Friday, October 24, 2025
Happy Diwali

PM Modi RSS 100th Year : भारतीय मुद्रेवर 'भारत मातेचे' चित्र; RSS शताब्दीनिमित्त मोदींनी उलगडले विशेष नाणे-तिकिटाचे रहस्य! काय म्हणाले PM मोदी?

PM Modi RSS 100th Year : भारतीय मुद्रेवर 'भारत मातेचे' चित्र; RSS शताब्दीनिमित्त मोदींनी उलगडले विशेष नाणे-तिकिटाचे रहस्य! काय म्हणाले PM मोदी?

नवी दिल्ली : आज, पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी राष्ट्रीय स्वयंसेवक संघाच्या (RSS) स्थापनेच्या १०० व्या वर्धापन दिनाचे औचित्य साधून एक महत्त्वपूर्ण समारंभ आयोजित केला. या समारंभात त्यांनी संघाच्या गौरवशाली शताब्दी वर्षाच्या निमित्ताने विशेष टपाल तिकीट आणि नाणे जारी केले. यावेळी पंतप्रधान मोदी यांनी आरएसएसच्या कार्याचे आणि योगदानाचे मनापासून कौतुक केले. पंतप्रधान मोदींनी आपल्या भाषणात आरएसएसच्या १०० वर्षांच्या प्रवासाचा गौरवपूर्ण उल्लेख केला. ते म्हणाले की, आरएसएसचा हा गौरवशाली प्रवास म्हणजे त्याग, निस्वार्थ सेवा, राष्ट्र उभारणी आणि शिस्तीचे एक असाधारण उदाहरण आहे. स्वयंसेवकांच्या अनेक पिढ्यांना संघाचे शताब्दी वर्ष पाहण्याचे भाग्य लाभले आहे, असे गौरवोद्गार त्यांनी काढले. पंतप्रधान मोदी यांनी स्पष्ट केले की, राष्ट्रीय स्वयंसेवक संघाने आपल्या स्थापनेपासूनच सातत्याने राष्ट्र उभारणीवर लक्ष केंद्रित केले आहे. संघाचे हे कार्य समाजासाठी एक प्रेरणास्रोत राहिले आहे. त्यांनी संघाच्या कार्यात सामील असलेल्या आणि निःस्वार्थपणे सेवा करणाऱ्या सर्व स्वयंसेवकांचे आभार मानले.

१९६३ च्या प्रजासत्ताक दिनाच्या परेडमध्ये स्वयंसेवक

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी संघाच्या योगदानाची आठवण करून देताना म्हंटल की, "१९६३ मध्ये, संघ स्वयंसेवकांनी २६ जानेवारीच्या परेडमध्येही मोठ्या अभिमानाने आणि सन्मानाने सहभाग घेतला होता आणि देशभक्तीच्या तालावर कूच केली होती." पंतप्रधान मोदींच्या मते, हे विशेष टपाल तिकीट हे केवळ संघाचे नव्हे, तर राष्ट्रसेवा करणाऱ्या आणि समाजाला सक्षम करणाऱ्या संघ स्वयंसेवकांच्या समर्पणाचे प्रतिबिंब आहे. त्यांनी या स्मारक नाण्यांसाठी आणि टपाल तिकिटांसाठी सर्व देशवासियांचे मनापासून अभिनंदन केले. यावेळी पंतप्रधान मोदी यांनी भारत सरकारने जारी केलेल्या विशेष नाण्याची माहिती दिली. "आज, भारत सरकारने संघाच्या १०० वर्षांच्या गौरवशाली प्रवासाचे स्मरण करण्यासाठी विशेष टपाल तिकिटे आणि स्मारक नाणी जारी केली आहेत," असे त्यांनी सांगितले. जारी करण्यात आलेले हे विशेष ₹१०० (शंभर रुपयांचे) नाणे आहे. या नाण्यावर एका बाजूला राष्ट्रीय चिन्ह आहे, तर दुसऱ्या बाजूला सिंह आहे, अशी माहिती पंतप्रधान मोदींनी दिली. हे नाणे आणि टपाल तिकीट आरएसएसच्या १०० वर्षांच्या इतिहासाचा आणि योगदानाचा एक महत्त्वाचा ऐतिहासिक दस्तऐवज म्हणून कायम स्मरणात राहतील.

