सीमावाद चर्चेद्वारे सोडवण्याचे वारंवार प्रयत्न केले आहेत, पण पाकिस्तानचे हेतू अद्याप अस्पष्ट आहेत, असे संरक्षणमंत्री राजनाथ सिंह म्हणाले.

भाषणात संरक्षणमंत्री राजनाथ सिंह यांनी ऑपरेशन सिंदूरचा उल्लेख करुन सैन्याचे कौतुक केले. ऑपरेशन सिंदूर दरम्यान पाकिस्तानने लेह ते सर क्रीक क्षेत्रापर्यंत भारताची संरक्षण यंत्रणा भेदण्याचा आटोकाट प्रयत्न केला. पण पाकिस्तानला यश मिळाले नाही. भारताने चोख प्रत्युत्तर दिले. या कामगिरीचा उल्लेख करुन संरक्षणमंत्री राजनाथ सिंह यांनी सैन्याने सर्व लष्करी उद्दिष्टे साध्य केल्याचे अभिमानाने सांगितले. दहशतवादाविरूद्धची लढाई सुरू आहे असेही ते म्हणाले.

सर क्रीक म्हणजे काय आणि त्याचे महत्त्व काय आहे ?

सर क्रीक खाडीचा परिसर हा गुजरातमधील कच्छ आणि पाकिस्तानमधील सिंध प्रांत यांच्यामध्ये स्थित ९६ किलोमीटर लांबीचा भाग आहे. या भागातून नदीचे पाणी वाहत पुढे अरबी समुद्राला मिळते. हा परिसर दलदलीचा आहे. या भागात भरती-ओहोटीनुसार पाण्याच्या पातळीत सतत बदल होतात. भारत आणि पाकिस्तान यांच्यात सर क्रीक खाडीवरुन सीमावाद सुरू आहे.

लष्करीदृष्ट्या सर क्रीक खाडी महत्त्वाची आहे. या खाडीतून छोट्या आणि मध्यम आकाराच्या वेगवान बोटींच्या मदतीने थेट कराची बंदरापर्यंत पोहोचणे शक्य आहे. शिवाय अरबी समुद्रातील पाकिस्तानच्या हालचालींवर लक्ष ठेवण्यासाठी हा भाग सोयीचा आहे. यामुळेच भारत आणि पाकिस्तान यांच्यात सर क्रीक खाडीवरुन सुरू असलेला वाद अद्याप शमलेला नाही.

सर क्रीक परिसरात मासे आणि संभाव्य तेल आणि वायूचे साठे यांसारखे सागरी संसाधने असू शकतात. सागरी आर्थिक क्षेत्र (EEZ) निश्चित करण्यासाठी देखील हा प्रदेश महत्त्वाचा आहे, जो मासेमारी, खाणकाम आदींसाठी महत्त्वाचा आहे. भारत आणि पाकिस्तानमध्ये सर क्रीक सीमेवरून वाद आहे. भारताचा असा दावा आहे की सीमा खाडीच्या मध्यभागी असावी, तर पाकिस्तानचा दावा आहे की सीमा अधिक भारतीय बाजूने असावी. हा वाद १९६५ च्या भारत-पाक युद्धापासून सुरू आहे. भारत चर्चेतून हा वाद सोडवण्यास तयार आहे पण पाकिस्तान वारंवार चिथावणीखोर कृती करुन तणाव निर्माण करत आहे.

Comments
Add Comment
प्रहार ई-पेपर
हे पण पहा
संबंधित बातम्या आणखी वाचा >