Tuesday, September 30, 2025

"ऑक्सफर्ड ऑफ द इस्ट"ला खड्ड्यांचे ग्रहण

पुणे महाराष्ट्राची सांस्कृतिक आणि शैक्षणिक राजधानी हब म्हणून ओळखली जाते. यामध्ये ‘ऑक्सफर्ड ऑफ द इस्ट' समजल्या जाणाऱ्या शहराचा झपाट्याने विकास होत आहे. पण या विकासाला खड्ड्यांचे ग्रहण लागले आहे. दरवर्षी पावसाळ्यात शहरातील रस्त्यांवर खड्ड्यांचे साम्राज्य पसरते. यामुळे अपघात, वाहतूक कोंडी आणि नागरिकांचे हाल होतात. ही एक तात्पुरती समस्या नसून प्रशासनाची नियोजन आणि अंमलबजावणी होताना दिसत नाही.

रस्त्याला खड्डे पडले असल्याची तक्रार नागरिकांकडून वारंवार केली जाते. पण, त्या तक्रारींकडे दुर्लक्ष केले जाते. मात्र, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस हे मागच्या आठवड्यात पुणे दौऱ्यावर असताना त्यांना खड्ड्यांचा सामना करावा लागला होता. त्यामुळे त्यांनी पुण्यातील रस्त्यांवर खड्डे खूप पडले आहेत. रस्ते चांगले करा अशा सूचना त्यांनी महापालिका आयुक्तांना केल्या होत्या. यापूर्वी राष्ट्रपती भवनकडूनही पुण्यातील रस्त्यांबाबत तक्रार करण्यात आली होती. खड्ड्यांच्या समस्येची व्याप्ती दिवसेंदिवस वाढत चालली आहे आणि गंभीरही होत आहे. पुण्यात दरवर्षी पावसाळ्य़ाच्या सुरुवातीला रस्त्यांची दुर्दशा होते. पाऊस दोन-चार दिवस सलग राहिला की रस्त्याची चाळण व्हायला सुरुवात होते. त्यामुळे त्यामध्ये पाणी साचले, की तिथे खड्डा आहे की नाही कळत नाही. यामध्येच अपघातांमध्ये वाढ होताना दिसते. खड्ड्यांमुळे दुचाकीस्वारांचे सर्वाधिक हाल होतात. अनेकदा खड्डे चुकवताना अपघात होतात. यामुळे शारीरिक इजा आणि कधीकधी जीवही जातो. खड्ड्यांचा वाहतुकीवरही परिणाम होऊन वाहतूक कोंडी व्हायला सुरुवात होते. खड्ड्यांमुळे वाहनांचा वेग मंदावल्याने वाहतूक कोंडी होते. सकाळच्या वेळेत लोकांची कार्यालयात, मुलांना शाळेत पोहोचायची गडबड असते. हे सर्व कठीण होऊन जाते. खड्ड्यांमुळे वाहनांचे नुकसान मोठ्या प्रमाणावर होते. खड्ड्यांमुळे वाहनांचे टायर, सस्पेन्शन आणि इतर भागांचे मोठे नुकसान होते. यामुळे नागरिकांना आर्थिक भुर्दंड सोसावा लागतो. नागरिकांचे आरोग्यही खड्ड्यांमुळे धोक्यात येते. सततच्या खड्ड्यांमुळे कंबरदुखी आणि पाठीचे विकार जडतात. रस्त्यांवरील धुळीमुळे श्वसनाचे आजारही वाढतात.

