
मुंबई : दसरा, म्हणजेच विजयादशमी, हा भारतीय संस्कृतीत विजय, समृद्धी आणि सौख्याचे प्रतीक मानला जातो. शारदीय नवरात्रोत्सव संपल्यानंतर येणाऱ्या या सणाला खास धार्मिक महत्त्व आहे. या दिवशी एक खास प्रथा पाहायला मिळते, लोक एकमेकांना आपट्याची पाने ‘सोनं’ म्हणून देतात. ही प्रथा केवळ धार्मिक नाही, तर तिच्यामागे इतिहास, श्रद्धा आणि संस्कृतीची एक गुंफण आहे.पंचांगानुसार यंदा दसरा गुरुवार, २ ऑक्टोबर रोजी साजरा होणार असून, शस्त्रपूजेचा मुहूर्त दुपारी २.०९ ते २.५६ या वेळेत असेल.
दसऱ्याच्या दिवशी आपट्याची पाने ‘सोनं’ म्हणून देण्यामागे एक सुंदर कल्पना आहे. खरे सोनं म्हणजे केवळ दागिने नाहीत, तर आपले नाते, स्नेह, विश्वास आणि आपुलकी ही खरी संपत्ती आहे. आपट्याची पाने ही त्या अमूल्य नात्यांची खूण मानून ती एकमेकांना देण्याची परंपरा आजही जपली जाते.
पुराणकथा आणि ऐतिहासिक संदर्भ
दसऱ्याच्या दिवशी लोक एकमेकांना आपट्याची पाने देतात, कारण त्यामागे एक पौराणिक कथा आहे. रघुकुलातील श्रीराम चंद्रांच्या पूर्वजांनी खूप संपत्ती कमावली होती, पण ती त्यांनी दान केली आणि त्यानंतर त्यांनी वानप्रस्थाश्रम स्वीकारला. त्यांच्या आश्रमात एकदा त्यांचे कुलगुरू कौत्स मूनी आले. त्यांनी त्या राजांकडे १४ कोटी सुवर्ण मुद्रा दान म्हणून मागितली होती. पण ते राजे जेव्हा वानप्रस्थाश्रमाला निघाले तेव्हा त्यांच्याकडे कुठतेही धन नव्हते. तरीही गुरुंची ईच्छा पूर्ण करण्यासाठी त्यांनी इंद्रदेवांना युद्धाचे आव्हान दिले. पण त्या युद्धात इंद्रदेवांचा पराभव झाला. त्यानंतर त्या राजांनी मला तुमचं राज्य नको, १४ कोटी सुवर्ण मुद्रा हव्या आहेत, अशी मागणी इंद्रदेवांकडे केली. तेव्हा इंद्रदेवांनी सांगितले पृथ्वीवरील आपट्याच्या झाडाच्या पानांत आम्ही सुवर्ण मुद्रा सोडतो. त्या तुम्ही वेचून घ्या. इंद्रदेवांनी आपट्याच्या पानांच्या रूपाने सोन्याचा वर्षाव केला. त्यामुळे आपट्याचे पान आपण विजयादशमीला सोने म्हणून लुटले जाते. आपट्याच्या पानांना सोन्याचे प्रतीक मानले जाते.तेव्हापासून दसऱ्याच्या दिवशी आपट्याची पाने एकमेकांना देवून, 'सोनं घ्या आणि सोन्यासारखे राहा' असे शुभेच्छांमध्ये म्हटले जाते.
शस्त्रपूजेचे महत्त्व
महाभारत काळात पांडवांना वनवासात १ वर्ष अज्ञातवासात रहावे लागले. अज्ञातवासात असताना पांडवांनी आपली शस्त्रे शमी वृक्षाखाली लपवून ठेवली होती.जेव्हा पांडवांनी शस्त्रे परत मिळवली, तेव्हा त्यांनी प्रथम दसऱ्याच्या दिवशी शमी वृक्षाची पूजा केली. त्यानंतरच शस्त्रे वापरली. या घटनेमुळे शमी वृक्षाची पूजा करण्याची परंपरा सुरू झाली.
यामुळेच दस-याच्या दिवशी लोक आपली शस्त्र, उपकरणे, वाद्ये आणि रोजच्या कामाच्या साधनांची पूजा करतात. याला आयुध पूजा असेही म्हणतात. शस्त्रांचे पूजन म्हणजे केवळ परंपरा नव्हे, तर स्वसंरक्षणासाठी आणि विजयासाठी मदत करणाऱ्या साधनांचा सन्मान करण्याची प्रक्रिया आहे.
विद्यार्थी त्यांच्या पुस्तकांची, व्यापारी त्यांच्या खातेवहींची, कलाकार वाद्यांची आणि सैनिक त्यांच्या शस्त्रांची पूजा करतात. या पूजेने देवीचा आशिर्वाद लाभतो आणि कार्यात यश प्राप्त होते, असा विश्वास आहे.
समाजातील ऐक्याचा संदेश
आपट्याची पाने वाटताना आपण केवळ परंपरा पाळत नाही, तर नातेसंबंध दृढ करतो. ही परंपरा आपल्याला सांगते की, खरी समृद्धी ही केवळ भौतिक गोष्टींत नसून, आपल्या आजूबाजूच्या माणसांमध्ये असते. आपट्याच्या पानांच्या माध्यमातून आपण प्रेम, स्नेह आणि ऐक्याचे ‘सोनं’ वाटत असतो.