
वेलची हा स्वयंपाकघरातला सर्वात छोटा मसाला, छोटा पॅक बडा धमाका या वाक्याला अगदी साजेसा,आणि हाच मसाला तुम्हाला निरोगी ठेवू शकतो. बऱ्याच लोकांना दिवसभर थकलेले असून सुद्धा रात्री लवकर झोप येत नाही, गॅस, ऍसिडिटी, तोंडाला वास येणं यासारख्या समस्यांना तोंड द्यावं लागतं पण तुम्हाला माहिती आहे का, याचा उपाय तुमच्या स्वयंपाकघरातच दडलाय.
श्रीखंड, शिरा, वेलची, चहा, बिर्याणी अश्या वेगवेगळ्या पदार्थांमधे आपण वेलचीचा वापर करतो. शक्यतो वेलचीचा वापर आपण पदार्थांमध्ये गोडी निर्माण करण्यासाठी किंवा वेलची घातल्याने पदार्थाला एक वेगळी चव येते म्हणून करतो. पण या छोटया सुगंधी वेलचीचा सुद्धा आपल्या शरीराला काही फायदा होऊ शकतो याचा कित्येक जणांना पत्ताच नसतो.
पचन सुधारते : या धावपळीच्या जगात आपलं वेळेवर खाणपिणं होत नाही, त्यामुळे पचनाच्या समस्यांना तोंड द्यावे लागते, म्हणून रात्रीच्या जेवणानंतर २ वेलची चावल्याने पचनास मदत होते. वेलचीमध्ये काही संयुगे असतात जे पचनाच्या एन्झाइम्सना उत्तेजित करतात आणि पचन सुधारण्यास मदत करतात. त्यामुळे गॅस, आम्लता आणि पोटफुगी सारख्या समस्यांपासून मुक्त होण्यास मदत होते.
तोंडाचा दुर्गंध कमी करण्यास मदत : नीट ब्रश करूनही बहुतेक लोकांच्या तोंडाला वास येतो. त्यामुळे अनेक माऊथवॉश वापरले जातात आणि दुसऱ्याच समस्या निर्माण होतात. अशा वेळी वेलची चघळल्यास वेलचीमध्ये असणाऱ्या अँटीबॅक्टेरिअलमुळे तोंडाची दुर्गंधी त्वरित दूर होते.
झोपेची समस्या : या धावपळीच्या जगात प्रचंड ताणतणाव सगळ्यांना असतो. त्यामुळे झोपही नीट येत नाही. वेलचीत असणारे सेरोटीन हे मूड बूस्टर प्रमाणे काम करते. त्यामुळे तणाव कमी होण्यास मदत होऊन गाढ झोप लागते.
रक्तदाब नियंत्रणात राहतो : उच्च रक्तदाब नियंत्रणासाठी घरगुती पर्याय म्हणून वेलची हा उत्तम पर्याय आहे. वेलची मध्ये पोटॅशिअम आणि मॅग्नेशिअम यांचे प्रमाण भरपूर असत. ज्यामुळे रक्ताभिसरण सुधारून हृदय निरोगी राहते .
वजन कमी होण्यास मदत : वेलचीमध्ये अँटीऑक्सिडंट आणि फायबर मुबलक प्रमाणात असत. ज्यामुळे चरबी कमी होते, तसेच शरीरातील विषारी पदार्थ बाहेर काढण्यासही मदत होते .
डॉक्टरांचा सल्ला : काही लोकांना वेलची खाल्ल्याने मळमळत असेल तर त्यांनी वेलची खाणे टाळावे.