पुणे शहर खड्डेमुक्त करण्यासाठी प्रशासनाची उदासीनता कारणीभूत आहे. पुणे महानगरपालिका दरवर्षी खड्डे दुरुस्तीसाठी कोट्यवधी रुपयांचा निधी मंजूर करते, पण कामे फक्त कागदावर होतात. खड्डे भरण्यासाठी वापरण्यात येणारा निकृष्ट दर्जाचा माल आणि पावसाच्या पाण्याचा निचरा न होणारी व्यवस्था यामुळे ही समस्या पुन्हा पुन्हा उद्भवते. पुणे शहरात पावसाळ्य़ात पाण्याचा निचरा व्यवस्थित होत नाही. रस्त्यांवर पाणी साचून राहिल्यामुळे डांबरी रस्ते कमकुवत होतात आणि खड्डे पडतात. नळ जोडणी आणि केबल टाकण्याचे काम सुरू असते. महानगरपालिका आणि इतर खात्यांकडून रस्त्यांवर खोदकाम केले जाते, पण नंतर ते योग्यरीत्या बुजवले जात नाही. यामुळे पावसाळ्य़ात खड्डे तयार होतात. खड्डे बुजवण्यासाठी खराब दर्जाचे साहित्य वापरले जाते. खड्डे बुजवण्यासाठी वापरण्यात येणारा डांबराचा दर्जा चांगला नसतो. यामुळे एकदा बुजवलेला खड्डा पुन्हा काही दिवसांत उघडतो. शहरात नवीन उड्डाणपूल, मेट्रो यांसारखे प्रकल्प सुरू आहेत. या प्रकल्पांमुळेही रस्त्यांची स्थिती बिघडली आहे. पण या कामांचे योग्य नियोजन आणि समन्वय नसल्यामुळे नागरिकांना त्रास होतो, अशी खड्डे पडण्याची विविध कारणे आहेत.

पुणे शहरातील खड्ड्यांची समस्या दूर करण्यासाठी काही ठोस उपाययोजना करणे गरजेचे आहे. त्यासाठी उत्कृष्ट दर्जाचा डांबर वापरणे गरजेचे आहे. खड्डे भरण्यासाठी उत्कृष्ट दर्जाचे पॉलिमर मॉडिफाइड डांबर वापरल्यास खड्डे पुन्हा लवकर पडणार नाही. पाण्याचा निचरा होणारी व्यवस्था नीट पाहिजे. रस्त्याच्या कडेला गटारे बांधणे आणि त्यांची नियमित स्वच्छता करणे आवश्यक आहे. यामुळे रस्त्यावर पाणी साचणार नाही. शासकीय विभागांमध्ये समन्वय आवश्यक आहे. महानगरपालिका, पाणीपुरवठा विभाग आणि इतर सरकारी विभागांनी एकत्र येऊन काम करणे आवश्यक आहे. रस्ते खोदण्यापूर्वी आणि नंतर योग्यरीत्या बुजवण्यासाठी नियम बनवणे आवश्यक आहे. नागरिकांचा सहभागही तितकाच महत्त्वाचा आहे. नागरिक म्हणून आपल्यालाही खड्ड्यांची माहिती प्रशासनापर्यंत पोहोचवणे आवश्यक आहे. नागरिकांना तक्रार करता यावी म्हणून ‘रोज मित्र अॅप' सुरू करण्यात आले आहे. महापालिकेकडून खड्डे बुजवले गेले असल्याचा दावाही करण्यात आला आहे. मात्र, काही रस्त्यांवर खड्डे अद्याप असल्याचे दिसून येत आहे. त्यामुळे रस्त्यांवरील पूर्ण खड्डे बुजवले गेलेले नाहीत. पाऊस झाल्यावर पुन्हा रस्त्यांना खड्डे पडले आहेत. पुणे शहरातील खड्ड्यांची समस्या ही फक्त एक तात्पुरती समस्या नाही, तर ती प्रशासनाच्या कार्यक्षमतेवर प्रश्नचिन्ह निर्माण करते. यावर वेळीच उपाययोजना केली नाही, तर याचा परिणाम शहराच्या विकासावर होईल. प्रशासनाने या समस्येकडे गांभीर्याने बघणे आवश्यक आहे. नागरिकांनीही या प्रश्नावर प्रशासनाला जाब विचारला पाहिजे. ‘आपले शहर, आपली जबाबदारी' या तत्त्वावर काम करूनच खड्डेमुक्त पुणे शक्य आहे. पीएमसी, सरकार आणि नागरिकांच्या संयुक्त प्रयत्नाने हा प्रश्न सोडवता येईल. अन्यथा, पुणेकरांच्या प्रवासाची व्यथा कायम राहील.

-प्रतिनिधी

Comments
Add Comment