पंतप्रधान मोदींकडून करोडो स्वयंसेवकांचे अभिनंदन

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी स्वयंसेवकांबद्दल कृतज्ञता व्यक्त केली. "संघाच्या शताब्दी वर्षाचा असा महान प्रसंग आपण पाहत आहोत, हे आपल्या पिढीतील स्वयंसेवकांचे भाग्य आहे," असे त्यांनी नमूद केले. या ऐतिहासिक प्रसंगी पंतप्रधान मोदींनी राष्ट्रसेवेसाठी समर्पित असलेल्या करोडो स्वयंसेवकांना शुभेच्छा आणि अभिनंदन दिले. तसेच, त्यांनी संघाचे संस्थापक आणि प्रेरणास्रोत असलेले परमपूज्य डॉ. हेडगेवार यांच्या कार्याचा गौरवपूर्ण उल्लेख करत त्यांच्या चरणी आपली श्रद्धांजली अर्पण केली. डॉ. हेडगेवार यांनी घालून दिलेल्या आदर्श आणि मूल्यांमुळेच संघाचा प्रवास १०० वर्षांचा झाला, असे त्यांनी स्पष्ट केले.

विजयादशमी म्हणजे भारतीय संस्कृतीची 'कालातीत घोषणा'

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी देशवासियांना महानवमी आणि विजयादशमीच्या पवित्र सणांच्या शुभेच्छा दिल्या आहेत. ते म्हणाले, "आज महानवमी आहे आणि हा दिवस देवी सिद्धिदात्रीच्या पूजनाचा आहे. मी सर्व देशवासियांना नवरात्रीच्या हार्दिक शुभेच्छा देतो." न्यायाचा आणि सत्याचा कालातीत विजय आहे. पंतप्रधान मोदींनी यानंतर विजयादशमीच्या महत्त्वावर प्रकाश टाकला. ते म्हणाले, "उद्या विजयादशमीचा महान सण आहे." हा सण भारतीय संस्कृतीतील एका अत्यंत महत्त्वाच्या विचाराची आणि श्रद्धेची कालातीत घोषणा आहे. अन्यायावर न्यायाचा विजय, असत्यावर सत्याचा विजय, अंधारावर प्रकाशाचा विजय हा सण भारतीयांना नेहमी सत्याच्या आणि न्यायाच्या मार्गावर चालण्याची प्रेरणा देतो, असेही पंतप्रधानांनी स्पष्ट केले.

₹१०० च्या नाण्यावर सिंह, स्वयंसेवक आणि भारत माता

राष्ट्रीय स्वयंसेवक संघाच्या १०० वर्षांच्या प्रवासाचा उत्सव साजरा करण्यासाठी सरकारने जारी केलेले विशेष टपाल तिकीट आणि नाणे का खास आहेत, हे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी यावेळी स्पष्ट केले की, जारी करण्यात आलेल्या ₹१०० (शंभर रुपयांच्या) नाण्यावर एका बाजूला राष्ट्रीय चिन्ह (National Emblem) आहे. दुसऱ्या बाजूला सिंह (Lion) आणि त्याच्यासोबत स्वयंसेवक भक्तीने नतमस्तक होत असलेली 'भारत मातेची' (Bharat Mata) प्रतिमा आहे. पंतप्रधानांनी नमूद केले की, स्वतंत्र भारताच्या इतिहासात कदाचित पहिल्यांदाच भारत मातेची प्रतिमा भारतीय चलनावरील नाण्यावर आलेली आहे. हेच या नाण्याचे सर्वात मोठे अद्वितीय वैशिष्ट्य आहे. पंतप्रधान मोदी म्हणाले की, आज जारी केलेले विशेष टपाल तिकीट देखील अत्यंत महत्त्वाचे आहे. त्यांनी २६ जानेवारीच्या प्रजासत्ताक दिनाच्या परेडचे महत्त्व सांगितले आणि एका ऐतिहासिक क्षणाची आठवण करून दिली. ऐतिहासिक संबंध: १९६३ मध्ये, २६ जानेवारी रोजी राष्ट्रीय स्वयंसेवकांनी राष्ट्रीय परेडमध्ये भाग घेतला आणि देशभक्तीच्या सुरांवर मोठ्या अभिमानाने कूच केली होती. हे टपाल तिकीट त्याच ऐतिहासिक क्षणाचे स्मरण करते आणि त्याचसोबत राष्ट्रीय स्वयंसेवकांनी राष्ट्राप्रती दाखवलेल्या समर्पणाचे देखील प्रतिबिंबित करते. या महत्त्वपूर्ण भेटीबद्दल देशवासियांचे अभिनंदन करत मोदींनी संघाच्या योगदानाला सलाम केला.

Comments
Add Comment
प्रहार ई-पेपर
हे पण पहा