
उद्योजक गौतम अदानी यांच्याकडून पाहणी
नवी मुंबई : नवी मुंबई येथील आंतरराष्ट्रीय विमानतळाला (एनएमआयए) नागरी विमान वाहतूक महासंचालनालय (डीजीसीए)कडून एरोड्रोम परवाना मंजूर झाला आहे. हा परवाना विमानतळ कार्यान्वित करण्यासाठी महत्त्वाचा ठरतो. विमान वाहतूक प्राधिकरणाच्या सर्व सुरक्षा आणि नियामक अटी पूर्ण केल्यानंतर हा परवाना देण्यात आला आहे. नवी मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळाचे उद्घाटन येत्या ८ ऑक्टोबर रोजी देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते होणार आहे. मंगळवारी नवी मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळाची उद्योजक गौतम अदानी यांनी विशेष विमानाने येऊन पाहणी केली.
नवी मुंबई येथे आंतरराष्ट्रीय विमानतळ उभारण्यात आले असून विमानतळाच्या पहिल्या टप्प्याचे लोकार्पण लवकरच पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते होणार आहे.विमान वाहतूक प्राधिकरणाच्या सर्व सुरक्षा व नियामक निकषांचे पालन केल्यानंतर एरोड्रोम परवाना विमानतळाला मंजूर झाला. या परवान्यामुळे विमानतळावर विमान उड्डाणे करणे शक्य होणार आहे. एरोड्रोम परवाना मिळाल्यानंतर नवी मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळ प्रादेशिक व आंतरराष्ट्रीय दळणवळण सुधारण्याच्या ध्येयाजवळ पोहोचला आहे, असे एनएमआयएने म्हटले आहे.
या विमानतळाच्या पहिल्या टप्प्यापासून व्यावसायिक उड्डाणे सुरू केली जातील असे एअर इंडिया समूहाने नुकतेच जाहीर केले होते, या विमानतळाचे संचालन अदानी एअरपोर्ट होल्डिंग्स लिमिटेडकडून केले जाणार आहे. प्रारंभीच्या टप्प्यात, एअर इंडिया समूहाची एअर इंडिया एक्स्प्रेस या विमानतळावरून उड्डाणे करणार अाहेत.
नामकरणावरून वाद
विमानतळाला माजी खासदार दिवंगत दि. बा. पाटील यांचे नाव दिले जावे अशी मागणी भूमिपूत्रांची आहे. त्यासाठी येथे आंदोलनही झाले. भिवंडीचे खासदार सुरेश म्हात्रे (बाळ्या मामा) यांनी त्यासाठी मोठ्या आंदोलनाची तयारी केली आहे. त्यामुळे या विमानतळाच्या उद्घाटनापूर्वी तणावाचे वातावरण निर्माण झाले आहे. नवी मुंबईतील सारसोळे गावाच्या वेशीसमोर नवी मुंबई विमानतळाचा नामफलकावर दि. बा. पाटील यांचे नाव नसल्याने फलक तेथे लावण्यास ग्रामस्थ मनोज मेहेर व त्याच्या सहकाऱ्यांनी विरोध करत नामफलक लावू दिला नाही. नवी मुंबईत सर्वत्र हेच चित्र पाहावयास मिळत आहे. प्रशासनाने फलक लावल्यास ग्रामस्थांकडून ते फेकून दिले जाण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे.